Department Of Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : एक वर्ष दाबून ठेवलेल्या पदोन्नत्यांना मुहूर्त मिळाला

मनोज कापडे

Pune News : कृषी खात्यात एक वर्षांपासून संशयास्पदपणे दाबून ठेवलेल्या पदोन्नतीच्या फाईलवर अखेर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. यामुळे ताटकळलेल्या २१ कृषी तंत्र अधिकाऱ्यांना उपसंचालक दर्जाच्या पदांवर बढती मिळाली आहेत.

कृषी अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया गेल्या तीन वर्षांपासून सुरू होती. खातेनिहाय पदोन्नती समितीने गेल्या वर्षी बढत्यांवर शिक्कामोर्तब केले होते. परंतु, माशी शिंकली आणि पदोन्नतीची फाईल अडवून ठेवण्यात आली. काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एक स्वीय सहायक या यादीवर मध्यस्थ म्हणून काम करीत होता. त्याला भेटून ‘शंकानिरसन’ केल्याशिवाय नाव अंतिम केले जात नव्हते.

या गोंधळात एक वर्ष फाईल दाबून ठेवली गेली. त्याकडे कोणत्याही आयुक्त किंवा सचिवाने लक्ष दिले नाही. त्यामुळे महत्त्वाच्या पदांवर कामे करण्यासाठी अधिकारीच उपलब्ध नव्हते. अखेर बुधवारी (ता. २८) मंत्रालयातील कृषी खात्याचे अवर सचिव अ. नि. साखरकर यांनी पदोन्नतीचे आदेश जारी केले.

पदोन्नत्यांची समस्या सुटल्यामुळे आता कृषी आयुक्तालयातील विस्तार, फलोत्पादन, फायटोसॅनिटरी व खते विभागाला नवे उपसंचालक मिळाले आहेत. विस्तार विभागातील प्रशिक्षण कक्षात विठ्ठल सोनवणे तर; फलोत्पादन विभागाच्या पीक संरक्षण व फायटोसॅनिटरी कक्षाच्या प्रमुखपदी उपसंचालक सत्यवान नऱ्हे यांची वर्णी लागली आहे. तसेच फलोत्पादन विभागाच्या कक्ष दोनमधील उपसंचालकाची सूत्रे भागवत शिंगाडे यांच्याकडे आली आहेत.

नव्या आकृतिबंधात ‘उपविभागीय कृषी अधिकारी’ पद हे काढून टाकण्याच्या हालचाली सुरू होत्या. या पदाचा कृषी खात्याला फारसा उपयोग होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, आकृतिबंधाचे गुऱ्हाळ अजूनही सुरू आहे. त्यामुळे तूर्त काही उपविभागीय पदे भरण्यात आली आहेत.

यात संतोषकुमार बरकडे (वाई), नंदकुमार पाचकुडवे (नियुक्तीचे ठिकाण सोलापूरर), हरिदास हावळे (गडहिंग्लज), दत्तात्रय डमाळे (अहमदनगर), राहुल जितकर (वाडा) तसेच राहुल गायकवाड (अंबाजोगाई) यांचा समावेश असून त्यांना ‘उपविभागीय कृषी अधिकारी’ पदावर बढती मिळाली आहे.

या बढतीमुळे ९ तंत्र अधिकाऱ्यांना उपसंचालकपदी काम करण्याची संधी मिळते आहे. यात आयुक्तालयातील चार पदांचा समावेश आहे. उर्वरित पाच पदे क्षेत्रिय पातळीवरची आहेत. यामध्ये दत्तात्रय येळे (नागपूर एसएओ कार्यालय), सूरज पाटील (बीडमधील आत्मा कक्ष), वरुण देशमुख (अमरावती एसएओ कार्यालय), अर्चना गुंजकर (नांदेडमधील आत्मा कक्ष), रतिलाल महाले (नंदुरबार एसएओ कार्यालय) या उपसंचालकांचा समावेश आहे.

कृषी खात्यात जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या कृषी विकास अधिकारी (एडीओ) पदासाठी रस्सीखेच असते. अकोला जिल्हा परिषदेत ‘एडीओ’ पद रिक्त होते. या पदावर मंत्रालयातून तुषार अंकुश जाधव यांच्या नावाला हिरवा कंदील देण्यात आला. त्यामुळे त्यांना ‘एडीओ’पदाची लॉटरी लागल्याचे बोलले जाते आहे. पदोन्नतीमुळे नागपूर बीज परीक्षण प्रयोगशाळेला मात्र पालक मिळाला आहे. तेथील बीज परीक्षण अधिकारीपदी आता बंडा कुंभार यांची नियुक्ती झाली आहे.

खत कक्षाच्या प्रमुखपदी कोंढाळकर

राज्याच्या खत कक्षाच्या प्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार याविषयी खत उद्योगात उत्सुकता होती. नुकत्याच घोषित झालेल्या पदोन्नत्यांमध्ये या पदावर आता धनंजय तुकाराम कोंढाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांच्या अखत्यारीत ते काम करतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT