
Chhatrapati Sambhajinagar Farmers : ‘शेतकऱ्यांना गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी. नांदुर मध्यमेश्वरसह अन्य प्रकल्पांतून सिंचनासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या आवर्तनाच्या वेळा पाळल्या जाव्यात. खतांच्या लिंकिंगबाबत कारवाई करताना ती खत कंपन्यांवरही करावी. ॲग्रीस्टॅक नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, अशा सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केल्या.
खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक सोमवारी (ता. १२) जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट, इमाव कल्याण, दुग्ध विकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, अंबादास दानवे, राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आमदार राजेश राठोड, आमदार संजय केणेकर, विधानसभा सदस्य आमदार रमेश बोरनारे, आमदार प्रशांत बंब, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजना जाधव, आमदार विलास भुमरे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील तसेच अन्य संबंधित विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. जिल्ह्याच्या खरीप हंगामाचे नियोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी देशमुख यांनी सादर केले.
आमदार प्रशांत बंब यांनी, बोगस बियाणे वा खते कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मात्र त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली. आमदार रमेश बोरनारे यांनी, खतांचे लिंकिंग होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची सूचना केली.
आमदार संजना जाधव यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतकऱ्यांच्या कुटुंबास लाभ मिळावा यासाठी अटी शिथिल कराव्यात, अशी सूचना केली. आमदार अनुराधा चव्हाण यांनी ॲग्रीस्टॅकसाठी गावपातळीवर माहिती पोहोचवावी यासाठी मोहीम राबविण्याची सूचना केली.
खासदार डॉ. काळे यांनी, खतांचे लिंकिंग करणाऱ्यांवर कारवाई करावी. पीककर्ज ३० जूनपर्यंत वाटप करावे, अशा सूचना केल्या. खासदार भुमरे यांनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील शेतकऱ्यांकडे अल्प क्षेत्र शिल्लक आहे. मागेल त्याला सोलार या योजनेसाठी असे शेतकरी पात्र ठरत नाहीत. त्यासाठी हे निकष बदलावेत, अशी सूचना केली.
शेतकऱ्यांना भरपाई मिळावी
मंत्री दुग्ध विकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री सावे यांनी, मॉन्सूनपूर्व रोहित्रे व अन्य प्रकारच्या देखभालीचे काम उर्जा विभागाने पूर्ण करावे. अवकाळी पावसामुळे पिकांबरोबरच जनावरांचेही नुकसान झाले आहे. त्याचीही भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी. शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यासाठी गावपातळीवर शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करावेत. नुकसान भरपाईपोटी मिळणारी रक्कम कर्ज खात्यात वळती करू नये, असे निर्देश दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.