Matar Production Agrowon
ॲग्रो विशेष

Matar Production : सासवडच्या शेतकऱ्यांचा मटार उत्पादनात हातखंडा

Green Pea Production : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका व सासवड, सिंगापूर हे पट्टे वाटाणा अर्थात मटारसाठी प्रसिद्ध आहेत. सध्या या तालुक्यांतून पुणे बाजार समितीमध्ये आवक सुरू झाली आहे.

Ganesh Kore

गणेश कोरे

Matar Farming : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका व सासवड, सिंगापूर हे पट्टे वाटाणा अर्थात मटारसाठी प्रसिद्ध आहेत. सध्या या तालुक्यांतून पुणे बाजार समितीमध्ये आवक सुरू झाली आहे. पावसाच्या पाण्यावर तसेच दोन महिन्यांत येणारा व कमी देखभाल खर्च असलेला वाटाणा घेण्याकडे या भागातील शेतकऱ्यांचा कल आहे.

ज्वारीसारख्या पिकांसाठी बेवड म्हणूनही तो चांगला असल्याचे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. पुणे जिल्ह्यातील पुरंदर हा अवर्षणग्रस्त तालुका आहे. तालुक्यातील सासवड, सिंगापूर हे पट्टे अंजीर, सीताफळ, पेरू या पिकांसाठी ओळखले जातात.

अर्थात ही झाली दीर्घ कालावधीची फळपिके; पण त्यांच्याबरोबरच कमी कालावधीचा सासवडचा मटार (वाटाणा) देखील चांगलाच प्रसिद्ध आहे. तालुक्यात कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार खरिपात मटारखाली सुमारे अडीच हजार हेक्टर आहे.

सासवड, गराडे, कोडीत, हिवरे, बोपगाव, चांबळी, सुपे, दिवे, काळेवाडी, वाघापूर, सिंगापूर, राजेवाडी, आंबळे, टेकवडी, माळशिरस, पोंढे आदी गावांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. चवीला गोड असलेल्या वाणांना शेतकरी व ग्राहकांकडून चांगली मागणी असते.

मटार पिकात हातखंडा

सिंगापूरचे ज्येष्ठ शेतकरी माऊली कोरडे यांचा अनेक वर्षांपासून या पिकात हातखंडा तयार झाला आहे. जसा मी शेतीत आलो, तेव्हापासून हे पीक करीत असल्याचे ते सांगतात. माऊली दरवर्षी दोन ते तीन एकरांत मटार घेतात.

उन्हाळ्यामध्ये शेत नांगरून ठेवल्यानंतर खरिपाच्या तोंडावर एकरी एक ट्रॉली शेणखत किंवा कोंबडी खत वापरतात. त्यानंतर जूनमध्ये पाऊस आल्यानंतर ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली जाते. एकरी ४० किलो बियाणे लागते.

साधारण ४० ते ४५ दिवसांनी पीक फुलोऱ्यात आल्यानंतर किडी- बुरशींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गरजेनुसार एक ते दोन फवारण्या घेतल्या जातात. माऊली सांगतात, की फायद्याचे पीक म्हणून आम्ही मटारकडे पाहातच नाही.

मुळात हे पावसावरचे पीक आहे. शिवाय ते कमी कालावधीचे म्हणजे दोन महिन्यांत येणारे पीक आहे. या पिकानंतर ज्वारीची लागवड करायची असते. त्यासाठी रान लवकर मोकळे करून देणारे हे पीक आहे. मुख्य म्हणजे त्याचा बेवड चांगला असतो. आज ज्वारीचे एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन आम्ही घेतो. पाऊस चांगला झाला, पाण्याची सोय असली, तर मटार काढणीनंतर कांदा देखील घेतो.

उत्पादन व बाजारपेठ

एकूण पीक कालावधीत साधारण तीन तोडे होतात. पहिल्या दोन तोड्यांमध्ये २००, ३०० पासून ३५० किलोपर्यंत तर तिसऱ्या तोड्यांत थोडे कमी व एकूण एकरी एक टनांपर्यंत उत्पादन मिळते. यंदा पावसाने सुरुवातीच्या हंगामात ताण दिला.

आत्तापर्यंत ८०० किलोपर्यंत उत्पादन हाती लागले आहे. दर यंदा थोडे जास्त म्हणजे प्रति किलो ६५ ते ७० रुपयांपर्यंत आहेत. दरवर्षीचा विचार केल्यास किमान ४० रुपये व काही परिस्थितीत हे दर १०० रुपयांपर्यंत देखील मिळाले आहेत.

यंदा लवकर पक्व होणारा व त्यानंतर १० ते १२ दिवसांनी पक्व होणारा असे दोन वाण दोन टप्प्यात घेतले आहेत. मटाराला वाघापूर व पारगाव चौफुला येथे बाजारपेठा आहेत. या भागात फळे खरेदीसाठी व्यापारी येत असतात. त्यामुळे वाटाणा खरेदीही बांधावर केली जाते. याशिवाय पुणे, मुंबई या देखील बाजारपेठा आहेतच.

जगदाळेंचा अनुभव

पुरंदर तालुक्यात पश्‍चिम घाट परिसर असलेल्या बोपगावमध्ये संतोष जगदाळे हे परंपरेने मटारचे उत्पादन घेतात. या भागात पूर्व भागापेक्षा अधिक पाऊस असतो. हा विचार करून पावसातही चांगल्या प्रकारे येऊ शकेल, अशा वाणाची लागवड त्यांनी २० जूनच्या दरम्यान केली आहे.

उत्पादन आता अखेरच्या टप्प्यात असून, दोन तोड्यांमध्येच हंगाम संपत असल्याचे ते म्हणाले. पुरंदर भागात दोन प्रचलित वाणांचीच मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मात्र, ती कमी पावसाच्या पट्ट्यात होते. पश्‍चिम भागात आता तिसऱ्या वाणाची लागवड शेतकरी करू लागले आहेत.

त्याचे दाणे तुलनेने अधिक गोड असल्याने ग्राहकांकडून जास्त मागणी असते. त्याच्या शेंगेत सात ते आठपर्यंत दाणे असतात. व्यापारी बांधावरच किलोला ६० ते ७० रुपये दर देऊन खरेदी करत असल्याने बाजार समितीमधील वाहतूक, हमाली, तोलाई आदी खर्च वाचत आहे.

जगदाळे दिवाळी हंगामातही दोन एकरांत मटार घेतात. हवामानाने साथ दिल्यास एकरी दीड ते दोन टनांपर्यंत उत्पादन व एका वाणाचा उतारा तुलनेने रब्बी किंवा कमी पावसात अधिक चांगला मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. यंदा महिन्याभरापासून असलेल्या संततधार पावसामुळे पाणी साठून राहिल्याने उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे त्यांनी सांगितले.

मटारचे पुणे मार्केट

गुलटेकडी- पुणे बाजार समितीमधील प्रमुख अडतदार बापू वाडकर म्हणाले, की येथे खरिपात प्रामुख्याने पुरंदर, पारनेर, वाई, सातारा आदी भागांमधून मटारची आवक होते. हा हंगाम साधारण ऑगस्टपर्यंत असतो. दररोज दोन ते अडीच टन आवक हंगामाच्या प्रारंभी असते.

ती वाढून पुढे १० ते १२ टनांवर पोचते. किलोला ५० ते ८० रुपये दर असतो. पाऊसमानानुसार त्यात फरक होतो. कमाल तो १०० रुपयांवरही जातो. हा हंगाम संपल्यानंतर सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये कर्नाटक (बेळगाव, धारवाड), मध्यप्रदेश येथून मटारचा हंगाम सुरू होतो. यावेळी दररोज साधारण १५ ते २५ ट्रक मालाची आवक होते.

यावेळी किलोला ३० ते ५० रुपये दर असतो. हा हंगाम सुमारे दोन महिने चालतो. या आवकेत हंगाम संपल्यानंतर हिमाचल प्रदेश आणि पंजाबातून आवक होते. त्यास ३० ते ५० रुपये दर मिळतो.

पुरंदर तालुक्यात विविध ठिकाणी फ्रोझन वाटाण्याचे उद्योग उभे राहात आहेत. स्थानिक मटारला ५० रुपयांपेक्षा अधिकचा दर असल्याने प्रक्रियेसाठी तो परवडत नाही. त्यामुळे १५ ते २० रुपये प्रति किलो दराने मध्यप्रदेशातून थेट खरेदी होते, असे वाडकर यांनी सांगितले.

संपर्क-

माऊली कोरडे- (मटार उत्पादक)- ९८८१८७९५१४
संतोष जगदाळे- (मटार उत्पादक)- ९६९७९८९५८२
बापू वाडकर -(व्यापारी)- ९८५०६६१४३०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT