Orange Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Subsidy : संत्रा अनुदान म्हणजे पार्टी फंड देणाऱ्यांचे हित जपण्याची तरतूद !

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : वरातीमागून घोड्यांचा आदर्श सांगत राज्य सरकारने हंगाम संपल्यानंतर संत्रा उत्पादकांसाठी निर्यात अनुदानाची घोषणा केली. पणनमंत्र्यांनी १७० कोटी रुपयांचे हे अनुदान व्यापाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला.

या धोरणात कमी दरात संत्रा विकणाऱ्या संत्रा बागायतदारांचा कोठेच विचार न झाल्याने सरकार केवळ पार्टी फंड देणाऱ्यांचे हित जपत असल्याचे सिद्ध होते, अशा संतप्त प्रतिक्रिया या पार्श्‍वभूमीवर संत्रापट्ट्यात उमटत आहेत.

राज्यात सर्वाधिक एक लाख हेक्‍टर संत्रा लागवड क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे. राज्यातील एकूण लागवड क्षेत्राच्या माध्यमातून सुमारे पाच लाख टन संत्रा उत्पादन होते. त्यातील दीड लाख टन संत्रा निर्यात एकट्या बांगलादेशला होत असल्याने संत्रा दर तेजीत राहत होते. मात्र यंदाच्या हंगामात बांगलादेश सरकारने आयात शुल्कात प्रति किलो ८८ रुपये अशी वाढ केली. त्याच्या परिणामी भारतातून होणारी संत्रा निर्यात मंदावली.

सरासरीच्या दीड लाख टनावरून ती थेट ४० हजार टनांवर पोहोचल्याचे संत्रा बागायतदार संघाकडून सांगण्यात आले. बांगलादेशमधील निर्यात प्रभावित झाल्याचे कारण देत स्थानिक व्यापाऱ्यांनी कमी दरात संत्रा खरेदीचा सपाटा लावला. त्याच्या परिणामी उत्पादकता खर्चाची भरपाई देखील संत्रा बागायतदारांना शक्‍य झाली नाही.

याविषयी ओरड झाल्यानंतर पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी १७० कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले. हे अनुदान व्यापाऱ्यांना दिले जाणार असल्याने त्याचा बागायतदारांना कोणताच फायदा होणार नाही. उलट व्यापाऱ्यांनी कमी दरात संत्रा खरेदी करुन त्यावर नफा मिळवीत विक्री केली. त्यांनाच आता अनुदान दिले जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये या उफराट्या धोरणाविषयी संताप व्यक्‍त केला जात आहे.

आयात शुल्क वाढीआड व्यापाऱ्यांनी कमी दरात संत्रा खरेदी केला आणि तो भारताच्या विविध राज्यांत आणि बांगलादेशातही त्यांना परवडणाऱ्या दरात विकला. आता त्यांनाच १७० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्यांचेच हित जपल्या जाईल, असा सूचक इशारा या माध्यमातून सरकारने दिला आहे.
- ॲड. धनंजय तोटे अध्यक्ष, महाराष्ट्र संत्रा बागायतदार संघ
आंबिया बहर सप्टेंबरपासून सुरू होत डिसेंबर अखेरपर्यंत राहतो. जानेवारी अखेरपासून मृग बहारातील फळे मिळतात. त्यामुळे १७० कोटी रुपयांचे अनुदान मृग बहराकरिता मिळाले पाहिजे. त्यातून व्यापाऱ्यांऐवजी शेतकरी हित कसे जपले जाईल हे पाहणे क्रमप्राप्त होते. त्याकरिता संत्रा संघांशी चर्चा करण्याची गरज असताना शासनाने हा घाईत घेतलेला आणि बागायतदारांवर अन्याय करणारा निर्णय असल्याचे स्पष्ट होते.
- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT