Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop : रब्बीतील पिके कीड-रोगांनी हैराण; उत्पादनात घट अटळ

Team Agrowon

Latur News : यंदाच्या खरीप हंगामातील तूर व कपाशी तसेच रब्बीतील पीक कीड-रोगांनी हैराण आहेत. हवामानाची प्रतिकूलता व अवेळी पावसाचा दणका यामुळे खरिपाप्रमाणेच रब्बीच्याही उत्पादनात घटअटळ आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कीड-रोगग्रस्त हरभरा मोडून रब्बी ज्वारीची पेरणी केली असली, तरी त्या ज्वारीचे देऊळही पाण्यातच आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात लातूर विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांत रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३० हेक्टर इतके होते. प्रत्यक्षात १२ लाख ५७ हजार ७९८ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९२ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली. पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये हरभऱ्याची सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन जवळपास १०६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.

परंतु पावसाअभावी व नंतर अवेळी झालेल्या पावसाने तसेच प्रतिकूल हवामानामुळे मरसह अळ्यांनी हरभऱ्यावर मोठ्या प्रमाणात आक्रमण केले. ढगाळ वातावरणामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव हरभऱ्यावर वाढताच आहे. आधी पाऊस नसल्याने हरभऱ्याची वाढ झाली नाही. नंतर कीड-रोगांनी दिलेल्या फटक्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हरभरा मोडून पडलेल्या पावसाच्या भरोशावर ज्वारी पेरणीला पसंती दिली.

गव्हाची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ५८ टक्केच पेरणी झाली, तर रब्बी ज्वारीची जवळपास ७६ टक्के पेरणी झाली होती. यंदा प्रथमच करडईच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत जवळपास दीड पट पेरणी झाली आहे.

तुरीवर शेंगा पोखरणारी अळी

लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत तुरीची सरासरी क्षेत्र ३ लाख ४९ हजार २५३ हेक्टर आहे. प्रत्यक्षात यंदाच्या खरिपात २ लाख ३५ हजार ३३० हेक्टरवर तुरीची पेरणी झाली होती. पक्वतेच्या व काढणीच्या अवस्थेत असलेल्या तुरीची काही ठिकाणी काढणी सुरू झाली आहे. या तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

आधी पावसाच्या खंडामुळे तुरीच्या वाढीवर झालेला परिणाम व आता अळ्यांच्या आक्रमण यामुळे तुरीच्या उत्पादनात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. पाचही जिल्ह्यांत कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ८५ हजार हेक्टर असताना प्रत्यक्षात ४ लाख ३७ हजार ४०७ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. आधी पावसाचे प्रदीर्घ खंड गुलाबी बोंड अळीचे आक्रमण व आता अवेळी आलेल्या पावसामुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले असून, कपाशीची वेचणी अंतिम टप्प्यात आहे.

जिल्हानिहाय रब्बी पेरणी हेक्टरमध्ये

लातूर ३ लाख ३१ हजार ६३०

धाराशिव २ लाख ७३ हजार १२१

नांदेड २ लाख ३८ हजार ३९३

परभणी २ लाख १२ हजार ०१३

हिंगोली २ लाख २ हजार ६४०

विभागातील रब्बी पीकनिहाय पेरणी

(हेक्टरमध्ये)

रब्बी ज्वारी २ लाख ८१ हजार ६१६

गहू ९० हजार २२५

हरभरा ८ लाख ३६ हजार २६६

करडई २ लाख ८ हजार ७७६

आमच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांवर हरभरा मोडून रब्बी ज्वारी पेरण्याची वेळ आली. तुरीचीही अपेक्षित वाढ झाली नाही.तिच्यावरही शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव मोठा आहे. जवसावरही पहिल्यांदाच अळ्याचे आक्रमण झाले. यंदा ना खरीप न रब्बी, कोणत्याही पिकाच्या उत्पादनात मोठी घट येणार हे स्पष्ट आहे.
सचिन चिंते, शेतकरी, घारोळा, जि. लातूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT