Garlic Pest and Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Garlic Disease Management : लसूण पिकावरील कीड-रोग व्यवस्थापन

Garlic Pest Infestation : लसूण पिकामध्ये तपकिरी करपा, पांढरी कुज हे दोन रोग, तर फुलकिडे (थ्रिप्स टॅबॉसी), कोळी (ईरीओफाइड माइट्स), सूत्रकृमी (डायथेलेनचस डिस्पसॅकी) या किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने होतो. त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच नियंत्रणाचे उपाययोजना राबवाव्यात.

Team Agrowon

डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. राजीव काळे, डॉ. प्रांजली गेडाम

Garlic Crop Disease : सूत्रकृमी (डायथेलेनचस डिस्पसॅकी)

सूक्ष्म आकाराच्या कृमी लसणाच्या खोडालगत पेशींमध्ये शिरतात. पेशींचा भाग पोखरतात. मग तो भाग भुसभुशीत बनतो, सडतो आणि त्याला वास येतो. खोडाचा भाग सडल्यामुळे रोप सहजगत्या उपटून येते आणि मुळाचा भाग तसाच जमिनीत राहतो. सूत्रकृमींच्या बंदोबस्तासाठी पिकाची फेरपालट हा अत्यंत प्रभावी उपाय आहे.

पालक, गाजर, मोहरी, किंवा धान्य पिके यांचा फेरपालटात वापर करावा. पाकळ्या लावण्यापूर्वी फॉरमॅलीन (१ टक्का) आणि डिटर्जंट (०.१ टक्का) या द्रावणात ३० मिनिटे बुडवून घ्याव्यात. द्रावणाचे तापमान ३० अंश सेल्सिअस इतके ठेवावे. ही प्रक्रिया सूत्रकृमींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वापरली जाते. परंतु ही प्रक्रिया तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी, अशी शिफारस कांदा व लसूण संशोधन संचालनालयाद्वारे केली जाते.

जांभळा करपा

हा रोग अल्टरनेरिया पोराय या बुरशीमुळे होतो. पानांवर सुरुवातीला खोलगट लांबट, पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांचा मधला भाग जांभळा आणि नंतर काळपट होतो. असे अनेक चट्टे एकमेकांना लागून पडल्यामुळे पाने काळी पडतात आणि वाळतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब २.५ ते ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. फवारणी द्रावणात चिकटद्रव्याचा वापर जरूर करावा.

तपकिरी करपा

हा रोग स्टेमफिलियम व्यॅसिकरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. पानांवर पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पडतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात. पिकांच्या बाल्यावस्थेत हा रोग आल्यास रोपांची वाढ खुंटून गड्डा लहान राहतो. प्रसंगी पूर्ण रोप मरते. या रोगाच्या नियंत्रणासाठी, दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब २.५ ते ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. फवारणी द्रावणात चिकटद्रव्याचा वापर जरूर करावा. त्यामुळे पानावर रसायने चिटकून राहतात व त्याची परिणामकारकता वाढते.

पांढरी कुज

हा रोग स्केलेरोटियम सेपिव्होरम या बुरशीमुळे होतो. ही बुरशी जमिनीत वाढते. लागण झालेल्या रोपांचा गड्डा कुजतो. पाने पिवळी पडून रोपे कोलमडतात. गड्डा तयार झाल्यानंतर उशिरा रोगाची लागण झाल्यास साठवणीत गड्डा सुकतो, तसेच पोचट होतो. या रोगाच्या बंदोबस्तासाठी पिकाची फेरपालट करावी. लागवडीसाठी निरोगी बियाणे वापरावे. लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मा एकरी ३ किलो या प्रमाणात वाफ्यात मिसळावे.

फुलकिडे (थ्रिप्स टबासी)

फुलकिडे कांद्याप्रमाणे लसूण पिकातही मोठे नुकसान करतात. पूर्ण वाढलेली कीड आणि त्यांची पिले पानांतून रस शोषून घेतात. त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे पडतात. पाने वाकडी होऊन नंतर वाळतात. या किडीची पिले आणि प्रौढ दिवसा पानाच्या बेचक्यात लपून राहतात आणि रात्री पानातून रस शोषतात.

कोरड्या हवामानात या किडींची वाढ मोठ्या प्रमाणात होते. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांमध्ये या किडींचा उपद्रव जास्त होतो. पिकाच्या बाल्यावस्थेत मोठा उपद्रव झाला तर गड्डे पोसत नाहीत. प्रसंगी पूर्ण रोप मरते. फुलकिडीच्या नियंत्रणासाठी दर १२ ते १५ दिवसांनी फिप्रोनील १ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे चिकटद्रव्यासह मिसळून आलटून पालटून फवारावे.

फुलकिड्यांनी पानावर केलेल्या जखमांमधून जांभळा करपा आणि तपकिरी करपा यांच्या बुरशीचा शिरकाव पानामध्ये सहज होतो. परिणामी, या रोगांचे प्रमाण वाढते. या बुरशींचे नियंत्रण होण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० टक्के डब्ल्यू.पी.) २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.

कोळी (ईरिओफाइड माइट्स)

ही कीड लसणाच्या पानांमधील रस शोषून घेते. त्यामुळे पाने आत वळतात आणि वाकडी होतात. रोपांची वाढ खुंटते आणि गड्डा लहान राहतो. गड्डे तयार झाल्यानंतर ज्या रोपांवर कोळी या किडीचा उपद्रव झाला नाही असे गड्डे बियाण्यांसाठी वापरावेत.

काढणी, साठवण व विक्री

लसणाचे पीक साधारणपणे १२० ते १५० दिवसांत काढणीस तयार होते. गड्ड्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर पानांची वाढ थांबते. पाने पिवळी पडतात आणि शेंडे वाळतात. जमिनीच्या लगत मानेचा भाग मऊ होऊन पाने जमिनीवर पडतात. मानेमध्ये लहानशी गाठ तयार होते. यालाच ‘लसणी फुटणे’ असे म्हणतात. पाने पूर्ण वाळण्यापूर्वी लसणाची काढणी करावी. लसूण लहान कुदळीने किंवा खुरपीने खोदून काढावा.

गड्ड्यांची प्रतवारी करावी. तसेच २० ते ३० सारख्या आकाराच्या गड्ड्यांची जुडी बांधावी, पानांची वेणी बांधून घ्यावी. अशा जुड्या १० ते १५ दिवस सावलीत सुकवाव्यात. त्यानंतर साठवण करावी. साठवणीसाठी खेळती हवा असलेल्या साठवणगृहाचा वापर करावा. वेण्या बांधलेला लसूण बांबूवर टांगून ठेवला तर चांगला टिकतो.

माल जास्त असेल तर लसणाचे ३ ते ४ फूट व्यासाचे आणि ४ फूट उंचीचे गोलाकार ढीग रचून ठेवावे. लसणाच्या गड्ड्याचा भाग ढिगाच्या बाहेरच्या बाजूवर आणि पानांचा भाग आतल्या बाजूवर अशाप्रकारे जुड्या एकमेकांवर गोलाकार रचाव्यात. दोन ढिगांमध्ये फिरण्याइतके अंतर ठेवावे. त्यामुळे हवा खेळती राहून साठवण चांगली होते. साठवणीपूर्वी साठवणगृहात कार्बेन्डाझिमची फवारणी करावी.

अशा पद्धतीने लसूण ५ ते ६ महिने चांगला टिकून राहतो. विक्री करताना मानेचा भाग आणि मुळांचा भाग कापून घ्यावा. गड्ड्यांची प्रतवारी करावी. पोचट झालेले, पिवळे पडलेले किंवा काळी बुरशी वाढलेले गड्डे वेगळे काढावे. गड्डे २५ किलो क्षमतेच्या जाळीदार बॅगमध्ये भरून विक्रीसाठी तयार करावे.

०२१३५ - २२२०२६

(कांदा व लसूण संशोधन संचालनालय, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्‍यात

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

SCROLL FOR NEXT