Allegations against Elon Musk : एलोन मस्क यांचे नाव टेस्ला आणि नंतर एक्स (ट्विटर) मुळे आज जगभरात पोचले आहे. ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये मोडतात. अमेरिकेतील त्याच्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांनी त्यांच्यावर इनसायडर ट्रेडिंगचा आरोप केला आहे. (संदर्भः हिंदू बिझनेस लाईन, जून १३, पान १०.)
मस्क यांनी २०२१ आणि २०२२ च्या दरम्यान ३० बिलियन डॉलर्सचे टेस्लाचे शेअर्स विकले. ते विकण्याआधी ते शेअर्स वर जातील हे पाहिले, वर गेल्यावर विकून नफा कमवला, त्यातून मिळवलेले पैसे ट्विटर विकत घेण्यासाठी वापरले, असा आरोप आहे
आपल्या देशात म्हणायला पब्लिक कंपन्या; पण प्रत्यक्षात एखाद्या कुटुंबाची प्रचंड मालकी असणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. ही प्रवर्तक घराणी स्वतः कंपनी चालवत असल्यामुळे आपल्या कंपनीच्या शेअरवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करणारे कोणते निर्णय / घटना / आकडेवारी असू शकते याचे सर्वाधिक आणि सर्वप्रथम ज्ञान फक्त त्यांनाच असते.
त्या माहितीचा उपयोग करत ते स्वतःच्याच कंपनीच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग करत असतात. कोणत्याही प्रकारे कायद्याच्या कचाट्यात न येता ते हे उद्योग करत असतात.
त्यात त्यांच्या शेकड्याने असणाऱ्या गुंतवणूक कंपन्या, त्यांचे मित्र / नातेवाईक / गाववाले यांच्या नावावर असणाऱ्या अनेक गुंतवणूक कंपन्या, अनेक ब्रोकर्स असे मोठे नेटवर्क असते. हे सगळे प्रवर्तकांशी संबंधित आहेत हे सिद्ध करणे अशक्य असते.
पण आपला यातला मुद्दा वेगळा आहे. एलोन मस्क यांच्यावर हा दावा गुजरला आहे ऱ्होड आयलंड मधील एका पेन्शन फंडाने. अमेरिका, कॅनडा अशा देशांत अशा गुंतवणूक संस्था आहेत, की ज्या प्रोफेशनल्स चालवतात. त्यांचे स्वतःचे इक्विटी रिसर्च युनिट्स असतात आणि त्यांनी प्रसिद्ध केलेल्या विश्लेषणात्मक रिपोर्टला कंपन्या वचकून असतात.
California Public Employees Retirement System (CALPERS) ही अशीच एक संस्था आहे, जी कंपन्यांना सळो की पळो करू शकते. ती १९३२ सालापासून सार्वजनिक मालकीच्या उपक्रमातील कर्मचाऱ्यांचे पेन्शन / हेल्थ इन्शुरन्स फंड मॅनेज करते.
भारतातील सामान्य नागरिकांच्या लाखो कोटी रुपयांच्या बचती भांडवल बाजाराकडे वाहत आहेत.म्युच्युअल फंड ५७ लाख कोटी , एकट्या एलआयसी कडे ५० लाख कोटी, पेन्शन कंपन्यांकडे असतील १० लाख कोटी. आणि हे आकडे सतत वाढत आहेत. यातील पैसा मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांचा आहे.
सामान्य नागरिकांच्या घामाला वाजवी दाम मिळावे म्हणून लढणाऱ्यांनी, त्या मिळालेल्या दामातून ज्या बचती तयार होतात, त्याचे संरक्षण करण्यासाठी काही तरी संस्थात्मक ढाचे बनवले पाहिजेत.
भ्रष्टाचार, कुडमुडी भांडवलशाही (क्रोनिझम) अशी उच्चरवात टीका करून व्यवस्था (सिस्टीम) बदलण्यास मर्यादा आहेत. व्यवस्थेत खऱ्या अर्थाने बदल घडवून आणायचे असतील तर अशी मॉडेल्स / संस्था उभ्या केल्या पाहिजेत. सार्वजनिक हित उरात बाळगणारे प्रोफेशनल्स आपल्या देशात कसे निपजतील हे बघितले पाहिजे.
व्यवस्थेला वाकविणाऱ्यांच्या अंगणात जाऊन, त्यांच्या खेळाचे नियम अभ्यासून , त्यावर प्रभुत्व मिळवून त्यांना चितपट करता आले पाहिजे. शिकलेली , समाजासाठी काही करू इच्छिणारी तरुण पिढी अशा संस्थात्मक गरजांकडे सकारात्मकतेने बघेल अशी आशा आहे. अशा संस्था जनकेंद्री चळवळीचा भाग झाल्या पाहिजेत. आपल्या घामाच्या बचतीचे संरक्षण करण्यासाठी काम करणाऱ्यांच्या पाठीमागे जनता उभी राहील
(लेखक प्रख्यात अर्थविश्लेषक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.