Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Orchard Management : आंबा मोहोरताना घ्यावयाची काळजी

Mango Farming : कोकणाव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड असून, त्यातील ९०% पेक्षा जास्त केसर वाणांचीच लागवड आहे.

डॉ. भगवानराव कापसे

Mango Yield Protection : कोकणाव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड असून, त्यातील ९०% पेक्षा जास्त केसर वाणांचीच लागवड आहे. पूर्वी प्रामुख्याने बहुतांश लागवड ही दहा बाय दहा मीटर किंवा पाच बाय पाच मीटर या अंतरावर केली जात असे. मात्र गेल्या पंधरा वर्षापासून अतिघन लागवडीचे प्रमाण वाढले आहे. अतिघन लागवडीमध्ये ४ ×१२ फूट, ५×१४ फूट असे लागवडीचे अंतर मोठ्या प्रमाणात दिसून येते. अतिघन लागवडीचे तंत्रज्ञान माझ्या २००५ मधील दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये पाहिले होते.

तिथे ५ हजार एकरवर दीड बाय चार मीटर अंतरावरील लागवडीची आणि पंधरा वर्षे वयाची बाग माझ्या पाहण्यात आली होती. हे तंत्रज्ञान आपल्याकडे रुजविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू झाले. शेतकऱ्यांनीही त्याकडे कल दाखवल्यानेच सुमारे १४ ते १५ हजार हेक्टर क्षेत्रावर अतिघन बागा उभ्या राहिल्या. अन्य आंबा वाणांच्या तुलनेमध्ये केसर आंबा एक - दीड महिना लवकर काढणीस येतो. परिणामी बाजारातील सुरुवातीचा चांगला दर पदरी पडतानाच पुढेही बऱ्यापैकी स्थिर दरामुळे आंबा उत्पादकांच्या लाभामध्येही वाढ होते.

आंबा मोहोराची सद्यःस्थिती

खरेतर या वर्षी एव्हाना मोहोर बाहेर यायला सुरुवात होईल असे वाटले होते. मात्र थंडी पडण्यास उशीर झाला. गेल्या चार पाच दिवसामध्ये काही भागांमध्ये थोडीफार थंडी वाढू लागली आहे. काही भागामध्ये अद्यापही मध्ये ढगाळ वातावरण किंवा पावसाची स्थिती राहिली. परिणामी १५ ते २० टक्के मोहोर येतो न् येतो, तोच वातावरणामुळे नवती यायला सुरुवात झालेली आहे. नवतीला रोखून चांगल्या मोहोरासाठी अनेक शेतकऱ्यांनी ०-५२-३४, १३-०-४५ या सोबतच क्लोरमेक्वाट क्लोराईड वाढ नियंत्रकाची फवारणी केलेली दिसून येते.

येथून पुढे थंडी चांगली पडण्याची अंदाज हवामान विभागाद्वारे दिला जात आहे. अशी चांगल्या थंडीची स्थिती राहिल्यास पुढील पंधरा दिवसात चांगला मोहोर बाहेर पडण्याची अपेक्षा आहे. ज्या ठिकाणी पूर्वी ढगाळ वातावरण व पावसामुळे नवतीची वाढ थोड्या फार प्रमाणात दिसत असल्यास क्लोरमेक्वाट क्लोराईड दीड मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे एखादी फवारणी घेता येईल. गरजेप्रमाणे ०-५२-३४ ची ६ ते ८ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे एखादी फवारणी घेतल्यास मोहोरासाठी फायदा होऊ शकतो. आता साधारण जरी थंडी पडली तरी दहा पंधरा दिवसात मोहर बाहेर पडण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल. मोहोर चांगल्या प्रकारे बाहेर पडलेला नसल्यास शेतकऱ्यांनी बागेला पाणी देण्याची घाई करू नये. अगदीच हलकी जमीन असेल पाणी झाडाला ताण पडत असेल, तरच हलके पाणी द्यावे.

येणाऱ्या मोहोराच्या संरक्षणासाठी ....

तुडतुडे : मोहोर निघण्यास सुरुवात होताच तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढतो. त्यांच्या नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम ३ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड तीन मि.लि. किंवा ब्युप्रोफ्रेजिन (२५ एससी) २० मि.लि. प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

भुरी : मोहोर दिसायला सुरुवात झाल्यास लगेच भुरी रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे वरील तुडतुडे नियंत्रणाच्या कीडनाशकासोबत भुरी नियंत्रणासाठी त्यामध्ये ॲझॉक्सिस्ट्रॉबीन (२३ टक्के एससी) दहा मि.लि. किंवा पाण्यात विरघळणारे गंधक (८०% ) २५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करता येईल.

डायबॅक : या वर्षी बागांमध्ये आंबा झाडाच्या फांद्या वाळणे, फांद्या व खोडांना चिरा पडून डिंक निघत असल्याच्या तक्रारी अनेक भागातील शेतकऱ्यांकडून येत आहेत. तसे फोटोही आमच्याकडे पाठवले जात आहेत. सर्वसाधारणपणे त्याला शेतकरी लिंबूवर्गीय बागेतील तत्सम रोगाच्या लक्षणावरून ‘डिंक्या रोग’ असे संबोधत आहेत. हा प्रकार वाढल्यास झाडाच्या फांद्या किंवा संपूर्ण झाड ही अगदी वाळून नष्ट होते. हा रोग मुख्यतः उन्हाळ्यामध्ये बागेस पाण्याचा ताण पडल्यास दिसून येतो.

या पाण्याच्या ताणामुळे खोडाला किंवा फांद्यांना चिरा पडतात व त्यामधून काळसर रंगाचा डिंक बाहेर येतो. हा फांद्यावर अशी स्थिती असल्यास ती फांदी वाळते. मात्र खोडावर त्याचे अधिक प्रमाण असल्यास किंवा संपूर्ण साल काळी पडली असल्यास संपूर्ण झाड वाळण्याचा धोका राहू शकतो. अनेक शेतकरी त्याला खोडकिड्याचा प्रादुर्भाव समजून उपाय करत आहेत. मात्र हा रोग खोडकिड्यामुळे झालेला नाही, हे प्रथम लक्षात घ्यावे.

डिंक्या रोगाच्या नियंत्रणासाठी झाडांच्या फांद्या व खोडावरील जखमा डिंक व्यवस्थित खरवडून साफ कराव्यात. खोडावरील ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावी. वाळलेला पाला, फांद्या कट करून घ्याव्यात. त्यानंतर संपूर्ण झाड, फांद्या, पाने भिजतील अशा प्रकारे कॉपर ऑक्सिक्‍लोराईड तीन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे एक फवारणी घ्यावी. उर्वरित खोडासही पहिला बेचका किंवा सुरुवातीच्या निघालेल्या दोन तीन फांद्यांवरही ९ इंचापर्यंत बोर्डो पेस्ट लावावी.

हे काम वर वर न करता खोडावरील प्रत्येक जखम, सालीच्या शिरेपर्यंत लागेल अशा प्रकारे करावे. बोर्डो पेस्ट तयार करताना मोरचूद एक किलो, कळीचा चुना एक किलो वेगवेगळे मातीच्या भांड्यात भिजवून त्यात दहा लिटर पाणी मिसळावे. यामध्ये अन्य कोणतेही रसायन मिसळू नये. या रोगाचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात बागेला पडलेल्या पाण्याच्या ताणामुळे होतो, हे लक्षात ठेवून उन्हाळ्यात बागेला पाण्याचा ताण पडणार नाही, याकडे लक्ष द्यावे.

खोडकीडा : प्रामुख्याने ज्या बागेमध्ये मशागत व्यवस्थित झालेली नाही, अशा जुन्या आंबा बागांमध्ये याच काळात खोड पोखरणारी अळी (म्हणजे खोडकिड्याचा) प्रादुर्भाव दिसून येतो. ही अळी खोडामध्ये छिद्र करून खालून वरच्या बाजूला हळूहळू पोखरत जाते. तिथे लाकडाचा भुस्सा खाली पडताना दिसतो. या किडीच्या नियंत्रणासाठी त्या छिद्रामध्ये नरम तार खालून वरपर्यंत घालून अळी काढण्याचा प्रयत्न करावा.

त्यानंतर तशाच एखाद्या तारेला कापसाचा बोळा लावून तो ईडीसीपी (इथिलिन डायक्लोराइड कार्बन टेट्राक्लोराईड) मिश्रणामध्ये बुडवून आत ढकलून ठेवावा. हे छिद्र शेण व मातीच्या चिखलाने बुजवून टाकावे. त्यातून तयार होणाऱ्या वाफेमुळे अळी व तिची अंडी मरून जाते. (ॲग्रेस्को शिफारस आहे.)

मालफॉर्मेशन (गुच्छा रोग) : या रोगामध्ये नवतीचे तसेच मोहोराचे रूपांतर गुच्छामध्ये होते. या रोगाचा प्रसार एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर आणि एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पसरत जात असल्याने मोठे नुकसान होऊ शकते. या रोगाच्या नियंत्रणासाठी गुच्छ आलेली फांदी एक - दीड फूट मागून कट करून घ्यावे. हे रोगग्रस्त भाग बागेत न ठेवता बागेबाहेर नेऊन जाळून टाकावेत.

नंतर संपूर्ण झाडावर नॅप्थिल ॲसेटिक ॲसिड (एनएए) २०० पीपीएम (२०० मि.लि. प्रति लिटर पाणी) अधिक कार्बेन्डाझीम एक ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी. पंधरा दिवसाच्या अंतराने पुन्हा एक फवारणी घ्यावी. मात्र हा नवीन लागवड केलेल्या कलमावर जर या रोगाचा प्रादुर्भाव आढळला असल्यास, ते कलमच उपटून नष्ट करावे. त्या ठिकाणी नवे निरोगी कलम लावावे.

आच्छादन : बागेमधील बाष्पीभवन कमी होऊन पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा, यासाठी सेंद्रिय घटकांचे आच्छादन खोडाभोवती थोडे अंतर सोडून आळ्यामध्ये सर्वत्र करावे. कारण अन्न शोषणारी पांढरी मुळे ही खोडापासून थोडी दूर असतात. या आच्छादनाचा आंब्याच्या मुळाच्या परिसरात तापमान योग्य पातळीवर राहण्यास फायदा होतो. अतिघन लागवडीमध्ये दोन ओळीच्या मध्ये आच्छादन केल्यास चालते. मात्र आच्छादनामध्ये वाळवी अथवा अन्य कीटकांचा त्रास होणार नाही, याकडे लक्ष ठेवावे.

थंडीत मोहोराचे संरक्षण : बागेमध्ये मोहोर येण्यासाठी थंडीची अत्यंत आवश्यकता असते. मात्र एकदा मोहोर आल्यानंतर थंडी कमी होणे अधिक फायद्याचे असते. मोहोर उमलताना जास्त थंडी पडल्यास (अगदी तापमान सात अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्यास) मोहोराच्या फुलांमधील परागकण वाहून नेणारी नलिका (पोलन ट्यूब) खराब होऊ शकते. त्यामुळे परागकण खाली गर्भागारापर्यंत (ओहरी) जात नाहीत.

त्यामुळे फळे सेटिंग होण्यास अडथळा निर्माण होतो. पर्यायाने चांगला मोहोर येऊन सुद्धा फळधारणा अत्यंत कमी होते. अशी जास्त थंडी पडली असल्यास बागेत रात्री शेकोट्या पेटवून धूर करणे, रात्री उशिरा (एक - दीड वाजता) बागेला पाणी देणे, मोहोरावर नॅप्थिल ॲसेटिक ॲसिड (एनएए) १५ पीपीएम (१५ मि.लि. प्रति लिटर) प्रमाणे फवारणी घेणे, यासारखे काही उपाय उपयोगी ठरू शकतात.

‘मॅंगो नेट’ साठी नोंदणी : आपण निर्यातयोग्य आंबा उत्पादनासाठी सुरुवातीपासून व्यवस्थापन ठेवावे. निर्यातीसाठी आताच आपल्या बागेची ‘मॅंगो नेट’ मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत करता येते. आपल्या भागातील या अधिकाऱ्याशी आपण संपर्क साधू शकता.

डॉ. भगवानराव कापसे, ९४२२२९३४१९ (लेखक निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

Gokul Milk : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; आता ‘गोकुळ’ निशाण्यावर

Jalgaon Assembly Election Result 2024 : खानदेशात महायुतीची मुसंडी; काँग्रेसचे दिग्गज पराभूत

Rohit Patil NCP-SP : राज्यातला सर्वात तरूण आमदार राष्ट्रवादीचा; वय अवघे...

Maharashtra Assembly Result 2024 : अहिल्यानगर, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा ‘सुपडासाफ’

SCROLL FOR NEXT