Pune News : सध्या राज्यासह केंद्र सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यात महायुती सरकारला विरोधकांकडून शेती प्रश्नावरून घेरलं जात आहे. यादरम्यान सोमवारी (ता.१) लोकसभेतही विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शाब्दिक चकमक उडाली. राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलन आणि पिकांच्या हमीभावाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. तर राहुल गांधी यांच्या टीकेला प्रतिउत्तर देताना शिवराजसिंह यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. तसेच भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव देत आहे. मात्र, विरोधी पक्षातील नेते अपप्रचार करत असल्याचा टोला लगावला. यावरून संसदेचे वातावरण काही काळ चांगलेच तापले होते.
संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शेतकऱ्यांचे आंदोलन, पीक हमीभाव, हरियाणा सीमेवरील रस्ते बंद यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. महागाई, गॅस सिलिंडरच्या किंमत, नीट परीक्षा, अग्निवीर आणि इतर मुद्द्यांवर राहुल गांधींनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी राहुल गांधी म्हणाले, तुम्ही शेतकऱ्यांना घाबरवण्यासाठी ३ नवीन कायदे आणले. जे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी भासवण्याचे काम केले. मात्र प्रत्यक्षात शेतकरी विरोधी ३ कायदे अदानी-अंबानींच्या फायद्याचे आहेत. सरकारचे शेतकरी विरोधी भूमिकेमुळे भारतातील सर्व शेतकरी उभा झाला असून आजपर्यंत रास्ता रोको करत आहेत. पण शेतकरी ज्या रस्त्याने जात आहेत ते बंद केले जात आहेत. हरियाणात दोन ठिकाणी रस्ता बंद केला आहे. अजूनही सरकारला शेतकऱ्यांशी बोलायला वेळ नाही. उलट गृहमंत्री अमित शाह शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आतंकवाद म्हणतात, असे राहुल गांधी म्हणाले.
तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून देखील राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. देशातील जनतेला अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर सरकारला दिसत नाही. कर्ज माफ केले जात नाही. मात्र देशातील उद्योगपतींचे अब्जावधींचे कर्ज माफ केले जाते. शेतकऱ्यांच्या पिकाला देखील योग्य हमीभाव दिला जात नाही. जर शेतकऱ्याच्या पिकास योग्य दर मिळाला तर त्याला कर्ज घेण्याची आणि सरकारी योजनांची गरज पडणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
नीट मुद्द्यावर वाद
यावेळी नीटच्या परीक्षेच्या तयारीसाठी अनेक वर्षे विद्यार्थी घालवतात. यासाठी त्याचे कुटुंब त्याला आर्थिक आणि भावनिक आधार देत. पण आज नीटचे पेपर फुटत आहेत. त्यामुळे नीट परीक्षेवर विद्यार्थ्यांचे विश्वास राहिलेला नाही. विद्यार्थ्यांना नीट परीक्षा श्रीमंत लोकांसाठी असून गरीबांसाठी नसल्याचे वाटतं असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
शिवराजसिंह यांची तिखट प्रतिक्रिया
यावरून कृषीमंत्री शिवराजसिंह यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. शिवराजसिंह म्हणाले, विरोधी पक्ष संसदेत चुकीची माहिती देत आहे. आमच्या सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव दिला आहे. सध्या पिकांच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के अधिक रकमेचा हमीभाव दिला जात आहे. सरकारने काहीच दिवसांपूर्वी १४ १४ पिकांचे हमीभाव जाहिर केले. त्यात आम्ही पिंकाचे हमीभाव वाढवले आहेत. राहुल गांधी यांनी त्याच्या सरकार काळात हमीभाव किती होता आणि शेतकऱ्यांचे किती पीक खरेदी केले याची माहिती द्यावी. उगाचक सभागृहाची दिशाभूल करू नये, असं कृषीमंत्री शिवराजसिंह यांनी राहुल गांधी यांच्या टीकेवर उत्तर दिलं आहे.