Agro Tourism Agrowon
ॲग्रो विशेष

Agro Tourism : प्रतिभाताईंनी शेतीला दिली ‘सृष्टी’ कृषी पर्यटन केंद्राची जोड

Agro Tourism Centre : काळाची पावले ओळखून जीकठाण (ता. गंगापूर) येथील प्रतिभा किरण सानप यांनी शेतीला कृषी पर्यटनाची जोड दिली आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

संतोष मुंढे
Agro Tourism Business
: काळाची पावले ओळखून जीकठाण (ता. गंगापूर) येथील प्रतिभा किरण सानप यांनी शेतीला कृषी पर्यटनाची जोड दिली आहे. प्रायोगिक तत्त्वावर ‘सृष्टी’ नावाने सुरू केलेले कृषी पर्यटन २१ एकरांपर्यंत विस्तारले आहे. या माध्यमातून ग्रामीण संस्कृती, शेती, पीकपद्धती, शेतीकामांचे साहित्य आदींची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जातो.

छत्रपती संभाजीनगर ते नगर महामार्गालगत जीकठान (ता. गंगापूर) येथे प्रतिभा सानप यांची ६० एकर शेती. मार्केटींगमधून एमबीए व विधी शाखेची पदवी घेतलेल्या प्रतिभाताईंनी शेतीला कृषी पर्यटनाची जोड दिली आहे. एकूण शेतीपैकी २१ एकरांवर कृषी पर्यटन आणि उर्वरित क्षेत्रात हंगामनिहाय पिकांची लागवड. शेतीमध्ये टोमॅटो, वांगी, भेंडी, मिरची इ. भाजीपाला तसेच कपाशी, सोयाबीन, मका, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा इत्यादी पिकांची लागवड केली जाते. त्याशिवाय मोसंबी, केसर आंबा, पेरू, लिंबूच्या बागाही आहे. अशा नानाविध पीकपद्धतीतून कृषी पर्यटनाला येणाऱ्या प्रत्येकाला धान्य, डाळी, भाजीपाल्याची चव चाखता येते.

कृषी पर्यटनाचा श्रीगणेशा ः
साधारणपणे २०१४ मध्ये दुष्काळात शेतीचं काय करायचं, जनावरांचा सांभाळ कसा करायचा हा मोठा प्रश्न प्रतिभा सानप यांच्यासमोर होता. शेतीला जोडून काही करता येईल हा विचार करत असताना कृषी पर्यटनाचा विषय पुढे आला. माहेरी नाशिक येथे वडिलांकडे असलेल्या कृषी पर्यटनाचा वारसा होताच. तोच वारसा आपल्या शेतीत जोपासण्याचा निर्णय प्रतिभा सानप यांनी घेतला. त्यातूनच २०१४ मध्येच ‘सृष्टी कृषी पर्यटन केंद्र’ सुरु केले. पर्यटन केंद्रातील शेतमालाची विक्री ‘कानिफनाथ सृष्टी फार्म’ नावाने करण्यास सुरवात केली.

असा मिळाला प्रतिसाद ः
कृषी पर्यटनाची सुरवात केल्यानंतर पहिल्या वर्षी फक्त तीन शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहलीनिमित्त भेट दिली. हळूहळू पर्यटकांकडून मिळालेल्या अभिप्रायांमधून कृषी पर्यटनात आणखी काय अपेक्षित आहे, याचा आढावा घेत आवश्यक बदल केले. त्यानुसार अनेक बाबी कृषी पर्यटनात नव्याने अंतर्भूत करण्यात आल्या. शेती, पिकांच्या माहिती सोबत पर्यटनाचा आनंद मिळू लागल्याने शाळा तसेच कौटुंबिक सहलींची संख्या हळूहळू वाढत गेली. गतवर्षी केंद्राला भेट देणाऱ्या सहलींची संख्या ४०० वर पोचली होती.

गृहसंस्कृती दर्शविणारा ‘पाटील वाडा’
पर्यटन केंद्रात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा ‘पाटील वाडा’ आहे. वाड्याच्या दर्शनी भागात ओसरी, अंगणात मोठा वृक्ष, त्याखाली शंकरबाबांची मूर्ती, तुळस, परसबाग असं सारं काही जुन्या प्रशस्त घराचं दर्शन घडवितं. वाड्याच्या दर्शनी भागात सिंहासनावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती व बाजूला ठेवलेली तोफ विशेष लक्ष वेधते.

कृषी पर्यटनाची वैशिष्ट्ये ः
पर्यटकांना बैलगाडी, ट्रॅक्‍टर, यांच्या सफारी तसेच रेन डान्स इत्यादींचा आनंद घेता येतो. तसेच कुंभाराच्या हातून प्रत्यक्ष मातीची भांडी कशी तयार केली जातात हे पाहता येते. जोडीला पारंपरिक खेळ जसे की, विटीदांडू, पतंग, लगोरी आदी खेळण्याचा आनंद मुलांना घेता येतो. केंद्राच्या जवळून वाहणाऱ्या नाल्याच्या ठिकाणी हरणांचा वावर असतो. पर्यटकांना हरणे दाखविण्यासाठी बैलगाडी किंवा ट्रॅक्टरद्वारे डीअर राइड घडविली जाते.
विविध सणांच्या निमित्ताने सृष्टी कृषी पर्यटनात वर्षभर विविध कार्यक्रमांचे, उत्सवांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने रंगपंचमी, कोजागरी, हुरडा महोत्सव, २६ जानेवारीला भरविली जाणारी गावरान जत्रा, पतंग महोत्सव यांचा प्रामुख्याने उल्लेख करता
येईल.

गोपालनास सुरवात ः
मराठवाड्यातील गायी तसेच खिलार बैलांचे दुष्काळात संगोपन करण्याचा मोठा प्रश्न होता. त्यावर प्रतिभाताईंनी कृषी पर्यटन केंद्रात गाईसाठी मुक्‍तसंचार गोठा उभारत गोपालन करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे लहान-मोठ्या मिळून ३५ गायी आणि ४ खिलार ४ बैल आहेत. गोठ्यातून उपलब्ध होणारे गोमूत्र आणि शेणखत शेतीमध्ये वापरले जाते. त्यामुळे रासायनिक निविष्ठांवर नियंत्रण मिळवून जमिनीचा पोत सुधारण्यास फायदा झाल्याचे प्रतिभाताई सांगतात.

‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेतून शेतमाल विक्री ः
शासनाच्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेच्या माध्यमातून उत्पादित शेतमाल, तयार केलेल्या डाळी व इतर शेतीमालाची मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांत विक्री होते. सध्या त्यांच्याशी मोठ्या शहरांतील साधारण १ हजार ग्राहक कायमस्वरूपी जोडले गेले आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार धान्य, भाजीपाला, डाळी, तूप, लोणचे इ. साहित्य पाठविले जाते. सर्व उत्पादनांची विक्री कानिफनाथ सृष्टी फार्म या नावाने होते.

शेतीची प्रतिकृती ः
कृषी पर्यटन केंद्रात साधारण एक गुंठे क्षेत्रामध्ये आदर्श शेतीची प्रतिकृती करण्यात आली आहे. त्यामध्ये विविध पिके, त्यांची पेरणी पद्धती, त्याशिवाय शेती कामांस लागणारी सर्व औजारे आदींची वैशिष्ट्यपूर्ण रचना दिसून येते. सहलीनिमित्त किंवा पर्यटकांसोबत येणाऱ्या लहान मुलांना या ठिकाणी विविध शेती कामे पारंपरिक औजारांच्या मदतीने कशा पद्धतीने केली जातात, याची प्रात्यक्षिके दाखविली जातात. ही लहान मुलांसाठी विशेष आणि आकर्षणाची बाब ठरते.

बोटॅनिकल गार्डन, फळबाग, भाजीपाला लागवड ः
कृषी पर्यटन केंद्रात बोटॅनिकल गार्डन उभारण्यात आले आहे. त्यात औषधी व घरगुती वापराच्या वनस्पतींसह जवळपास १०० प्रकारच्या वनस्पती आहेत. मराठवाड्यासाठी नावीन्यपूर्ण असणारी स्ट्रॉबेरी आणि काजूसारख्या पिकांची लागवडही केली आहे. याशिवाय ४ एकरांत केसर आंबा तर ३ एकरांत लिंबूच्या बागा तसेच दोन वर्षांपूर्वी मोसंबी आणि पेरूची लागवड केली आहे. टोमॅटो, वांगी, भेंडी, मिरची ही भाजीपाला पिके हंगामानुसार क्षेत्र बदलून घेतली जातात. मागील दोन वर्षांपासून मल्चिंगवर या पिकांची लागवड होत आहे. उत्पादित भाजीपाला कृषी पर्यटनासाठी आलेल्या लोकांच्या जेवणामध्ये केला जातो. उर्वरित शेतमालाची बाजारात विक्री होते.

रोजगाराच्या संधी ः
सानप यांच्या सृष्टी कृषी पर्यटनासह प्रयोगशील शेतीतून अनेकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला आहे. वर्षभर ५० तर हंगामात जवळपास १०० लोकांना रोजगार मिळतो. वर्षभर सरासरी ६० ते ७० लोकांच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार मिळतो आहे.

सिंचनाचे काटेकोर नियोजन ः
‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून संपूर्ण शेती ठिबकखाली आणली आहे. सिंचनासाठी चार शेततळी, ३ बोअरवेल, १ विहीर आणि टेंभापूरी प्रकल्प व जायकवाडीच्या बॅकवॉटरमधून पाइपलाइनद्वारे पाणी आणले आहे. कृषी सिंचनासाठी सोलार पॅनल बसविल्यामुळे शेतीच्या वीजेचा प्रश्न निकाली निघाला आहे.

रोपवाटिकेची जोड ः
सृष्टी कृषी पर्यटन, कानिफनाथ कृषी फार्म यालाच सृष्टी रोपवाटिकेची जोड देण्यात आली आहे. या रोपवाटिकेत २० ते २५ प्रकारची फळपिकांची रोपे, २० ते २५ फुलझाडांची रोपे, ५० प्रकारची शोभिवंत झाडांची रोपे, औषधी वनस्पतींची रोपे ग्राहकांसाठी उपलब्ध केली जातात.
-------------
- प्रतिभा सानप, ९८२३२५८१३२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT