Sangli News : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी पडल्याने खरीप हंगामातील पिकांच्या काढणीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. जिल्ह्यात यंदा वेळेत पाऊस सुरू झाल्याने खरिपाची पेरणी ९४ टक्के झाली. पेरणीनंतरही जून ते ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला.
यामुळे यंदा खरिपातील पिकांना हा पाऊस उयुक्त ठरला. मात्र, मिरज, वाळवा, पलूस आणि शिराळा तालुक्यातील पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. यंदा पाऊस चांगला झाल्याने खरिपातील पिके शेतकऱ्यांची हाती लागली आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे खरिपातील मूग, भुईमूग, उडीद या पिकांसह अन्य पिकांची काढणी सुरू झाली. तसेच शिराळा तालुक्यात आगाप भात पिकाची पेरणी झालेल्या भाताचीही काढणीचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले होते.
मूग, उडीद, भूईमुग या पिकांची ३० ते ४० टक्के काढणी उरकली आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. सर्वदूर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे खरिपातील पिकांच्या काढणीला ब्रेक लागला आहे.
द्राक्ष छाटणीला अडथळा
द्राक्ष उत्पादक शेतकरी ऑगस्टमध्ये फळ छाटणी घेतात. मात्र, सतत पडणारा पाऊस जमिनीतील ओल यामुळे द्राक्षवेलींची पाने गळाली आहेत. अतिपावसाने पाणी साचून राहिल्याने पांढऱ्या मुळीचे काम पूर्णपणे थांबले आहे.
पाऊस पडत असल्याने आगाप छाटणी झालेली नाही. द्राक्ष छाटणी तर करावीच लागणार आहे. आता घ्यावी तर पडणाऱ्या पावसामुळे वाया जाण्याची भीती आहे. दुसरीकडे आता एकाच वेळी ऑक्टोबरमध्ये छाटण्या एकाच वेळी होणार असल्याचे चित्र आहे.
दुष्काळी भागात रब्बीसाठी उपयुक्त
दुष्काळी भागातील खरिपाची काढणी बऱ्यापैकी झाली आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी पिकाची पेरणी केली जाते. परंतु पाऊस झाल्यानंतरच शेतकरी ज्वारीच्या पेरणीचे नियोजन करतात. त्यामुळे जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यांत चांगला पाऊस झाला असल्याने आता रब्बीच्या पेरणीचे नियोजन येत्या आठ दिवसांत होण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.