Carrot Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Carrot Crop Disease: गाजर पिकातील भुरी रोग

Powdery Mildew in Carrots: गाजर पिकावर भुरी (पावडरी मिल्ड्यू) रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा रोग वेळीच रोखण्यासाठी त्याची कारणे, लक्षणे आणि नियंत्रण उपाय जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Team Agrowon

राहुल वडघुले

Carrot Farming Tips: नाशिक भागातील सायखेडा, शिंगवे, सुकेना या भागामध्ये गाजर हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गाजर या पिकामध्ये अनेक बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. यामध्ये मुख्यत: सर्कोस्पोरा, अल्टरनेरीया, सॉफ्ट रॉट, पावडरी मिल्ड्यू, जीवाणूजन्य रॉट इत्यादी महत्त्वाचे रोग दिसून येतात. हे टाळण्यासाठी या रोगांची ओळख, लक्षणे माहिती असणे गरजेचे आहे.

आजच्या लेखात गाजर या पिकातील भुरी (पावडरी मिल्ड्यू) या रोगाविषयी माहिती घेऊ. या रोगाला पावडरी मिल्ड्यू असेही म्हणतात. रोगाच्या प्रादुर्भावामुळे गाजर पिकाचे शेत अक्षरशः पांढरे दिसून येते. कोरडे वातावरणात रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो.

रोगाची ओळख

रोगाचे नाव : भुरी रोग (Powdery Mildew)

शास्त्रीय नाव : Erysiphe heraclei

रोगाचे कारण : हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.

किंगडम : Fungi

डिव्हिजन : Ascomycota

बुरशीची वैशिष्ट्ये : ही बुरशी Ecto parasite असते. म्हणजे या बुरशीचे तंतू पानाच्या आतमध्ये न जाता वरील भागात राहून सोंडेसारख्या (Haustorium) टोकदार  अवयवामार्फत झाडामधून अन्नद्रव्ये शोषण करतात.

परजीवी प्रकार : ही बुरशी Obligate या प्रकारात येते. ही बुरशी ज्या पिकावर वाढते, त्या पिकास जिवंत ठेऊन त्यातील अन्नद्रव्ये शोषण करते. बुरशीचे संपूर्ण जीवनचक्र एकाच यजमान पिकावर पूर्ण होते.

यजमान पिके : ओवा, शेपू, कोथिंबीर.

नुकसान : या रोगामुळे पिकाचे २० टक्के पर्यंत नुकसान होऊ शकते.

लक्षणे

रोगाची लक्षणे पाने, फांदी यावर दिसून येतात. सुरवातीला जुन्या पानांवर लक्षणे दिसून येतात. नंतर नवीन पानांवर व फांद्यांवर देखील लक्षणे दिसतात.

पानांवर पांढरी ते राखाडी रंगाची पावडर पडल्यासारखी बुरशीची वाढ दिसून येते. ही वाढ डाऊनी मिल्ड्यू सारखी फुललेली नसते, तर पानाला चिटकून असते.

रोगाची तीव्रता जास्त असेल, तर ही वाढ पानाच्या खालील बाजूस देखील दिसते. अशीच वाढ फांद्यांवर देखील दिसून येते.

या रोगामुळे संपूर्ण पान पांढऱ्या रंगाचे दिसतात. जोपर्यंत ही बुरशी जिवंत असते, तोपर्यंत ती जागा पांढरी दिसते. जेव्हा बुरशी नियंत्रणात येते, तेव्हा ती जागा काळसर तांबूस रंगाची दिसते व पाने जळून जातात.

पोषक वातावरण

हा रोग कोरड्या वातावरणात डिसेंबर नंतर आढळून येतो. पानांवर पाणी असल्यावर बिजाणूंचे अंकुरण होत नाही. त्यामुळे रोगाची लागण होण्यासाठी पाने कोरडी असणे आवश्यक असते.

तापमान २० ते ३५ अंश सेल्सिअस, सकाळी व सायंकाळी जास्त आर्द्रता असे वातावरण या रोगासाठी अतिशय पोषक असते. अशा वातावरणात बीजाणू अंकुरण चांगले होते.

पाण्याचा ताण आलेल्या झाडांवर रोगाची तीव्रता अधिक दिसून येते. सावलीमधील झाडांवर जास्त आणि लवकर प्रादुर्भाव होतो.

रोग निर्माण कसा होतो?

गाजर पीक शेतात नसताना या रोगाचे तंतू व बीजाणू इतर यजमान पिकांवर, मातीमध्ये किंवा इतरत्र जिवंत राहतात. पिकाची योग्य अवस्था व पोषक वातावरण तयार झाल्यानंतर रोगाचे बीजाणू व तंतू मार्फत पिकावर रोग निर्माण होतो, याला ‘प्राथमिक लागण’ असे म्हणतात. त्यानंतर बुरशी मोठ्या प्रमाणात अलैंगिक बिजाणुंची (Conidia) निर्मिती करते. या बिजाणुंच्या मार्फत रोगाचा

पुढील प्रसार होतो. याला ‘दुय्यम लागण’ असे म्हणतात. भुरी रोग लैंगिक व अलैंगिक दोन्ही प्रकारचे बीजाणू तयार करतात. लैंगिक बिजाणुंना ‘क्लिस्तोथेसिया’ म्हणतात व अलैंगिक बिजाणुंना ‘कोनिडीया’ असे म्हणतात. यजमान पीक नसते, तेव्हा लैंगिक बीजाणू हे सुप्तावस्थेत जाऊन जिवंत राहतात. यजमान पीक आल्यावर ते पुन्हा पिकावर रोगाची प्राथमिक लागण करतात.

नियंत्रणाचे उपाय

लागवडीसाठी प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी.

रोगग्रस्त पाने काढून बागेतून बाहेर नेऊन नष्ट करावीत.

पिकास पाण्याचा ताण पडणार देऊ नये.

सिंचनासाठी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.

जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.

रोगासाठी पोषक वातावरणात तयार होताच शिफारशीत बुरशीनाशकांचा वापर करावा.

गाजराच्या पानांवर पाणी थांबत नाही. त्यामुळे फवारणी प्रभावी होण्यासाठी फवारणी द्रावणात चिकटद्रव्याचा वापर करावा.

फवारणी कव्हरेज चांगले होण्यासाठी फवारणीसाठी जास्त पाणी मात्रा वापरावी.

सूक्ष्मदर्शिकेखाली काय दिसते ?

सूक्ष्मदर्शिकेखाली रोगाच्या बुरशीचे पृष्ठ भागावर पसरलेले तंतू आणि अलैंगिक बीजाणू (कोनिडीया) स्पष्टपणे पाहू शकतो. बीजाणू हे दंड गोलाकार रंगहीन, पारदर्शक असतात. हे बीजाणू, बीजाणूदंडावर साखळी सारखे एकमेकांवर एक असे असतात. त्या बिजाणूंमध्ये एक ते दोन रिक्तिका (Vacuoles) असतात. या कोनिडीयाची लांबी ०.०३१ ते ०.०५१ मिलिमीटर, तर रुंदी ०.०१ ते ०.०२ मिलिमीटर इतकी असते.

- राहुल वडघुले, ९८८११३५१४०

(लेखक कृषी रसायन क्षेत्रातील कंपनीमध्ये तांत्रिक अधिकारी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT