Sugarcane Disease  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Disease : उसावर दिसतोय पोक्का बोंग, तांबेराचा प्रादुर्भाव

Sugarcane Crop Protection : प्रतिकूल हवामानामध्ये सध्याच्या काळात ऊस पिकामध्ये पोक्का बोंग, तांबेरा, गवताळ वाढ आणि यलो लिफ डिसीज या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Team Agrowon

डॉ. जी. एस. कोटगिरे, डॉ. बी. एच. पवार

Sugarcane Crop Management : प्रतिकूल हवामानामध्ये सध्याच्या काळात ऊस पिकामध्ये पोक्का बोंग, तांबेरा, गवताळ वाढ आणि यलो लिफ डिसीज या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगांची लक्षणे तपासून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

पोक्का बोंग ः

१) बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यावर सुरुवातीला तिसऱ्या, चौथ्या पानांच्या बेचक्यात पांढरट, पिवळसर पट्टे दिसतात. रोगाचा प्राथमिक प्रसार हवा, पाण्याद्वारे होतो.

२) सुरकुत्या पडून पाने आकसतात, लांबी घटते. तीव्रता वाढल्यास पाने सडतात. गळून पडतात किंवा एकमेकांत गुरफटतात.

३) कांड्यांवर कांडी काप (नाइफ कट) सारखी लक्षणे दिसून येतात.

नियंत्रणाचे उपाय :

- माती परीक्षणानुसार योग्य प्रमाणात रासायनिक खतांची मात्रा द्यावी.

- शेंडेकुज झालेले, पांगशा फुटलेले ऊस शेतातून वेगळे काढून जाळून नष्ट करावेत.

बुरशीनाशक फवारणी ः (प्रति लिटर पाणी)

- २ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा

- १ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा

- ३ ग्रॅम मॅम्कोझेब

टीप ः १० दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात.

तपकिरी तांबेरा ः

- वाढती आर्द्रता आणि तापमान रोगकारक बुरशीची वाढ आणि प्रसारासाठी पोषक असते.

- सुरुवातीस लहान व लांबट पिवळे ठिपके पानाच्या खालच्या बाजूस दिसून येतात. कालांतराने ठिपक्यांची लांबी वाढते. त्यांचा रंग लालसर तपकिरी किंवा तपकिरी दिसून येतो. ठिपक्यांचा भाग बुरशी आणि बीजाणूंच्या वाढीमुळे फुगीर होतो. त्यामुळे पानांचा ठिपक्यालगत भाग फुटून त्यातून नारिंगी किंवा तांबूस-तपकिरी रंगाचे बीजाणू बाहेर पडतात.

- रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार पावसाळ्यानंतर ढगाळ वातावरण, जास्त आर्द्रता व थंड हवा असताना जास्त प्रमाणात दिसून येतो. रोगाचा प्रसार हवा, पाण्याद्वारे होतो.

नियंत्रणाचे उपाय :

- रोगाचा प्रादुर्भाव असणाऱ्या भागात मध्यम कोव्हीएसआय ०३१०२, व्हीएसआय ०८००५ या रोग प्रतिकारक जातींची लागवड करावी.

- खतांची मात्रा माती परीक्षणानुसार योग्य वेळी द्यावी. नत्रयुक्त खते तसेच इतर खतांची मात्रा उशिरा देऊ नये. पावसाळ्यात शेतातून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

बुरशीनाशकाची फवारणी ः (प्रति लिटर पाणी)

- प्रोपिनेब २.५ ग्रॅम किंवा

- मॅम्कोझेब ३ ग्रॅम

टीप ः १० दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात. रोगाचा जास्त प्रादुर्भाव असेल तर फवारणीपूर्वी रोगग्रस्त आणि वाळलेली पाने शेताबाहेर काढावीत.

गवताळ वाढ ः

- दूषित बेणे आणि मावा, तुडतुडे किडीद्वारे प्रसार होतो.

- सुरुवातीच्या काळात बेटात प्रमाणापेक्षा जास्त फुटवे दिसतात. बेटास गवताच्या ठोंबाचे स्वरूप येते.

- पानांमध्ये हरितद्रव्य कमी प्रमाणात तयार होते. पाने पिवळी, पांढरी पडतात. पाने अरुंद व आखूड होतात.

- पूर्ण वाढ झालेल्या उसामध्ये पोंग्यातील पाने पिवळी पडतात. कांड्यावरील डोळ्यातून पिवळसर पांगशा फुटतात. रोगट ऊस पोकळ पडून वाळतो.

- खोडवा पिकात रोगाचे प्रमाण सुरुवातीच्या काळात जास्त आढळते.

नियंत्रणाचे उपाय ः

- रोगमुक्त बेणे लागणीसाठी निवडावे.

- १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम १०० लिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणात बेणे १५ मिनिटे बुडवून त्यानंतर लागवडीसाठी वापरावे.

- पिकाची पाहणी करून रोगट बेटे काढून जाळून नष्ट करावीत.

- रोगाचा प्रसार करणाऱ्या मावा, तुडतुडे या किडींच्या नियंत्रणासाठी ०.३ मिलि इमिडाक्लोप्रीड प्रति लिटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात.

येलो लिफ डिसीज ः

- हा विषाणूजन्य रोग आहे. बेण्याद्वारे देखील हा रोग पसरतो. खोडवा पिकात जास्त प्रमाण आढळते.

- ७ ते ८ महिन्यांच्या पिकांमध्ये सुरुवातीस पानाची मध्यशीर खालच्या बाजूने पिवळी पडते. प्रथम ३ ते ६ क्रमांकाच्या पानांवर लक्षणे दिसतात. कालांतराने पिवळेपणा मध्यशिरेपासून बाजूस वाढत जाऊन पूर्ण पान पिवळे पडते. हळूहळू उसाची सर्व पाने पिवळी पडतात. शेंड्याकडून पाने वाळत जातात.

- काही वेळेस रोगग्रस्त पाने शिरेलगत लालसर दिसतात. किडींचा प्रादुर्भाव, अतिथंडी तसेच अन्नद्रव्यांच्या ताणामुळे रोगाची तीव्रता दिसते.

नियंत्रणाचे उपाय ः

- बेणे बदलासाठी तीन स्तरीय बेणेमळा करावा. पायाभूत बेणेमळ्यासाठी जास्तीत जास्त उतिसंवर्धित रोपांचा वापर करावा.

- पीक ताणग्रस्त राहणार नाही याची काळजी घ्यावी.

- रोगाचा प्रसार करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी या किडींच्या नियंत्रणासाठी ०.३ मिलि इमिडाक्लोप्रीड प्रति लिटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात.

संपर्क ः डॉ. जी. एस. कोटगिरे, ९८२२८३४२४७

(उती संवर्धन विभाग, वसंतदादा साखर संस्था, मांजरी, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळद सोयाबीनचे भाव टिकून; कापसात चढ उतार, हरभरा भाव दबावातच तर गव्हाची आवक वाढली

Gramrozgar Sevak Strike: ग्रामरोजगार सहायकांचा बेमुदत संप सुरू

Water Levels Drop: जलसंकटाची चाहूल! देशातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा ४५ टक्क्यांच्या खाली

Mango Farmer Demands: आंबा बागायतदारांना हेक्टरी दोन लाख रुपये द्या

Water Projects Issues: पाझर तलावाची दुरुस्ती निधीअभावी रखडली

SCROLL FOR NEXT