Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजीत असणारा गुरूवारचा (ता.२६) पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. तर नियोजीत दौऱ्याला पावसाचा फटका बसला आहे. पुण्यातील विविध विकासकामांसह सोलापूर विमान तळाचे उद्घाटन मोदी यांचा हस्ते होणार होते. तसेच मोदी यांची सभा येथील एसपी कॉलेजच्या मैदानावर संध्याकाळी होणार होती.
शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
दरम्यान मुसळधार पावसामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. तसेच मुंबईसाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्याचबरोबर हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करताना गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन केले होते.
पुणे मेट्रो ट्रेनच्या शुभारंभ
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो ट्रेनच्या शुभारंभासोबतच २२ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणीचा कार्यक्रम होता. मोदी सायंकाळी ६ वाजता जिल्हा न्यायालय ते स्वारगेटपर्यंत धावणाऱ्या पुणे मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार होते. या भुयारी मेट्रोसाठी १८१० कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
यावेळी पुणे मेट्रो फेज-१च्या स्वारगेट-कात्रज विस्ताराची पायाभरणीही केली जाणार होती. त्यातबोरबर इतर प्रकल्पांसोबतच समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ भिडेवाडा येथील पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणीही केली जाणार होती. पण आता मोदींचा दौरा रद्द झाल्याने पुणे मेट्रो ट्रेनच्या शुभारंभासोबतच इतर कामांचा शुभारंभ देखील पुढे ढकलण्यात आले आहेत.
मुंबईलाही मुसळधार पावसाचा पटका
भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळे बृहन्मुंबई महापालिकेने गुरुवारी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
तर मुसळधार पावसामुळे मुंबईत ४ जणांचा मृत्यू झाला. पावसामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर उतरणारी १४ विमाने वेगवेगळ्या ठिकाणी वळवण्यात आली आहेत.
या कामांचाही शुभारंभ
राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन (एनएसएम) अंतर्गत स्वदेशी विकसित केलेले सुमारे १३० कोटी रुपये खर्चाचे तीन परम रुद्र सुपर कॉम्प्युटरही पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करणार होते. अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधनासाठी हे सुपर कॉम्प्युटर पुणे, दिल्ली आणि कोलकाता येथे तैनात करण्यात आले आहेत.
ते हवामान आणि हवामान संशोधनासाठी तयार करण्यात आलेल्या हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग (HPC) प्रणालीचे उद्घाटन करणार होते. या प्रकल्पावर 850 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात १० हजार ४०० कोटी रुपयांच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ करणार होते. हे उपक्रम ऊर्जा, पायाभूत सुविधा, सुरक्षितता आणि ट्रक आणि कॅब ड्रायव्हर्सची सोय, स्वच्छ गतिशीलता आणि शाश्वत भविष्य यावर लक्ष केंद्रित करणारे ठरतील असा दावा सरकारने केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.