Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Sowing Update : पावसाची अन् पेरणीची आस

अरुण चव्हाळ 

Indian Agriculture : मृग नक्षत्रातील पेरणीची आशा आता मावळली आहे. पेरणीचे सोडा, पावसाचे सोडा, साधे आभाळ सुद्धा रंग बदलेना. ढग दिसेनात. दोन-चार थेंब पडल्याचा कुणाचा सांगावा नाही. पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा हवामान तसेच कृषी खात्याचा शेतकऱ्यांना एवढाच सल्ला आहे.

बाकी अंदाज लपंडाव खेळत आहेत. शेतकरीच आता पावसाचा चकोर झालाय. भयाण वारा अन् अंग व काळीज वितळणारे ऊन ऋतुमानाचे दिवस बदल्याचे स्पष्ट अनुभव देत आहेत. तब्बल मृग नक्षत्राचे बारा-तेरा दिवस असे रिकामे गेल्यावर भुईसारखी माणसं भेगाळलीत.

एक महिन्याचा पगार इकडे तिकडे झाला, की महिन्याचे गणित बिघडले म्हणणारे नोकरदार हिरमुसून गेल्याचे आपण बघतो. आता एक महिन्याने उशिरा खरीप पेरणी होईल त्यामुळे शेतकरी आताच सुकलेला दिसत आहे. काळ्या पाटीवर पहिलीला गेलेल्या मुलाने रेघोट्या ओढाव्यात तशा रानात पाळ्यांवर पाळ्या शेतकरी ओढत आहेत.

काहींनी बळीराम नांगराचे तास ओढून कापूस लागवड केलेली आहे. काहींनी ठिबक, तुषार सिंचनाद्वारे हिम्मत करून कापूस उगवलेला आहे. पण कोरडे रान रखरख आणि शेतकरीबी रखरख पाहून कुणाचेही मन गोठल्याशिवाय राहणार नाही. काळीज करपायलंय.

वेळेवर पेरणी झाली, की पिकांची वाढ आणि उतारा योग्य येतो. आता पेरणीच लांबल्यावर पिकांची वाढ व उतारा योग्य कालावधीत अपेक्षित होणार नाही. उतारा नाही म्हणजे शेतकऱ्यांचा आर्थिक कोंडमारा होतो. रान तयार आहे पण पाणी नाही.

घरात-आखाड्यावर खत, बी-बियाणे आणि कीडनाशके खरेदी करून शेतकऱ्यांनी पै-पै आटवून ठेवलेला आहे. पाण्याची तडफ शेतीला आणि शेतकऱ्याला हिरवं स्वप्न दाखवते. ही स्वप्नं निव्वळ शेतीवर कधीच साकार झालेली नाहीत. पण आशा मेली, तर जग मरेल. शेतकऱ्याला कष्ट करून जगण्याची आशा आहे. पेरणीला म्हणून तो आसुसलेला असतो.

पेरताना ओटीतले आणि मुठीतले बियाणे या दोन्हींमध्ये अंतर पडते. आता ओटीत बियाणे आहे पण मुठीत कधी येईल याचा बेभरवसा आहे. साधारणतः सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, मका आदी पिकांचा उतारा मृग नक्षत्राच्या पेरणीवर चांगला येतो.

आता आर्द्रा नक्षत्रात पेरणी झाल्यावर किमान ३० ते ३५ टक्के पीक उतारा कमी होण्याचा धोका डोळ्यापुढे दिसत आहे. सर्वशाम पाऊस बरसला, की सगळ्यांची पेरणी साधते. आता थोडाफार विसावा पांडुरंगाची वारी असल्यामुळे आणि तिकडे शेतकरी गुंतल्यामुळे ठीक आहे.

पांडुरंगाची आणि पावसाची आस शेतकऱ्यांना सारखीच असते. आपल्या कंबरेएवढा भवसागर आहे, विठ्ठलाचा हा संदेश शेतकरी मानतो. आपण एवढेच पाण्यात बुडून बाकी जिवंत राहू, वाहत जाणार नाहीत याची खात्री शेतकरी भक्तांना आहे. येथे पांडुरंगाचे मुखदर्शन एक वेळ होते. गर्दीतही तो दिसतो.

पण पावसाचा लपंडाव रडकुंडीस आणतो. पाऊस जीवनसखा आहे. जीवनसखाच अशी साथ देणार नसेल, तर शेतकऱ्यांच्या जगण्याचे रोजचे वांधे होतात. शेतकरी शेतमजुरांना पुढची आशा म्हणून रोजंदारीला लावतो. रोजंदाराला दररोज पैसा लागतो. हात बंद म्हणल्यावर चूल बंद होते.

पोट उपाशी राहण्याची, शिक्षणाची, लग्नाची, सुखदुःखाची आणि आरोग्याची, तसेच घेतलेल्या कर्जाची लई आबदा होते. ‘भाकरीचा चंद्र’ शेतकऱ्यांनी माणसाला दिला. पण स्वतःची भाकरी फिरवण्याची त्याची आशा पावसाच्या दडण्याच्या लहरीपणामुळे साकार होत नाही.

दोन-चार वर्ष आबादानी आणि दोन-चार वर्ष अवर्षण म्हटल्यानंतर अर्थाची बरोबरी होते. शेतकऱ्यांच्या पदरात बाकी काही उरले नाही तर, बँकांचा बोजा वाढत जातो. पावसाचे परिणाम व्यवहारावर होतात. महागाई वाढवली जाते. लूटमार केली जाते. सरकारला हे सर्व माहीत आहे. पण करणार काय? निसर्गाच्या पुढे कोणीही नाही, सोबत काय? पुढे जाण्याचा प्रश्‍नच नाही.

पाण्यावाचून शेतकरी पराधीन आहे. हे वास्तव बुजवायचे असेल तर, झाडे जगवावीच लागतील. जैवविविधता जपावी लागेल. जागोजागी जमिनीत पाणी मुरवावे लागेल. हे शब्द कागदावर नको. याचीच पेरणी काळजात करून, पाऊस पेरायला आपण शिकूया.

पाण्यावाचून काहीच नाही. पाण्यावाचून सर्व काही आपण अनुभवत आहोत. पश्‍चात्तापापेक्षा अनुभवाची शिकवण उजवी असते. निसर्गाचा डाव आपण समजून घेतला तर आपलेच भले होईल!

लेखक - अरुण चव्हाळ, ७७७५८४१४२४, (रानमेवा शेती-साहित्य संघाचे अध्यक्ष)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT