Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : मुंबईत मॉन्सून पूर्व पावसाला सुरूवात; पुण्याला झोडपले, कोल्हापुरच्या शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्याच्या विविध भागात मॉन्सून पूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. कोल्हापुरसह पुण्याला मंगळवारी पावसाने झोडपले. बुधवारी (ता. ५) मुंबईसह उपनगरात सकाळी १० च्या सुमारास पावसाने सुरूवात केली. अचानक पाऊस आल्याने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सध्या मुंबईच्या अनेक भागात मॉन्सूनच्या हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत. 

मंगळवारी (ता. ४) राज्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाली. यामुळे राज्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढले होते. दरम्यान दिवसभर ढगाळ वातावरण तयार झाल्याने उष्मा देखील वाढला होता. पुण्यात सायंकाळी ४ वाजेनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, शाहुवाडीसह कागल तालुक्याच्या काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

मुंबईसह उपनगर

बुधवारी सकाळी मुंबईसह उपनगरातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली. मुंबईतील दादर, पश्चिम उपनगरातील कांदिवली, अंधेरी आणि वांद्रे परिसरासह घाटकोपर, वडाळा येथे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे कामावर निघालेल्या अनेकांची तारांबळ उडाली. 

कोल्हापूरात बळीराजाला दिलासा

कोल्हापूर जिल्ह्यात देखील मंगळवारी मॉन्सून पूर्व पावसाने कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरुपात हजेरी लावली. जिल्ह्यातील हातकणंगले, करवीर, शिरोळ, गगनबावडा, शाहुवाडीसह कागल तालुक्यांच्या विविध भागात पाऊस झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे.

पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस 

एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या निकालाची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पुण्याला सुमारे तीन तास मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं. पुण्यातील कोरेगाव पार्क परीसरात झालेल्या मुसळधार पावसाचा मतमोजणीवर देखील परिणाम झाल्याचे समोर आले आहे. येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी सुरू असतानाच पावसाचा जोर वाढल्याने गोडाऊनमध्ये पाणी भरले. 

कसबा पेठ रस्ता बंद तर रस्त्याला नदीचे स्वरूप 

पुण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड झाली. कसबा पेठ सुपेकरवाडा येथे मोठ्या झाडाची फांदी पडल्याने रस्ता बंद झाला होता. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर रस्ता खुला झाला. पुण्यातील कात्रज, धानोरी, विमान नगर परिसराला जोरदार पावसाने झोडपल्याने काही ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. धानोरी चौक रस्ता पूर्णपणे पाण्याखाली होता.

अनेक उड्डाणांवर परिणाम... 

पुण्यातील पावसामुळं विमानांच्या उड्डाणांवर देखील परिणाम झाला. लोहगाव, धानोरी परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे पुणे विमानतळावरून पाच विमानांनाचे उड्डाण एक ते चार तास उशीरा झाले. याचा देहरादून, लखनऊ, दिल्ली, बंगळूरुला जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसला. 

पुणेकरांचा सवाल?

पुणे शहरात पावसाने दाणादाण उडवून दिली. त्यामुळे नागरीकांकडून महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मॉन्सून पूर्व कामांसाठी पुणे पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले होते. मात्र पावसाच्या पहिल्याच झोतात केलेली सर्व कामं वाहून गेल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. धानोरीत मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले. तर अनेक भागांमधील सखल भागातील घरामध्ये पाणी शिरले. त्यामुळे पालिका प्रशासनाने नेमकी कोणती कामे केली? असा प्रश्न पुणेकरांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT