Solapur News : सोलापुर जिल्ह्यात पाऊस कमी प्रमाणात झाल्याने धरणात पाणीसाठा कमी आहे. आज धरणातील पाणीसाठा लक्षात घेता पिण्याचे पाणी, जनावरांसाठी लागणारे पाणी व चारा या बाबींना प्राधान्य देऊन ग्रामीण भागात कोणत्याही गावात पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी संबंधित विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिल्या.
संभाव्य पाणी व चाराटंचाई सदृश परिस्थिती निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी पंढरपूर व मोहोळ तालुक्याची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. या वेळी बैठकीस प्रांताधिकारी सचिन इथापे, अजिंक्य घोडगे, तहसीलदार सचिन लंगोटे, सचिन मुळीक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, गटविकास अधिकारी आनंद मिरगणे, नायब तहसीलदार मनोज श्रोत्री आदी उपस्थित होते.
या वेळी उपजिल्हाधिकारी नाटेकर म्हणाले, की तालुक्यात निर्माण होणारी संभाव्य पाणी व चाराटंचाई लक्षात घेऊन त्या संदर्भात तत्काळ उपाययोजना संबंधित यंत्रणेने कराव्यात. जून अखेर पिण्याचे पाणी पुरेल, जनावरांना चारा उपलब्धता या दृष्टीने नियोजन करावे. टंचाई कालावधीत ज्या ठिकाणावरुन पाण्याची उपलब्धता होणार आहे, त्याची निश्चिती करून सोर्स मॅपिंग करावे, प्रगतिपथावर असलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे, विंधन विहीर खोलीकरण करावे,
ज्या भागात सार्वजनिक विहिरी या आटल्या असतील अशा ठिकाणी खासगी विहिरी अधिग्रहित कराव्यात, असेही ते म्हणाले. या बैठकीत चारा उपलब्धतेची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. एम. जाधव यांनी दिली. ग्रामीण पाणीपुरवठ्याचे उपअभियंता पांडव यांनी कासेगांव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तांत्रिक कारणांमुळे सद्यःस्थितीत बंद असून,
ती तत्काळ सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. या वेळी पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजना, टँकरची मागणी होणारी गावे, जल जीवन मिशनमधून करण्यात आलेल्या उपाययोजना, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे, जनावरांच्या तुलनेत चाऱ्याची स्थिती याबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला.
बेकायदा पाणी उपसा करणाऱ्यावर गुन्हा
लवकरच उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार असून, हे पाणी शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी भीमा नदीकाठचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. बेकायदा पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून संबंधित साहित्य जप्त करण्यात येणार आहे. त्याच बरोबर आरक्षित पाणी साठ्याचा अवैध उपसा होऊ नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना महसूल उपजिल्हाधिकारी नाटेकर यांनी या वेळी दिल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.