Integrated Aquaculture : भातशेतीत एकात्मिक मत्स्यपालन

Integrated Farming : जागतिक वातावरण बदल आणि वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरविण्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे. एकात्मिक शेती पद्धतीचे अनेक प्रकार आहेत.
Integrated Aquaculture
Integrated Aquaculture Agrowon
Published on
Updated on

डॉ. व्ही. जी. मोरे, डॉ. व्ही. ए. राजेमहाडिक, प्रवीण सरवळे

Indian Agriculture : जागतिक वातावरण बदल आणि वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरविण्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे. एकात्मिक शेती पद्धतीचे अनेक प्रकार आहेत. त्यातील भात पिकासोबतच एकात्मिक मत्स्य शेती फिलिपिन्स, चीन, थायलंड या देशांत मोठ्या प्रमाणात केली जाते.

आपल्याकडेही ही एकात्मिक शेती पद्धती राबवणे शक्य आहे. कारण कोकणासह विदर्भातील अनेक भागांमध्ये भात हे एक महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. या ठिकाणी शेतामध्ये काही किरकोळ बदल करून माशांचेही उत्पादन घेता येईल.

पाणी साठविण्यासाठी बांधबंधिस्ती आणि चर

भात खाचराच्या बाजूच्या बांधाची उंची जास्त म्हणजे साधारणतः ६० सेंटिमीटर इतकी ठेवावी. त्यामुळे भात खाचरात ३० ते ४० सेंटिमीटर उंचीपर्यंत पाणी साठवणे शक्य होते.

अति पावसामुळे बांध फुटून पाण्याबरोबर मासेदेखील वाहून जाण्याची शक्यता असते. ती कमी करण्यासाठी उताराच्या दिशेला जाळी बसून घ्यावी.

अति पावसाचा भात पिकावर अनिष्ट परिणाम होऊ नये आणि वाढणाऱ्या माशांना मुबलक पाणी मिळावे यासाठी भात खाचरांमध्ये चारही बाजूंनी बांधालगत आणि मध्यभागी ५० सेंटिमीटर रुंद आणि ४० सेंटिमीटर खोल चर खोदावेत. शेताचा उतार असलेल्या भागामध्ये कोपऱ्यात एक १०० सेंटिमीटर लांब, १०० सेंटिमीटर रुंद आणि ६० सेंटिमीटर खोल खड्डा करावा. हे चर आणि खड्डा एकमेकांना जोडावेत. या चर आणि खड्ड्यामुळे काही कारणास्तव शेतातील पाणीपातळी कमी झाली तर माशांना जगण्यापुरते तरी पाणी या चर आणि खड्ड्यामध्ये शिल्लक राहते.

Integrated Aquaculture
Indian Agriculture : एकत्र या, शेती टिकेल

मत्स्य शेती

भाताची लागवड केल्यावर चार ते पाच दिवसांनी दर हेक्टरी ५००० ते १०००० मत्स्य बोटुकली सोडावी.

माशांच्या जाती निवडताना प्रामुख्याने भारतीय कार्प, जिताडा, शिप्रीनस, तिलापिया (नर) यांचा विचार करावा.

जेवढे दिवस खाचरात पाणी राहील तेवढे दिवस मत्स्य शेती करता येते.

साधारणतः भातशेतीच्या कालावधीमध्ये तीन ते चार महिने मत्स्य शेती केल्यास जवळपास

२०० किलो मत्स्य उत्पादन मिळू शकते.

Integrated Aquaculture
शेतकरी नियोजन: मत्स्यशेती

मत्स्यसंवर्धन करण्याचे फायदे-

एकाच खर्चामध्ये भात आणि मासे अशी दोन उत्पादने व उत्पन्न मिळू शकतात.

पोषकतेच्या दृष्टीने भाताच्या कर्बोदकांना माशांच्या प्रथिनांची जोड मिळते. म्हणजेच स्वतःच्या कुटुंबांची पौष्टिक आहाराची गरज भागते.

माशांच्या वाढीसाठी वेगळा खर्च करण्याची आवश्यकता नसते. भातशेतीमध्ये वाढणाऱ्या शेवाळावर मासे जगतात.

माशांच्या मलमूत्रांचा उपयोग भात पिकाला खताप्रमाणे होतो.

भात-मासे एकात्मिक शेतीमुळे मिथेन वायू उत्सर्जनाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

भातशेतीमध्ये मत्स्यशेती केल्यास डासांची अंडी व अळी माशांकडून खाऊन टाकली जाते. परिणामी, भात शेती परिसरामध्ये डासांची संख्या वाढत नाही.

भातातील काही किडी व त्यांच्या अवस्था हे माशांचे खाद्य असल्याने त्यांचीही संख्या कमी राहते. त्याचा भात पिकाला फायदा होतो.

कोणती काळजी घ्याल?

भात शेतीमध्ये मत्स्यपालन करताना भात पिकामध्ये कोणत्याही प्रकारची रासायनिक कीटकनाशके, तणनाशके, संजीवके, रासायनिक खते आणि बुरशीनाशकांचा वापर टाळावा.

शक्यतो कीड व रोग प्रतिकारक अशा भात जातींची निवड करावी.

शक्यतो भातासाठी शेणखत, गांडूळ खत व इतर जैविक खतांचा वापर करावा.

भात पिकात आवश्यक तेवढे पाणी राहील याची काळजी घ्यावी.

प्रवीण सरवळे (आचार्य पदवी विद्यार्थी), ९७६७८३८१६५,

(डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com