Rahul Gandhi Agrowon
ॲग्रो विशेष

Parliament Session 2024 : लोकसभेतील भाषणाचे अंश वगळगल्याने राहुल गांधी संतप्त

Mahesh Gaikwad

New Delhi News : लोकसभेत सोमवारी (ता. १) दिलेल्या भाषणातील काही अंश संसदीय नोंदींमधून वगळण्यात आल्याने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून राहुल यांनी संसदीय नोंदींमध्ये आपले संपूर्ण भाषण पूर्ववत ठेवावे, अशी मागणी केली. तसेच सभागृहात आपण सत्य मांडल्याचाही दावा त्यांनी केला.

राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत सोमवारी सरकारला धारेवर धरताना आरोप केले होते. त्यात प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात आले होते. राहुल गांधींच्या या आक्रमकतेमुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता. त्यांच्या भाषणातील बऱ्याच मुद्द्यांवर खुद्द पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांनी आक्षेप घेताना वादग्रस्त वक्तव्ये कामकाजातून वगळण्याची मागणी केली होती.

त्यानंतर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींच्या १०० मिनिटांच्या भाषणातील हिंदू धर्म आणि संविधानाशी संबंधित मुद्दे संसदीय नोंदीतून काढून टाकले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत लोकसभेचे कामकाज चालले होते. त्यानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास या नोंदी वगळल्याचा तपशील माध्यमांना कळविण्यात आला होता.

या घटनाक्रमानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून आक्षेप नोंदविला. सभागृहात व्यक्त केलेले आपले मत सभागृहाच्या कामकाजातून हटविणे हे संसदीय लोकशाहीच्या आत्म्याच्या विरुद्ध आहे. त्यामुळे, हटविण्यात आलेल्या मुद्द्यांचा पूर्ववत भाषणात समावेश केला जावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

आपल्या भाषणात काहीही आक्षेपार्ह नव्हते. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्याही भाषणात आरोपांचा भडिमार होता मात्र त्यांच्या भाषणातून एकच शब्द वगळण्यात आला. हा भेदभाव अनाकलनीय आहे. आपण सभागृहात सत्य मांडले आहे. संसदेत जनतेशी संबंधित प्रश्न मांडण्याचा अधिकार प्रत्येक खासदाराला आहे. हेच लक्षात घेऊन आपण भाषण दिल्याचाही दावा राहुल गांधींनी या पत्रात केला.

ईव्हीएम विश्वास नाहीच ः अखिलेश यादव

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात दमदार यश मिळविणारे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोमवारी संसदेत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर तोफ डागली. ‘ईव्हीएम’वर आपल्याला कालही विश्वास नव्हता आणि आजही नाही. जोपर्यंत ‘ईव्हीएम’ हटविले जात नाही तोपर्यंत समाजवादी पक्ष या मुद्द्यावर ठाम राहील, असा दावाही अखिलेश यांनी केला.

लोकसभेमध्ये राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेदरम्यान उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ईव्हीएमवर कडाडून टीकास्त्र सोडले. रामजन्मभूमी अयोध्येचा समावेश असलेल्या फैजाबादमध्ये भाजपच्या पराभवावरूनही अखिलेश यादव यांनी कोपरखळी लगावली. अयोध्येतील (समाजवादी पक्षाचा) विजय हा मतदारांच्या परिपक्वतेचा विजय आहे, असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावताना अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशात मिळालेल्या यशाच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपला जोरदार फटकारले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टींचा मोठा धमाका; ऊस परिषदेचे करणार आयोजन

Crop Damage Compensation : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना भरपाईपोटी ९८७ कोटींची मदत

Nana Patole : गोरगरिबांचा आधार

Nana Patole : जनसामान्यांचा आवाज- नाना पटोले

Vidarbha Development : पूर्व विदर्भाचे नवीन विकास मॉडेल- नाना पटोले

SCROLL FOR NEXT