- शेखर गायकवाड
Shekhar Gaikwad : एका गावात संभाजी नावाचा एक शेतकरी बायको व दोन मुलांसोबत राहत होता. संभाजीच्या दोन्ही मुलांची लग्ने झाली होती. काही वर्षानंतर संभाजीचे वृद्धापकाळाने निधन झाले. नियमानुसार वारस नोंद झाली आणि दोन्ही मुलांची नावे वारस म्हणून सातबारावर लागली. संभाजीच्या धाकट्या मुलाला एक छोटी मुलगी होती. संभाजीच्या धाकट्या मुलाचे अचानक अपघाती निधन झाले होते.
थोरल्या भावाने आपल्या धाकट्या भावाची बायको व मुलगी हे त्याच्या हिश्शासाठी वारस असताना त्यांना डावलून आपले नाव लावणारी वारस नोंद करून घेतली. काही काळ लोटल्यानंतर धाकट्या भावाच्या बायकोला ही बातमी समजली.
धाकट्या भावाच्या बायकोने आपल्या व आपल्या मुलीच्या वारस नोंदीबाबत चौकशी करायला सुरुवात केली. परंतु थोरल्या भावाने तलाठ्याला हाताशी धरून आपल्या मयत धाकट्या भावाच्या बायकोला सातबारा वारस नोंद, उतारे व इतर कागदपत्रे तिला वेळेवर मिळणार नाहीत, अशी सोय करून ठेवली होती. धाकट्या भावाच्या बायकोने मात्र हार मानली नाही. तिने न डगमगता मंजूर झालेल्या वारस नोंदीविरुद्ध अपील दाखल करण्यासाठी धडपड केली.
थोरल्या भावाला मात्र या धाकट्या भावाच्या बायकोचा त्रास होऊ लागला. त्याने कधीही असा विचार केला नव्हता, की आपल्या भावाची बायको अशा पद्धतीने अपिलात जाईल. अपिलात ही चुकीची वारस नोंद रद्द झाली व धाकट्या भावाच्या बायकोची व तिच्या मुलीच्या नावांची वारस नोंद झाली. धाकट्या भावाच्या बायकोला न्याय मिळाला. त्यामुळे तिचे व तिच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न मिटला होता.
सांगावयाचे तात्पर्य म्हणजे सामाजिक कारणांमुळे व लोभामुळे कायदेशीर वारसांना डावलण्याची प्रवृत्ती आता दिवसेंदिवस वाढत आहे. आजकाल संपत्तीपुढे नातं हा प्रकार राहिलेला नाही, हे स्पष्टपणे दिसून येते.
बेरकी अन् खोटे साक्षीदार
शेतजमिनीच्या एका खटल्याचे काम अनेक वर्षे कोर्टात सुरू होते. या खटल्यामध्ये संतोष नावाच्या एका साक्षीदाराने एका शेतकऱ्याच्या बाजूने कोर्टासमोर साक्ष दिली व साक्षीमध्ये अनेक कागदपत्रांचा उल्लेख केला.
या सर्व कागदपत्रांवर माझ्यासमोर सही झाली होती व त्यातील दोन महत्त्वाच्या कागदपत्रांची प्रत माझ्याजवळ देण्यात आली होती, असे संतोषने कोर्टामध्ये त्याच्या साक्षीत सांगितले.
वकिलाने साक्षीदार संतोषला तू हे दस्तऐवज आज कोर्टात आणले आहेत काय, असे विचारले असता संतोष कोर्टामध्ये वकिलाला म्हणाला, की मी हे दस्तऐवज पुढच्या तारखेला कोर्टासमोर हजर करतो. एक महिन्यानंतर कोर्टाची पुढची तारीख आली तेव्हा वकिलाने कोर्टात साक्षीदार संतोषला या दस्तऐवजाबद्दल विचारले असता तो म्हणाला, की आठ दिवसांपूर्वी माझ्या रानातल्या घराला आग लागल्यामुळे ही सगळी कागदपत्रे जळून गेल्याचे सांगितले.
घराला आग लागल्याबद्दल पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल का केली नाही? असे कोर्टात वकिलाने साक्षीदार संतोषला विचारले. त्यावर साक्षीदार संतोष म्हणाला, की मी महिनाभर यात्रेला गेलो होतो. त्यावर वकिलाने संतोषला विचारणा केली, की तू परत आल्यावर तरी पोलिस स्टेशनला फिर्याद का दाखल केली नाही? शेवटी संतोषने सांगितले, की मी कुणाविरुद्ध फिर्याद करणार असा प्रश्न पडल्यामुळे मी पोलिस तक्रार केली नाही.
सांगायचे तात्पर्य म्हणजे संतोष सारखे बेरकी व खोटे साक्षीदार आपल्याला समाजात सतत पाहायला मिळतात. त्यातून ना काही साध्य होते, ना काही सिद्ध होते. फक्त कोर्टाचा वेळ वाया गेला आणि न्याय लांबणीवर पडला हे मात्र नक्की!
ई-मेल : shekhargaikwad@yahoo.com
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.