Mokhada News : दोन-तीन दिवसांपासून परतीचा पाऊस मोखाड्यात मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे परिपक्व व कापणीला आलेले उभे पीक शेतातच आडवे झाले आहे. तर शेतात कापून ठेवलेले पीक पावसाच्या पाण्याने तरंगू लागले आहेत. हे पीक काळे पडून कुजण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यासमोर वाया जात असल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहे.
मोखाड्यात वर्षभरात एकमेव केवळ खरीपाचे पीक घेतले जाते. या पिकाच्या उत्पन्नावरच येथील शेतकऱ्यांना वर्षभर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. तालुक्यात खरीपाचे १२ हजार ७५९:५६ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये नागली चार हजार ३२२, वरईचे तीन हजार ८८५:७४ आणि भाताचे दोन हजार १५:७६ या मुख्य नगदी तृणधान्य पिकाचे १० हजार २२३ : ५० हेक्टर क्षेत्र आहे.
त्या खालोखाल उडीद, कुळीद, तूर या कडधान्याचे एक हजार ७८८:२६ हेक्टर क्षेत्र आहे. तर भुईमूग, सूर्यफूल, खुरासणी आणि तिळ या गळीत धान्याचे ७४७ : ८० हेक्टर क्षेत्रावर मोखाड्यात यंदाच्या पावसाळ्यात शेती करण्यात आली आहे.
यंदा शेतीला उपयुक्त पाऊस बरसल्याने पिके जोमाने आली आहेत. आता ही पिके परिपक्व झाली असून कापणीचा हंगाम सुरू झाला आहे. अशातच लांबलेल्या परतीच्या पावसाने मोखाड्यात तीन दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे.
रोजच विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कापणीला आलेले उभे पीक शेतातच आडवे झाले आहे. शेतात कापून वाळवत ठेवलेले पीक पावसाचे पाणी शेतात साचल्याने ते पाण्यावर तरंगू लागले आहे.
वैरणीचा प्रश्न
पीक भरघोस आल्याने शेतकरी आनंदला होता; मात्र परतीच्या पावसाने हा आनंद हिरावून घेतला आहे. हाती आलेले पीक पावसामुळे काळे पडू लागले आहे. भाताचा पेंढाही कुजण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पुढे जनावरांच्या वैरणीचा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे.
निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने तातडीने नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी.- जितेंद्र हमरे, शेतकरी
परतीच्या पावसाने उभे असलेले परिपक्व पीक; तसेच कापून ठेवलेल्या पिकाचे नुकसान होणार आहे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीकविमा घेतलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती कृषी विभाग अथवा विमा कार्यालयात तातडीने द्यावी. ज्यांनी पीकविमा काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकाला नुकसानीची माहिती द्यावी.- आकाश सोळुंखे, तालुका कृषी अधिकारी, मोखाडा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.