Gramsabha
Gramsabha Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Sabha : ग्रामसभेची पूर्वतयारी, कामकाज

Team Agrowon

सुमंत पांडे

Rural Development महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे (Maharashtra Gram Panchayat Act) कलम सात अन्वये ग्रामसभा (Gram Sabha) घेण्याची तरतूद देण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व महसुली गावातील मतदार व्यक्ती या ग्रामसभेच्या सदस्य असतात. किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे.

तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार इतर वेळी देखील ग्रामसभा घेणे बंधनकारक राहील. पहिली ग्रामसभा ही आर्थिक वर्ष (Financial Year) सुरू झाल्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात घेणे आवश्यक आहे.

दोन ग्रामसभांतील अंतर हे ४ महिन्यांपेक्षा जास्त नसावे. ग्रामसभेचे विषय अंतिम करण्याचे अधिकार हे सरपंचांना आहेत. मात्र राज्य शासन, जिल्हा परिषद, पंचायत समितीने सुचविलेले विषय ग्रामसभेत घेणे हे सरपंचांना बंधनकारक आहे.

ग्रामसभेची पूर्वतयारी ः

१) ग्रामसभा घेण्यापूर्वी योग्य ती पूर्वतयारी करणे अत्यंत आवश्यक असते. पूर्वतयारी न करता ग्रामसभा बोलावल्यास उपस्थिती अत्यल्प राहते, घेतलेला निर्णय लोकाभिमुख होणार नाही. यासाठी पूर्वतयारी केल्यानंतरच ग्रामसभा घेणे गरजेचे आहे.

२) ग्रामसभेची नोटीस लेखी स्वरूपात पूर्ण सात दिवस अगोदर देणे आवश्यक आहे. म्हणजे नोटीस काढलेला दिवस व सभेचा दिवस वगळून देणे आवश्यक आहे.

विशेष ग्रामसभेची नोटीस किमान चार दिवस आधी देणे गरजेचे आहे. त्यासाठी देखील नोटीस काढलेला दिवस व सभेचा दिवस वगळून चार दिवस असणे आवश्यक आहे.

३) ग्रामसभेचा प्रसार आणि प्रसिद्धी दवंडीद्वारे गावातील सार्वजनिक ठिकाणी नोटीस लावून करावे. तसेच मोबाईल, एसएमएसद्वारे प्रसिद्धी करता येऊ शकेल. ग्रामसभेची सूचना नोटीस गाव पातळीवरील सर्व शासकीय, निम शासकीय कर्मचाऱ्यांना दिली पाहिजे.

४) ऐन वेळेस घ्यावयाचे विषय लेखी स्वरूपात नियोजित ग्रामसभेच्या तारखेच्या दोन दिवसआधी सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडे देणे आवश्यक असते. ऐनवेळीचा विषय मांडण्यास परवानगी नाकारली तर संबंधितांना कळवावे लागते.

ऐन वेळेच्या विषयामुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्थेत बाधा पोहोचत असेल तरच हा विषय नाकारणे आवश्यक असते.

५) पंचायत सदस्याची जबाबदारी ः प्रत्येक ग्रामसभेपूर्वी सदस्यांनी आपापल्या वार्डातून वार्ड सभा घेणे बंधनकारक आहे. सरपंचाने महिला सभा व पंचायतीची सभा ग्रामसभेच्या अगोदर घ्यावी.

ग्रामसभेचे कामकाज ः

१) ग्रामसभेत १०० किंवा एकूण मतदाराचे १५ टक्के यापैकी जी संख्या कमी असेल ती गणपूर्ती असते. ग्रामसभेचे पदसिद्ध अध्यक्ष ‘सरपंच’ असतात. सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षस्थानी असेल.

सरपंच व उपसरपंच या दोघांच्या अनुपस्थितीत ग्रामसभेच्या दिवशी उपस्थित वयाने सर्वात ज्येष्ठ असलेला पंचायतीचा सदस्य अध्यक्षस्थानी असेल.

२) आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेमध्ये पंचायतीचा मागील आर्थिक वर्षाचा प्रशासन अहवाल जमाखर्चाचे लेखा विवरण, लेखापरीक्षण अहवाल, लेखा परीक्षणात दिलेली उत्तरे व चालू आर्थिक वर्षाचा विकास कार्यक्रम हे विषय घेणे बंधनकारक आहे. हे विषय ग्रामसभेच्या मान्यतेसाठी न ठेवल्यास सरपंचाला पदावरून दूर करण्याची कार्यवाही होऊ शकते.

३) इतर ग्रामसभांमध्ये प्रामुख्याने विकास कामांच्या आराखडा, वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत लाभार्थी निवड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आर्थिक आराखडा, सामाजिक लेखापरीक्षक, आर्थिक खर्चाच्या वर्षाच्या अंदाजपत्रकास मान्यता, विविध योजना आणि नोंदणी घ्यावयाच्या कामांचा समावेश करणे आवश्यक असते.

४) ग्रामसभेचे फोटो, व्हिडिओ (छायाचित्र, चित्रीकरण) काढणे आवश्यक आहे. एका आर्थिक वर्षात सरपंच चार ग्रामसभांपैकी एकही ग्रामसभा घेण्यास चुकल्यास तो कार्यवाही अपात्र होऊ शकतो.

५) ग्रामसभेसाठी मतदारांची आणि महिलांची उपस्थिती वाढविण्यासाठी प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी ग्रामपंचायतीने खबरदारी घ्यावी. ग्रामसभेच्या सर्व सदस्यांनी ग्रामसभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे.

६) ग्रामसभेचे इतिवृत्त पंचायत समितीकडे सात दिवसांत सादर करणे आवश्यक आहे. कोरम अभावी ग्रामसभा तहकूब झाल्यास तहकुबीच्या दिवशीच पुढील सात दिवसांची नोटीस काढून ग्रामसभेचा दिनांक निश्‍चित करावा.

त्या दिनांकास घेण्यात येणाऱ्या तहकूब ग्रामसभेचे कामकाज करण्यासाठी गणपूर्तीची आवश्यकता भासत नाही. मात्र तहकूब ग्रामसभेत ऐन वेळेचे किंवा नवीन विषय घेता येणार नाही.

७) ग्रामपंचायतीमध्ये एका पेक्षा जास्त गावे असल्यास, पहिली ग्रामसभा ग्रामपंचायत मुख्यालयी घेण्यात यावी. पुढील ग्रामसभा इतर गावांच्या नावाचे इंग्रजी वर्णमालेतील अक्षरानुसार क्रमवारीने घेण्यात यावी.

८) ग्रामसभेची इतिवृत्त किंवा कार्यवृत्त विशेष परिस्थितीत ग्रामसभेस ग्रामसेवक उपस्थित नसेल तर सरपंच ग्रामसभेचे कार्यवृत्त लिहिण्यासाठी गावातील कर्मचाऱ्यांपैकी (शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका) शासकीय, निम शासकीय किंवा पंचायत कर्मचारी नियुक्त करेल.

मासिक सभा ः

१) ग्रामपंचायत अधिनियम मासिक सभा कलम ३६ नुसार ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील तरतुदीनुसार प्रत्येक महिन्यात किमान एक मासिक सभा घेणे सरपंच, उपसरपंच यांना बंधनकारक आहे.

२) मासिक सभेची नोटीस सभेपूर्वी किमान पूर्ण तीन दिवस अगोदर ग्रामपंचायतीला देणे गरजेचे आहे. विशेष मासिक सभेची नोटीस किमान एक पूर्ण दिवस अगोदर द्यावी. त्यात ठिकाण व विषय पत्रिकेचा समावेश असावा.

३) विषय पत्रिका अंतिम करण्याचा अधिकार सरपंचांना आहे. तथापि तीन किंवा तीन पेक्षा अधिक सदस्यांनी विषय पत्रिकेत एखादा विषय घेण्याविषयी लेखी स्वरूपात दिल्यास तो विषय पत्रिकेत घेणे सरपंचांना बंधनकारक राहील.

४) मासिक सभेचे पदसिद्ध अध्यक्ष सरपंच हे असतील. सरपंचाच्या अनुपस्थित उपसरपंच हे अध्यक्ष असतील. दोघांच्या अनुपस्थितीत उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांपैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करावी.

मासिक सभेची गणपूर्ती ठरविण्याकरिता १/२ सदस्यांची उपस्थित आवश्यक आहे. ही उपस्थिती मोजताना सरपंच, उपसरपंच यांचा समावेश करावा लागतो.

५) एखाद्या ठरावाची पूर्ती न झाल्यास, अध्यक्ष यांनी सदर ठराव आवाज, हात उचल किंवा गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेऊन अनुरूप कार्यवाही करावी. एखाद्या ठरावास समान मते पडल्यास अध्यक्षांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे.

६) एखाद्या मुद्द्यावर कायदेशीर विवाद होईल, त्या विषयावर ग्रामसेवकांनी स्वतःचे कायदेशीर मत सभावृत्तात नोंदवणे अभिप्रेत आहे.

७) सभेचे कामकाज संपल्यानंतर कार्यवृत्तांत लिहून अध्यक्ष यांच्या सहीने बंद करावा. सदरचा कार्यवृत्तांत ७ दिवसांच्या आत पंचायत समितीमध्ये सादर करण्याची जबाबदारी ग्रामसेवक, सचिव यांच्यावर राहील.

ठरावावर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित अध्यक्ष आणि सचिव ग्रामपंचायतीची राहील. एखाद्या ठरावात बदल किंवा तो रद्द करायचे असल्यास, सदर ठराव तीन महिन्यांनंतर सभेत चर्चा करून बहुमताने बदल किंवा रद्द करण्यात येईल.

८) सभेची गणपूर्ती विहित वेळेत न झाल्यास, अर्धा तास वाट पाहून गणपूर्ती झाली नाही तर अशी सभा तहकूब करण्यात यावी. आणि त्यानंतर पुढील सभेची तारीख, वेळ निश्चित करून सभासदांना तशा सूचना द्याव्यात.

९) ग्रामपंचायतीच्या फलकावर लावावी नोटीस प्रत्येक सदस्यांना देण्याची तरतूद नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Farming : तूर पिकाकडे वाढतो शेतकऱ्यांचा कल

Amarvel Control : सामूहिक प्रयत्नांमधूनच अमरवेल नियंत्रण शक्य

Food Distribution System : अन्नधान्य वितरणासाठी राज्य, केंद्र शासनाच्या योजना

Aquatic Ecosystem : कांदळवने : एक महत्त्वाची जलीय परिसंस्था

Healthy Ambadi : आरोग्यदायी पौष्टिक अंबाडी

SCROLL FOR NEXT