Ahilynagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत खरिप, लेट खरिपात ९८ हजार १३९ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. खरिपात यंदा सरासरीपेक्षा अधिक लागवड झाली आहे. यंदा पाणी उपलब्धता बऱ्यापैकी असल्याने कांद्याचे क्षेत्र वाढीचा कृषी विभागाचा अंदाज आहे. बाजारात मात्र सध्या मागणी असलेल्या कांदा बियाणांचा तुटवडा आहे. त्यामुळे अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात बियाणांची चढ्या दराने विक्री होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात अलिकडच्या दहा वर्षांपासून कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कांद्याला पुरेसा दर नसल्याने कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला. मात्र तरीही शेतकरी कांदा लागवडीलाच प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात साधारण दोन लाख हेक्टरपर्यंत जिल्ह्यात कांदा लागवड होत असते.
यंदा खरीप, लेट खरिपात मिळून आतापर्यंत ९८ हजार १३९ हेक्टरवर लागवड झाली आहे. अहिल्यानगर, पारनेर, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक लागवड झाली आहे. श्रीरामपूर, राहाता, नेवासा, शेवगाव, अकोले तालुक्यांत मात्र यंदा कांदा क्षेत्र अल्प आहे.
खरिपात कांद्याचे सरासरी २० हजार २६८ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा ३६ हजार ३८१ हेक्टरवर लागवड झाली होती. लेट खरिपात ५५ हजार ३४८ हेक्टरवर लागवड झाली आहे. लेट खरीप व रब्बीची लागवड अधिक असते. उन्हाळी कांदाही रब्बीत गणला जातो. यंदा पाण्याची स्थिती चांगली आहे. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत कांदा लागवड अधिक प्रमाणात होणार आहे.
सध्या लागवडी सुरू झाल्या आहेत. मात्र अजूनही बियाणाला मागणी आहे. शेतकऱ्यांची मागणी वाढत असताना विक्रेत्यांनी तुटवडा निर्माण केला आहे. त्यामुळे उपलब्ध बियाण्यांची चढ्या दराने विक्री होत असताना संबंधित मात्र चढ्या दराने होणाऱ्या विक्रीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, सध्या बाजारात कांद्याला चार-पाच महिन्यांपासून दर चांगला आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहे.
यंदाचे आतापर्यंतचे लागवड क्षेत्र
अहिल्यानगर १८१०६
पारनेर १७७२७
पाथर्डी ९९२८
कर्जत १२३८५
जामखेड ५३९७
श्रीगोंदा २०६७६
श्रीरामपूर ८६
राहुरी ४७२३
नेवासा ५४४
शेवगाव ६७४
संगमनेर ४८५७
कोपरगाव २१६१
अकोले २५
राहाता ४४८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.