Milk Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : केवळ ११८ उत्पादकांना मिळाले दुधाचे अनुदान

Team Agrowon

Mumbai News : ‘‘राज्यातील ४० ते ५० लाख दूध उत्पादकांपैकी केवळ ११८ उत्पादकांना पाच रुपये दूध अनुदानाचा लाभ मिळाला आहे. दुग्धव्यवसाय विभागाने तयार केलेल्या ॲपमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यावरून शेतकऱ्यांत असंतोष आहे. त्यामुळे सहकारी दूध संघांमार्फत अनुदान वितरित करावे, अशी मागणी जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी गुरुवारी (ता. २९) विधानसभेत केली.

अर्थसंकल्पीय भाषणात बोलताना त्यांनी दूध अनुदानाबरोबरच राज्य सरकारने मागील अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या जोतिबा तीर्थक्षेत्र प्राधिकरण आणि यशवंतराव होळकर वाड्या-वस्त्या जोड रस्ते योजना सुरू न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

कोरे म्हणाले, ‘‘अर्थसंकल्पीय तरतूद करतो पण तो खर्च होत नाही. त्यामुळे तो निधी परत जातो. असा किती निधी परत गेला आणि पुरवणी मागणीतून किती पैसे दिले याचाही लेखाजोखा मांडला पाहिजे. अर्थसंकल्पात पंचामृत मांडण्यात आले. मात्र, त्यातील काही योजना सुरुच झाल्या नाहीत.

त्या चांगल्या असूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. जोतिबा प्राधिकरण, यशवंतराव होळकरांच्या नावाने वाड्या-रस्तेजोड योजना आणली पण या दोन्ही योजना सुरू केलेल्या नाहीत. ‘नमो’ योजना सुरू करून शेतकऱ्याला सहा हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून वंचित ठेवले जात आहे.’’

कोरे म्हणाले, ‘दूध अनुदान देताना त्यात पारदर्शकता आणावी, यासाठी ॲप तयार केले. या ॲपवर जनावराचा नंबर, आधार कार्ड नंबर नमूद करावा लागतो. ही माहिती भरल्यानंतर शेवटी ॲपवर त्रुटी दाखवून अर्ज स्वीकारला जात नाही. त्यामुळे केवळ ११८ उत्पादकांना अनुदानाचा फायदा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत असंतोष आहे.’’

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही डुप्लिकेट आणा : वडेट्टीवार

मुख्यमंत्र्यांची बनावट सही करून शेरे मारण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी विधानसभेत उमटले. ‘‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील डुप्लिकेट आणा. दिव्याखाली अंधार असतो पण इतका अंधार कधी असत नाही,’’ अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टोले लगावले.

मुख्यमंत्री शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून त्याची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या बनावट सह्याप्रकरणी मरिन लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, ‘‘ मुख्यमंत्री कार्यालयात यापूर्वीही विशेष कार्यकारी अधिकारी सहा महिने तोतया म्हणून कार्यरत होता. हा गोंधळ बघता राज्यात किती अनागोंदी सुरू आहे, हे सर्व जनतेला दिसत आहे.’’ यावर अजित पवार म्हणाले, ‘‘या प्रकरणी तपास सुरू आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT