Agricultural Issues Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Issues : निसर्गाच्या परीक्षेची तयारी करा नीट

Weather Update : निसर्ग आपल्यावर रागवला आहे असे म्हणण्यापेक्षा आपली परीक्षा पाहत आहे असे आपण समजून जमीन आणि पीक पद्धतीचा नव्याने अभ्यास करायला हवा. आपण चांगला अभ्यास केला तर निसर्ग गुरुजींनी ऑक्टोबरमध्ये उगारलेली वेताची छडी पुन्हा उगारली जाणार नाही.

डॉ. नागेश टेकाळे

Weather Issues : नवरात्रात देशातून मॉन्सून परतला. आता मागील तीन दिवसांपासून मॉन्सूनोत्तर पाऊस महाराष्ट्राला झोडपतो आहे. काही धरणांचे दरवाजे पुन्हा उघडले गेले, असे आक्रीत पूर्वी कधी घडले नव्हते. मुसळधार पाऊस आणि गारपिटीने काढणीला आलेली उभी पिके आडवे झाले, अनेक ठिकाणी उभ्या खरिपाबरोबर शेतजमीन वाहून गेली आणि खडक उघडे पडले. सकाळीच एका शेतकऱ्याचा फोन आला. म्हणत होता, ‘‘साहेब, तीन दिवसांपासून पाऊस पडतो आहे, काढणीला आलेले सोयाबीन वाहून गेले, जमिनीत खालचा खडक उघडा पडला आहे, रब्बीला काय पेरू? पंचनामा करावयास कुणी फिरकत नाही, खताचे, पिशव्यांचे कर्ज डोक्यावर आहे. त्या शेतकऱ्याचा फोन झाल्याबरोबर ‘नवऱ्‍याने मारले, पावसाने झोडपले तर दाद कुणाकडे मागणार?’ ही म्हण मला आठवली. दाद मागायची म्हणजे पुन्हा शासन आलेच.

ऑक्टोबरच्या दुसऱ्‍या आठवड्यात माझ्या हाती वातावरण बदल विषयक एक संशोधन अहवाल आला, तो होता आपल्या भूमातेच्या आजारीपणाचा! ओरेगॉन स्टेट विद्यापीठामधील शास्त्रज्ञ प्रो. विल्यम रिपल यांनी वातावरण बदलावर संशोधन करणाऱ्‍या वेगवेगळ्या देशांमधील ३८० शास्त्रज्ञांना एकत्रित करून १९९९ ते २०२३ या २५ वर्षांच्या कालखंडात आपल्या आजारी पृथ्वीची प्रकृती तपासली आणि तिच्या आजारपणाची एक दोन नाही, तर तब्बल ३५ कारणे शोधली. यांपैकी २५ कारणे आज उच्चतम शिखरावर असून, त्यावर वेळेवर उपचार केले नाही, तर पृथ्वीचा विनाश कोणीही थांबवू शकणार नाही. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बायोसायन्स (Bioscience) या संशोधन पत्रिकेच्या एका लेखात या शास्त्रज्ञांनी आपणा सर्वांस या जागतिक आणीबाणीची जाणीव करून दिली आहे.

पृथ्वीच्या प्रदीर्घ आजारपणाच्या काही लक्षणांवर विशेषतः वाढती लोकसंख्या, जंगलतोड, कोळसा आणि तेल उत्पादन, मांसाहाराचे वाढते प्रमाण, मिथेन आणि कर्ब उत्सर्जन, रासायनिक खतांचा वाढता वापर, मानवनिर्मित ऊर्जेचा प्रचंड वापर, भूमातेस शीतलता देणाऱ्या बर्फाचे वेगाने वितळणे, वाढती समुद्री आम्लता, हिमनद्यांचे वेगवान प्रवाह, समुद्र पातळी वाढणे, चक्रीवादळे, प्रदीर्घ दुष्काळ, मुसळधार पाऊस, ढगफुटी, गारपीट, दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरील बर्फाची जाडी कमी होणे, वाहत्या नद्यांचे थांबणे, भूजल खोल जाणे या अशा विविध कारणांवर सविस्तर भाष्य केले आहे जे भविष्यामधील कृषी, ते कसणारे शेतकरी आणि त्यास जोडलेली अन्नसुरक्षा यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

आज प्रतिदिनी भूमातेवर दोन लाख माणसांचे आणि एक लाख सत्तर हजार पाळीव प्राण्यांचे ओझे वाढत आहे. २०२३ मध्ये तब्बल ६.३ दशलक्ष हेक्टर जंगल तोडले गेले. २०२२ च्या तुलनेत ते १.२ दशलक्षाने जास्तच आहे. अक्षय ऊर्जेची गोळी खाऊनही खनिज तेल उत्पादनाचा वापर थांबावयाचे नाव घेत नाही. शहरांचे सोडाच पण ग्रामीण भागात सुद्धा लोकसंख्येच्या दुप्पट वाहने आहेत. आपली पृथ्वी आज प्रचंड वेगाने तापत असून, एकट्या अमेरिकेत १९९९ ते २०२३ या कालखंडात ११७ टक्के जास्त बळी उष्माघाताचे आहेत. मागील वर्षी आशिया खंडात उष्माघाताने हजारो लोक मृत्युमुखी पावले. त्यात आपला देशही अपवाद नाही. या संशोधनातून असे ही सिद्ध होते, की आपल्या भूमातेच्या आजारपणाची २५ कारणे आज उच्चतम पातळीवर पोहोचलेली असली, तरी उरलेली १० कारणे चांगली आहेत असे नव्हे. एकूण काय तर आपली भूमाता आजारी आहे, हे आपणा सर्वांना माहीत होणे गरजेचे आहे. नद्या, ओढे हे आपल्या मातेच्या रक्त वाहिन्या आहेत, पाणी स्वच्छ वाहिले, भूगर्भात मुरले तरच माता निरोगी राहील, जर त्या नद्यांत, ओढ्यात शेतामधील गाळ वाहून आला तर प्रकृती ढासळणार नाही काय? आज कोकणामधील प्रत्येक नदी, खाडी गाळाने भरलेली आहे. कारण गाळ अडविण्यासाठी आम्ही डोंगरावर झाडेच शिल्लक ठेवली नाहीत.

वातावरण बदल, ऑक्टोबरमध्ये कोसळणारा पाऊस, गारपीट यांना भविष्यात सामोरे जावयाचे असेल तर शेतकऱ्‍यांनी रासायनिक आणि सेंद्रिय पद्धतीमधील सुवर्णमध्य काढावयास हवा. पावसामुळे संपूर्ण जमीन वाहून जाणे, खालचा खडक उघडा पडणे म्हणजे आपण ५०० वर्षे मागे गेल्यासारखे आहे. वातावरण बदलामुळे येथून पुढील पावसाचे प्रमाण असेच राहणार हे गृहीत धरले तर आतापासून शेतकऱ्यांनी वाहून गेलेल्या खरिपाबद्दल अश्रू ढाळत बसण्यापेक्षा येणारा रब्बी आणि पुढच्या खरीप हंगामामध्ये या खरिपाची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घ्यावयास हवी. जमिनीला उतार राहणार नाही, जेथे उतार असेल तेथे वाळा अथवा इतर गवत लावायला हवे. शेताचे बांध लहान वृक्षाबरोबरच गवताने मजबूत करावयास हवेत. शेतात सेंद्रिय कर्ब कसा वाढेल, पडणारा पाऊस शेतजमीन खरवडून नेण्यापेक्षा त्याचा प्रत्येक थेंब वावरात कसा मुरेल, याकडे लक्ष द्यावयास हवे. जमिनीमध्ये सेंद्रिय तत्त्व असेल तर मुळे माती धरून ठेवतात. त्यामुळे पीक आणि माती वाहून जात नाही, वाहून आलेली माती ओढ्यातून नदी आणि नंतर समुद्र अथवा धरणात जाणे हे वेदनादायक चित्र आहे.

प्रत्येक शेत जमिनीस पाणी मुरण्यासाठी चर आवश्यक आहेत. पडणाऱ्‍या पावसाचा प्रत्येक थेंब मी माझ्या शेतातच अडवणार, जिरवणार अशी आपली भावना हवी. यासाठी संकरित तसेच पारंपरिक पीक पद्धतीचे मनोमीलन हवे. निसर्ग आपल्यावर रागवला आहे असे म्हणण्यापेक्षा आपली परीक्षा पाहत आहे असे आपण समजून जमीन आणि पीक पद्धतीचा नव्याने अभ्यास करायला हवा. आपण चांगला अभ्यास केला तर निसर्ग गुरुजींनी ऑक्टोबरमध्ये उगारलेली वेताची छडी पुन्हा उगारली जाणार नाही. शास्त्रज्ञ म्हणतात, आपण पृथ्वीला खूप तापवले आहे आणि अजूनही तापवत आहोत म्हणून येणारा काळ कठीण आहे. ‘जेथे अडथळा तेथे मार्ग असतोच’, ही आपली मराठी म्हण सद्य परिस्थितीला योग्य लागू पडते. अडथळ्याच्या दगडाला टेकून हताश होऊन अश्रू ढाळण्यापेक्षा त्या दगडाच्या दोन्हीही बाजूंनी आणि वर चढून नवीन रस्ता शोधणे हे आपला शेतकरीच करू शकतो. एका शेतकऱ्‍याच्या शेतात खूप पाऊस पडला, पीक वाहून गेले, दगड धोंडे उघडे पडले त्याने त्या शेतात धैंचा (हिरवळीचे खत) लावले, पुन्हा पाऊस पडला, भर पावसात शेतकऱ्याने तो धैंचा शेतातच नांगर घालून पाण्यात तुडवला. धैंच्याने शेतजमीन सुपीक केली. पडलेला सर्व पाऊस जमिनीत मुरला. पाऊस थांबला आणि त्या शेतकऱ्‍याने त्या जमिनीवर उन्हाळी मका घेऊन उत्पादनाचे सर्व रेकॉर्ड तोडले. रान वाहून गेले, पाऊस थांबत नाही, आता रब्बी कशा करू, असा विचार मनात आणून थांबू नये. शेतीत जो थांबला तो संपला.

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गावरून सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात जुंपली

Cotton Cultivation : एकात्मिक कापूस लागवड तंत्रज्ञानातून उत्पादकता वाढवणे शक्य

Rabi Season 2024 : यंदा रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

Kolhapur Market : कोल्हापूर बाजारात नागपूर संत्रीची रेलचेल; कांदा आणि टोमॅटो काय दर मिळतोय?

Water Management : सुदूर संवेदन माहितीसाठ्याचा प्रत्यक्ष उपयोग

SCROLL FOR NEXT