Dhule News : जो वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लांब आहे त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सामाजिक न्यायाच्या अनेक योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. गरजू व पात्र व्यक्तींनी शासनाच्या या लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा धुळे जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती एस. जी. मेहेरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे व जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १) पिंपळनेर (ता. साक्री) येथे शासकीय योजनांचा महामेळावा झाला. या महामेळावाच्या उद्घाटनप्रसंगी न्यायाधीश श्री. मेहेरे बोलत होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष माधुरी आनंद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. संदीप स्वामी, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर निलेश पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, अपर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल पाटील, जिल्हा सरकारी वकील डी. वाय. तंवर, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. योगेश कासार उपस्थित होते.
न्यायमूर्ती मेहेरे म्हणाले, शासनाने समाजाच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणावर विविध योजना अंमलात आणल्या आहेत. त्याचा लाभ गरजू व पात्र व्यक्तींनी घ्यावा. विधी सेवा प्राधिकरणामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात. देशपातळीवर सामाजिक सुरक्षा व मुख्य प्रवाहापासून दुर्लक्षिताना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या मेळाव्याच्या माध्यमातून करावयाचे आहे. ग्रामीण भागातील लोक हे शहरी भागातील लोकांपेक्षा जास्त जागृत असतात. परंतु त्यांना योजनांची माहिती नसते. त्यामुळे अशा मेळाव्याचा त्यांना निश्चित उपयोग होईल असा विश्वासही मेहेरे यांनी व्यक्त केला.
प्राधिकरणामार्फत न्याय
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद म्हणाल्या, सर्वांना समान न्याय तत्त्वानुसार कोणत्याही नागरिकांना न्याय देण्याचे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत करण्यात येते. आर्थिक दुर्बल घटकांना तसेच, ज्यांचे उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहे अशा नागरिकांना कायदेविषयक मोफत सल्ला देऊन न्याय देण्याचे काम केले जाते. पीडितांना नुकसान भरपाईही देण्यात येते.
...तर संपर्क साधा
जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, की जिल्हा प्रशासनाच्यावतीने ३५० पेक्षा जास्त योजना राबविण्यात येतात. योजनेबाबत काही अडचणी असल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. पोलीस अधीक्षक श्री. धिवरे यांनी पोलीस विभागामार्फत ११२ डायलची सेवा दिली जाते. तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. कासार यांनी प्रास्ताविक केले.
लाभाचे वाटप
या विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्याहस्ते आंबा लागवड कार्यारंभ आदेश, संजय गांधी निराधार योजना अनुदान, मोफत गणेवश वाटप, वैयक्तिक गुराचा गोठा कार्यारंभ आदेश, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, शबरी आवास योजना, माझी कन्या भाग्यश्री अनुदान, दिव्यांग व्हिलचेअर, पोल्ट्री शेड अनुदान, मका वैरण बियाणे वाटप, किराणा दुकानासाठी अर्थसाहाय्य अशा विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देण्यात आले. प्रारंभी मान्यवरांनी विविध विभागांच्या स्टॉलला भेट देऊन पाहणी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.