Hailstrom Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Crop Damage : ‘गारांनी कांदा पीकच नाही, तर काहीच ठेवलं नाही’

Unseasonal Rain : गेल्या महिन्यात २६ नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या गारपिटीमुळे निफाड, चांदवड व नांदगाव तालुक्यांना मोठा तडाखा बसला. ज्यामध्ये प्रामुख्याने खरीप पोळ कांद्याचे मोठे नुकसान झाले.

मुकूंद पिंगळे

Nashik News : ‘‘यंदा प्यायच्या पाण्याचा प्रश्न अवघड होता. त्यात कांद्याला पाणी नसल्याने कसेबसे कांद्याला पाणी देऊन पीक जगवले. पाणी नाहीच मात्र वीजही नसते. त्यामुळे लहान नातवाने रात्रीचा दिवस करून कसेबसे पाणी भरले. हे जगवलेले कांदे चार-पाच दिवसांत काढणीला होते. अशातच गारांमुळे होत्याचे नव्हते झाले.

फक्त पीकच नाही, तर घराला पत्रा ठेवला नाही. गारांचा फटका लागून गाई रक्तबंबाळ झाल्या. आता काहीच राहिले नाही. पोटापाण्यासाठी कुठे रोजाने कामाला जाऊ; पण कुठ जाताही येत नाही,’’ अशा शब्दात सुमन वाकचौरे यांनी आपली परिस्थिती कथन केली. हे सांगताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू शेतकऱ्यांची वेदना तर अस्मानीची दाहकता समोर आणत होते.

गेल्या महिन्यात २६ नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या गारपिटीमुळे निफाड, चांदवड व नांदगाव तालुक्यांना मोठा तडाखा बसला. ज्यामध्ये प्रामुख्याने खरीप पोळ कांद्याचे मोठे नुकसान झाले. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी व चारापिके मातीमोल झाल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. त्यामुळे भयाण शांतता पसरली; मात्र दुष्काळसदृश परिस्थितीत जगण्याचा संघर्ष अजूनच तीव्र झाला आहे.

विहिरींनी तळ गाठलेला असताना कांदा पीक घेतले होते. वेळेवर पाऊस नसल्याने खरीप पोळ कांदा लागवडी महिनाभर पुढे गेल्या. त्यामुळे कांदा काढणी दिवाळीनंतर सुरू झाली. एक पाणी भरणी करून पुढच्या दहा-बारा दिवसांत कांदा काढणीस येईल अशी परिस्थिती होती. मात्र गारपिटीने एकाच रात्रीतून कांदा उत्पादकांचे होत्याचे नव्हते केले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्याची वाईट परिस्थिती आहे.

गारपिटीने आठवड्यानंतर चांदवड तालुक्याच्या पूर्व भागात शेतकरी सावरलेले नाहीत. तळेगाव रोही येथील महिला शेतकरी अर्चना वाल्मीक वाकचौरे व त्यांचे कुटुंबीय कांदा काढत होते. कांदा काढत असताना कांद्यातून पाणी, सडलेले कांदे उपटून हाती येत होते.

या परिस्थितीबाबत त्या म्हणाल्या, ‘‘कांद्याला खत टाकायचे झाले तर एक हजार रुपयांच्या पुढेच खताच्या गोणीचे दर आहेत. त्यात वातावरण खराब असताना फवारे मारावा लागतो. त्यालाही मोठा खर्च येतो. ते फवारे दोन-चार हजार रुपयांच्या पुढे असतात. शेतीचा खर्च आता सोपा राहिलेला नाही. एक एकरवर कांदे लावायचे तर त्याचाही खर्च दहा हजार रुपयांच्या पुढे आहे.’’

दुसऱ्या दिवसापर्यंत कांद्याच्या लागवडीमध्ये गारांचा थर साचलेला होता. आता काढण्यापूर्वीच कांदा वाफ्यातच सडत आहे. त्यातून पाणी बाहेर येत आहे. गारपिटीने सगळे हातातून गेले आहे. त्यामुळे हे कांदे बाजारात याचा काहीच उपयोग नाही.

गारपिटीमुळे घरांना पत्रे राहिले नाहीत तर अनेक ठिकाणी घरांच्या खिडक्या गारपिटीच्या तडाख्यात फुटल्या. दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत थर तसाच होता. गाऱ्या वितळल्या नव्हत्या. थर शेतातच साचून होता. पूर्वी लहान गारा पाहिल्या होत्या; मात्र अशा मोठ्या आणि हदरवून टाकणाऱ्या गारा कधीच पाहिल्या नव्हत्या,’’ असे सरस्वती बबन वाकचौरे यांनी सांगितले.

‘हे कांदे लासलगाव बाजारापर्यंत तरी जातील का? ’

‘‘गारपिटीमुळे कांद्याचे नुकसानही कधी असे पाहिले नव्हते. कांदे खराब झाल्याने काढत असतानाच ते सडलेले निघत आहेत. काढणी करून विक्रीसाठी लासलगाव बाजारपर्यंत तरी जातील का आणि गेले तरी त्याचे दोन पैसे होतील का, अशी विवंचना ८५ वर्षांच्या आजीबाई गंगूबाई तुकाराम वाकचौरे यांनी मांडली.

‘२६/११ हा दिवस कधीच विसरता येणार नाही’

गुडघ्यापर्यंत कांद्याची पात लागत होती. दोन-चार दिवस थांबून कांदे काढणार होतो. मात्र गारपिटीच्या तडाख्यामुळे या कांद्याला काढायला आता पातसुद्धा उरलेली नाही. तीन एकर कांद्याचे क्षेत्र उद्ध्वस्त झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कांदा खराब झाल्याने आता खर्च तरी निघेल की नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे २६/११ हा दिवस कधीच विसरता येणार नाही, असे तरुण शेतकरी प्रशांत मधुकर वाकचौरे सांगत होते.

दुष्काळातसुद्धा थोड्या फार प्रमाणात पाण्याची बचत करून कांदा लावला होता. पण एका दिवसाच्या गारपिटीने सर्व उद्ध्वस्त करून टाकले. आता वावरात फक्त सडलेला कांदा दिसतो आहे. त्यातील उत्पादनाच्या तुलनेत फक्त १० टक्के कांदा बाजारात जाईल.
प्रकाश चव्हाण, नुकसानग्रस्त शेतकरी, पाटे, ता.चांदवड
गारपीट झाल्यानंतर परिसरात शेतात गारांचा ४ इंचाचा थर होता. त्यामुळे शेतातच कांदे सडून गेले. काढायचा प्रयत्न सुरू आहे. मात्र खराब कांद्याचे प्रमाण अधिक आहे. पंचनामे झाले, मात्र उत्पादन खर्च निघणार नाही, हे संकट मोठे आहे.
अक्षय माकुणे, वडगाव पंगू, ता.चांदवड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

Pandharpur Wari: पंढरपूरच्या वाटेवर संतांचे पालखी सोहळे

Maharashtra Transport Strike: मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला प्रतिसाद

Tur Dal Cess Scam: तूर सेस चोरीच्या दंडाचे २६ लाख न्यायालयात आगाऊ भरावेत

Global Onion Market: भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान, चीनच्या कांद्याला मागणी

SCROLL FOR NEXT