Onion Price  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market Price : किमान निर्यातमूल्य अधिसूचनेनंतर कांदा दरात घसरण; क्विंटलमागे सहाशे रुपयांपर्यंत तफावत

Onion Market Rate : कांदा दर पडण्याच्या भीतीने बाजारात पुन्हा आवक वाढल्याचे दिसून आले.

मुकुंद पिंगळे

Nashik News : यंदाचे वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हानाचे आहे. ऑगस्टपर्यंत उत्पादन खर्चाखाली दराने कांदा विक्री करण्याची वेळ आली. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये शेवटच्या टप्प्यात कांद्याची सड व कोंब येऊन नुकसान वाढल्याने आवकेत कमालीची घट झाल्याने दरात सुधारणा होती.

मात्र केंद्र सरकारने पुन्हा ग्राहकहित साधण्यासाठी दर नियंत्रणासाठी पावले उचलली. शनिवारी (ता. २८) सायंकाळी किमान निर्यातमूल्य प्रतिटन ८०० डॉलरची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर कांदा बाजारपेठ पुन्हा अस्थिर झाली.

कांदा दर पडण्याच्या भीतीने बाजारात पुन्हा आवक वाढल्याचे दिसून आले. मात्र ती सरासरीच्या तुलनेत कमी असताना बुधवारी (ता. १) क्विंटलमागे ६०० रुपयांपर्यंत घसरण झाली. ऐन सणासुदीच्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत आहे.

कांद्याची साठवणूक करून सहा महिने होत आले असून टिकवणक्षमता सांपुष्टात आली आहे. थोड्याफार शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे. अशा परिस्थितीत नियमित आवक कमी होऊन शेतकरी टप्प्याटप्प्याने कांदा विकत होते.

त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होता. त्यामुळे देशात मागणी असून पुरवठा कमी असल्याने गेल्या आठवड्यात दर प्रतिक्विंटल ५ हजार रुपयांवर गेले होते. मात्र केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने पुन्हा निर्णयात बदल करून दरावर नियंत्रण आणले. त्यामुळे क्विंटलमागे ६०० रुपयांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

आवक मंदावल्याने सध्या पुरवठा कमी आहे. आता किमान निर्यातमूल्य निश्चित झाल्यानंतर बाजारात काहीशी अस्थिरता आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयानंतर परिणाम होईल, त्यानुसार बाजारात आवक वाढल्याने पुन्हा दराला फटका बसला आहे.
- विजय बाफना, अध्यक्ष, पिंपळगाव बसवंत, कांदा व्यापारी असोसिएशन

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट अखेरपर्यंत विक्री झालेल्या कांद्याला उत्पादन खर्चही वसूल झालेला नव्हता. मात्र कांद्याची सड वाढल्याने ऑगस्टच्या दरम्यान कांद्याची आवक कमी झाली. त्या वेळी दरात काहीशी सुधारणा दिसून आल्यानंतर केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने निर्यातशुल्क ४० टक्के लादल्याने कामकाज अडचणीत आले.

त्यात पुन्हा आवक कमी होऊन कांदा प्रतिक्विंटल ५ हजार रुपयांवर गेला असताना केंद्र सरकारने पुन्हा निर्यातशुल्क रद्द करण्याचा कांगावा करून किमान निर्यातमूल्य प्रतिटन ८०० डॉलर केले. त्यामुळे ‘आगीतून फुफाट्यात’ अशीच परिस्थिती आहे.

आयातदार देश या दराने व्यवहार करत नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे मागणी असलेल्या राज्यात केंद्र सरकारने ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ यांच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा २५ रुपये किलोने बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फक्त ग्राहकहित साधणारे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

व्यवहार करण्यात निर्यातदारांना अडचणी

१९ ऑगस्ट रोजी निर्यातशुल्क लागू केल्यानंतर बाजारातील दरानुसार निर्यात प्रक्रियेत दर प्रतिटन २५० ते ५०० पाचशे डॉलरदरम्यान होते. मात्र त्यात सरकारने निर्णय बदलल्याने आता प्रतिटनाला ८०० डॉलर किमान मर्यादा घालून दिली आहे. त्यामुळे व्यवहार करण्यात अडचणी आहेत. त्यामुळे पूर्वीच्या दराच्या तुलनेत किलोमागे १५ ते १६ रुपयांची तफावत आहे.

केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये ४० टक्के निर्यातशुल्क लागू करून तर आता किमान निर्यातमूल्य ८०० डॉलर करून कांद्याचे भाव दोनदा पाडले. सरकार पूर्ण ताकदीने कांदा दर पाडण्यासाठी मैदानात उतरले आहे. शेतकऱ्यांनी प्रतवारी करून कांद्याची आवक नियंत्रणात ठेवून सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे. सततच्या दर घसरणीमुळे शेतकऱ्यांचे कांदा विक्रीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT