Farmers Loan Waiver : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही राज्यातील शेतकऱ्यांनी कर्ज भरावे असे वक्तव्य केले. अजित पवार यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी चांगलेच महायुती सरकारला धारेवर धरलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांची पेरणीपूर्ण कर्जमाफी करण्याचे आव्हान दिलं. टिळक भवन येथे बुधवार (ता.०२) पत्रकार परिषदेत महायुती सरकारवर सपकाळ यांनी निशाणा साधला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, "शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार व लाडकी बहिणींना १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्याचे जाहीर आश्वासन महायुतीने दिले होते. पण आता त्यांची भाषा बदलली आहे. ३१ मार्चपूर्वी कर्ज भरण्याचे फर्मान काढले जाते हा प्रकार राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा गजनी झाल्याचा प्रकार आहे. पण पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर त्यांनी केंद्र सरकार कडून विशेष पॅकेज आणावे." असे आव्हान सपकाळ यांनी दिले.
"अर्थसंकल्पीय अधिवेशन कोणताही महत्वाचा निर्णय न घेताच गुंडाळला. मोठी मोठी भाषणे केली पण त्यांना त्यांच्याच जाहिरनाम्याचा विसर पडला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात नटसम्राट शिरला होता पण ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असे वर्णन अधिवेशनाचे करावे लागेल. जनतेचे मुलभूत प्रश्न सोडून औरंगजेबाची कबर उकरून काढण्यात आली. बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला भाव याचा विसर महायुती सरकारला पडला आहे. सरकारने जाणीवपूर्वक मुद्द्यांना बगल दिली". अशी घाणाघाती टीका सपकाळ यांनी सरकारवर केली.
राज्यातील पाण्याच्या स्थितीवर सपकाळ म्हणाले की, "खडकपूर्णा डाव्या कालव्याच्या पाण्यासाठी तरुण शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केली. त्यामुळे, क्या हुआ तेरा वादा? अशी विचारणा जनता करत आहे". असेही सपकाळ म्हणाले.
अदानींसाठी जमीनी लाटण्याचा प्रकार
वक्फ सुधारणा विधेयकवर सपकाळ यांनी विरोधकांवर निशाणा साधला, "संविधान सभेत नियम तयार होत असतानाच जमिनीचे काही विशेष अधिकार दिलेले आहेत. मंदिर, प्रार्थना स्थळे यांना जमिनी दिल्या आहेत, इनाम जमिनी देण्यात आल्या आहेत, महाराष्ट्रात छत्रपतींच्या वारसांनाही जमिनीचे विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. परंतु भाजपा सरकार वक्फ विधेयकाकडे धार्मिक नजरेने पाहून ती जमीन ताब्यात घेऊन उद्योगपती व बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे का? धारावीची जमीन अदानीच्या घशात घातली आहे. शक्तिपीठ मार्गाच्या नावाखाली कोकणपट्टा अदानी अंबानीला देण्याचा घाट घातला जात आहे." असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.