Farmers' Literature Conference Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers' Literature Conference: शेतीचे चित्रण साहित्यातून प्रभावीपणे व्हावे: सरोजताई काशीकर

Farmer Issues in India: शेतकऱ्यांच्या व्यथा, ग्रामीण भागातील बदल आणि सरकारी धोरणांचे परिणाम प्रभावीपणे साहित्यातून मांडले जावेत, अशी अपेक्षा माजी आमदार सरोजताई काशीकर यांनी जयसिंगपुरातील अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात व्यक्त केली. या संमेलनात शेतकरी समस्यांवर परिसंवाद, गझल मुशायरा आणि कवी संमेलन आयोजित करण्यात आले.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News: सरकारी धोरणांसह विविध कारणांनी शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे, याचे चित्रण साहित्यातून होणे ही तुमची-आमची एकत्रित जबाबदारी आहे, शेतकऱ्याला यातून बाहेर काढण्यासाठी त्यांची वेदना प्रभावीपणे मांडणारे साहित्यिक तयार व्हावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ शेतकरी नेत्या, माजी आमदार सरोजताई काशीकर यांनी शनिवारी (ता.८) येथे जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे व्यक्त केली.

शेती अर्थ प्रबोधिनी, शरद कृषी महाविद्यालय, व यड्रावकर शिक्षण व उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन झाले. या वेळी संमेलनाध्यक्षा म्हणून त्या बोलत होत्या.

माजी आमदार काशीकर म्हणाल्या, की ग्रामीण भागाचे पूर्वीचे चित्र बदलले आहे. मुले शहरांकडे नोकरीसाठी धाव घेत आहेत, कुटुंबव्यवस्था कमकुवत बनते आहे. गावागावांत शिक्षण, अर्थव्यवस्था आणि कुटुंबसंस्था यावर नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. साहित्यिकांनी या प्रश्‍नांवर प्रकाश टाकणे आवश्यक आहे.

संमेलनाचे उद्‌घाटक ॲड. वामनराव चटप यांनी सरकारी धोरणावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, की आज खुल्या आर्थिक धोरणांमुळे कोणताही पदार्थ परवडेल त्या किमतीने कुठेही विकला जातो. पण ते स्वतंत्र शेतीमालाला नाही. शेतीमालाच्या किमती वाढू लागल्या की त्याच्या विक्रीवर निर्बंध आणून शेतकऱ्याचे खच्चीकरण केले जाते.

अशा धोरणांमुळे शेतकऱ्याला तोट्यात शेतीमाल विकावा लागतो. त्याचे अर्थकारण बिघडून जाते. सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी तो आत्महत्येसारखा पर्याय स्वीकारतो. जे शेतकरी विरोधी कायदे आहेत, त्याचा समाचार आपल्याला या साहित्याच्या लेखणीतून घ्यायचा आहे. आता लेखणीनेच जागृती घडवावी लागेल.

स्वागताध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, की हे संमेलन शेतकऱ्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकते आणि त्यांच्या साहित्याला मंच प्रदान करते. विदर्भ व मराठवाड्यात सातत्याने होत असलेले संमेलन यंदा येथील शेतकऱ्यांसाठी पश्‍चिम महाराष्ट्रात घेतले आहे.

कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी यापूर्वी झालेल्या शेतकरी संमेलनांचा आढावा घेतला. संमेलनाच्या माध्यमातून शेतकरी प्रश्‍नांवर सखोल चर्चा होऊन प्रश्‍न सुटावेत या अपेक्षेने या संमेलनाचे आयोजन केल्याचे सांगितले. ॲड. सतीश बोरुळकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती सांगितली. सूत्रसंचालन मनीषा रिठे यांनी केले.

सकाळी ग्रंथ दिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. दुपारच्या सत्रात ‘पश्‍चिम महाराष्ट्राची शेतीतंत्र आणि मंत्र’ या विषयावर परिसंवाद झाला. डॉ. राजेंद्र कुंभार, डॉ. वसंतराव जुगळे, डॉ. जालंदर पाटील यांचा सहभाग होता. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांची उपस्थिती होती. यानंतर कवी संमेलन झाले. सायंकाळच्या चौथ्या सत्रात ‘शेतीला वारंवार कर्जमुक्ती कशाला हवी’ या विषयासह ‘शेतीचा एकच आधारस्तंभ फक्त चौथा स्तंभ’ या विषयावर परिसंवाद झाला.

संमेलनात सहभागी सर्वच वक्त्यांनी शेतकऱ्यांचा कळवळा आहे, असे सांगत निवडून आल्यानंतर शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्या राज्यकर्त्यांविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. शेतीप्रश्‍नांचा वापर फक्त राजकीय फायद्यासाठी होत असल्याबद्दल संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याची टीका या वेळी करण्यात आली.

आज संमेलनात...

संमेलनाचा आज (ता. ९) अंतिम दिवस आहे. सकाळी ‘शेतकरी भक्ती प्रभात’ हा कार्यक्रम होईल. ‘शेतकरी गझल मुशायरा’ हा कार्यक्रम दिवाकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यामध्ये राज्यभरातून दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. समारोपीय सत्रात अतिथी म्हणून सावकार मादनाईक, कैलास तवार, रमेश खांडेभराड उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Blockchain Technology: कृषी पुरवठा साखळीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान

Cotton Farming: कपाशीच्या शाश्‍वत उत्पादनासाठी काटेकोर नियोजनावर भर

Rural Banks: गरिबांना अखेर वाली तो कोण?

Bogus Agriculture Inputs: बनावटगिरीला हवा कायद्याचा धाक

Agriculture Support: भीज पावसामुळे ऊस, तरकारी पिकांना नवसंजीवनी

SCROLL FOR NEXT