Nashik Onion Farmers : अंबासन तालुक्यात तीन ते चार दिवसांपासून सलग अवकाळी पावसाने बहुतांश ठिकाणी हजेरी लावल्याने (डोंगळे) बीज कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतातील साठवून तयार असलेला कांदा भिजल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. याशिवाय मजुरांचा अभाव असल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा अजूनही जमिनीतच अडकून पडला आहे.
कसमादे परिसराला बीज कांदा उत्पादनासाठी महत्त्वाचे आगर मानले जाते. मात्र यंदा कांद्याच्या पिकाला सुरुवातीपासूनच नैसर्गिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लागवडीच्या काळात अवकाळी पाऊस व थंडीमुळे उगवणशक्तीवर परिणाम झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव झाला.
रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या रासायनिक औषधांची फवारणी करावी लागली, परिणामी उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. या वर्षी परागीकरणही अपेक्षेप्रमाणे न झाल्याने बीज उत्पादनात घट होणार हे आधीच स्पष्ट झाले होते. त्यातच ऐन काढणीच्या काळात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे.
कांदा पिकाचे उत्पादन भरभरून होईल आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांना भाबडी आशा होती, परंतु या अनपेक्षित पावसामुळे त्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विजांचा कडकडाटही सतत सुरू असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शासनाने लक्ष घालावे
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून आर्थिक नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. पीकविमा योजना असली तरी त्याचे लाभ वेळेवर व पूर्ण मिळत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने या संकटाचा गांभीर्याने विचार करून वेगळ्या निधीतून मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.