New Delhi News : आगामी पाच वर्षांत दोन लाख नव्या बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी सोसायट्यांच्या निर्माणामुळे शेती आणि सहकार क्षेत्रात समृद्धी येईल, असा विश्वास केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी येथे व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘नव्या रचनेत ३२ नव्या सेवांना या सोसायट्यांना जोडण्यात आले आहे. शेतीसह डेअरी, मत्स्यपालन क्षेत्रात या सोसायट्यांची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.’’
केंद्रीय सहकार मंत्रालयाद्वारे देशातील १० हजार बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी सोसायट्या, डेअरी आणि मत्स्यपालन सहकारी सोसायट्यांचे लोकार्पण केंद्रीय सहकारमंत्री श्री. शहा यांच्या हस्ते बुधवारी (ता.२५) झाले. त्याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात मंत्री शहा बोलत होते. ते म्हणाले, ‘‘तीन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी आम्ही देशात दोन लाख सोसायट्यांच्या निर्मितीकरिता आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) बनविली होती. आज ९६ वा दिवशी १० हजार सहकारी सोसायट्यांचे निर्माण होत आहे. उद्दिष्टाच्या पाच वर्षांआधी या सोसायट्यांचे काम पूर्ण होईल.’’
केंद्रीय मंत्री श्री. शहा म्हणाले, ‘‘सहकारातून समृद्धी येऊ शकते, यावर आमचा विश्वास आहे. पुढील काळात देशातील तीनस्तरीय सहकार रचनेस सर्वाधिक बळ जर कोण देत असेल, तर ते आपल्या प्राथमिक सहकारी सोसायट्या असतील. याकरिता आम्ही देशात दोन लाख सहकारी सोसायट्यांचे निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. आज याचा चांगल्या गतीने शुभारंभ झाला आहे.’’
केंद्रीय मंत्री श्री. शहा म्हणाले, ‘‘नाबार्ड, एनडीडीबी, एनएफडीबी या तीनही संस्थांनी १० हजार प्राथमिक सहकारी सोसायट्या नोंदणीकृत करण्यासाठी मोठी भूमिका पार पाडली आहे. गावात जर एखादी प्राथमिक सहकारी संस्था असेल, तर दुसऱ्याचे निर्माण होत नाही. त्यात ती संस्था दिवाळखोरीत असेल, तर यामुळे सहकाराचा फायदा गावातील लोकांना होत नाही. म्हणून आम्ही दिवाळखोरीत गेलेल्या सोसायट्यांच्या अवसायानाकरिता स्वतंत्र आदर्श प्रणालीचे (एसओपी) निर्माण केली आहे. यामुळे देशातील किमान १५ हजार गावात नव्या प्राथमिक सहकारी सोसायट्यांची स्थापना करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.’’
‘‘सहकारी सोसायट्यांची बहुउद्देशीय कामांमुळे वाढणारी व्यापकतेमुळे शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेस सशक्त बनविण्याचा एक मजबूत प्रयत्न केला जात आहे. संगणकीकरण आणि तंत्रज्ञानामुळे सोसायट्यांच्या कामात पारदर्शकता येईल. सहकाराची ग्रामीणस्तरावर व्याप्ती वाढेल. महिला आणि युवकांच्या रोजगाराचा माध्यम या सोसायट्या बनतील. याशिवाय तीन नव्या सहकारी संस्थांशी जोडून सेंद्रिय उत्पादन, बियाणे उत्पादन आणि निर्यातीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी सोसायट्या काम करतील. यामुळे सामाजिक आणि आथिॅक समानता येईल,’’ असा विश्वास केंद्रीय मंत्री शहा यांनी व्यक्त केला.
‘गावातून मिळेल विमान तिकीट’
सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर सर्व संस्थांचे संगणीकरण करण्याचे आम्ही सर्वात मोठे काम केले. या तंत्रज्ञानाद्वारे ३२ नव्या सेवांना जोडले आहेत. प्रारंभी सोसायट्या केवल अल्प मुदतीचे कृषी कर्ज देत असे. आता या सोसायट्या डेअरी, मत्स्यपालन संस्था बनू शकेल. आम्ही सोसायट्यांना बहुउद्देशीय बनविले. गोदाम, अन्न वितरण, गॅस-पेट्रोल-डिझेल वितरण, खत वितरण, सिंचन, शेतीमाल सेवा केंद्र, रेल्वे-विमान सेवा बुकिंग अशा अनेक सुविधांना सोसायट्यांशी जोडण्यात आले आहे,’’ अशी माहिती केंद्रीय मंत्री श्री. शहा यांनी दिली.
‘‘१० सहकारी सोसायट्यांना ‘रुपे केसीसी कार्ड’ आणि ‘मायक्रो एटीएम’ यांचे वितरण करण्यात आले आहे. आगामी काळात हे अभियान सर्व सोसायट्यांना मायक्रो एटीएम देण्याकरिता प्राधान्यदेणार आहोत.’’अमित शहा, केंद्रीय सहकार मंत्री
सोसायट्यांचे निर्माण...
संस्था ------ पहिला टप्पा ------ दुसरा टप्पा
नाबार्ड ----- २२७५० ------------ ४७०००
एनडीडीबी ---- ५६५०० ---------- ४६०००
एनएफडीबी ----- ६०००------------ ५५००
सहकार विभाग --- उर्वरित
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.