Nashik News : ग्राहकांची कुठली ओरड नसताना केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी गुरुवारी (ता. ७) रात्री उशिरा निर्यातबंदीची घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. ८) रोजी जिल्ह्यातील कांदा बाजार आवारामध्ये लिलाव सुरू झाले. मात्र क्विंटलमागे १,००० ते १,५०० रूपयांची घसरण दिसून आली.
अचानक निर्णयामुळे व्यापाऱ्यांचे खरेदी व निर्यात कामकाज अडचणीत सापडले परिणामी त्यांनी बेमुदत लिलाव बंदची घोषणा केली होती. तर दर पडल्याने काही शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले होते. परिणामी जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कामकाज अस्थिर झाले.
अखेर सोमवारी (ता. ११) प्रमुख बाजार समित्यांमध्ये कामकाज सुरळीत झाले. मात्र दराची कोंडी कायम असून केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविणारा ठरत आहे. नाशिक जिल्ह्यातील १७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी १५ बाजार समित्यांच्या मुख्य व उपबाजार आवारात रब्बी उन्हाळ व खरीप लाल कांद्याची आवक होत आहे.
उन्हाळ्याची आवक संपल्यात जमा आहे तर लाल कांद्याची आवक अजूनही अपेक्षित प्रमाणात होत नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकारचा निर्यातबंदीचा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर आला आहे. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता. ८) लिलाव बंद पडले होते.
ते पुन्हा सुरू होऊन शनिवारी (ता. ९) १३७ वाहनांमधून ३,२०० क्विंटल आवक झाली. उन्हाळ कांद्याला किमान १,२०० कमाल ४,३८२ सरासरी ३,९०० तसेच लाल कांद्याला किमान १,२००,कमाल ३,२२५, सरासरी २,५०० दर होते. सोमवारी (ता. ११) उन्हाळ कांद्याला किमान १,७५१ कमाल ४,००० आणि सरासरी ३,५०० तर लाल कांद्याला ९००, कमाल ३,२४० तर सरासरी २,४५१ रुपये दर मिळाले.
लासलगाव बाजार समितीत निर्यातबंदी निर्णय झाल्यानंतर लिलाव ठप्प झाले होते. अखेर सोमवारी (ता. ११) दुपारच्या सत्रात लिलाव सुरू झाल्यानंतर २५० वाहनांतून आवक झाली. उन्हाळ कांद्याला किमान किमान १५००, कमाल ३३०० तर सरासरी २,५०० तर लाल कांद्याला किमान १,७००, कमाल २,६११ तर सरासरी २,२०० रुपये दर मिळाले. त्यामुळे उन्हाळ कांद्याच्या दरात १,१०० व लाल कांद्याच्या दरात १,१६० रुपयांनी घसरण झाली.
येवला बाजार समितीत दुपारच्या सत्रात चार वाजता लिलाव सुरू झाले. येथे १०७ वाहनांतून कांद्याची आवक झाली. उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल किमान १,०००, कमाल २,४०१ तर सरासरी २,२०० दर मिळाला तर लाल कांद्याला किमान ५०० कमाल २,३७० सरासरी २,२०० दर मिळाला. येथेही दरात घसरण दिसून आली. आवक नसल्याने सटाणा, देवळा, उमराणे, नामपूर येथे आवक नसल्याने लिलाव झाले नाहीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.