आरती जैन
Cereals : तृणधान्ये हा ऊर्जा देणारा सर्वोत्तम स्रोत आहे. तृणधान्यांमध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड मोठ्या आतड्यातील चांगल्या जिवाणूंच्या वाढीस मदत करते. यामुळे पचनक्रिया सुधारते, शोषण अधिक चांगल्या रीतीने होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
तृणधान्याच्या नियमित सेवनाने लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, मोठ्या आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो, आयुर्मान वाढते. निरोगी अन्न आपल्याला आनंदी जीवन देते.
ज्वारी :
ग्लुटेन नसलेल्या पदार्थांची निर्मिती ज्वारी पिठापासून करता येते. त्वचेचे आजार ज्वारीमुळे कमी होतात. अन्नपदार्थ पचन होण्यासाठी सुलभ असतात.
तंतुमय घटकाचा चांगला स्रोत आहे. यामुळे पचन, संप्रेरक उत्पादन आणि हृदय, रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी उपयुक्त आहे. कोंड्याच्या थरातील अँटिऑक्सिडंट्स हानिकारक मुक्त रॅडिकल्सचा नाश करतात. विविध प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता कमी करतात.
१०० ग्रॅम ज्वारीमध्ये एकूण ३३९ किलो कॅलरी ऊर्जा, ७४.३ ग्रॅम कर्बोदके, ११.३ ग्रॅम प्रथिने, ३.३ ग्रॅम एकूण चरबीपैकी ०.५ ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट, १ पॉली अनसॅच्युरेटेड फॅट, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट ११.३ ग्रॅम. चरबी १.४ ग्रॅम,
ओमेगा -३ फॅटी ॲसिड ६५ मिलीग्रॅम, ओमेगा -६
फॅटी ॲसिड १३०५ मिलिग्रॅम आणि शून्य कोलेस्ट्रॉल आहे.
ज्वारीच्या सेवनाने अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. रक्तातील कोलेस्टेरॉलचे व्यवस्थापन करण्याची क्षमता असते. तंतुमय घटक ‘खराब’ लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यास मदत करते.
लिपिडमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याची क्षमता असते. कोलेस्टेरॉलची कमी पातळी स्ट्रोक, तीव्र दाह आणि टाइप २ मधुमेहाचा धोका कमी करते.
बाजरी
कर्बोदके २५ टक्के, तंतुमय घटक १७ टक्के, प्रथिने २२ टक्के, कॅलरी, जीवनसत्त्व बी ६, कॅल्शिअम, लोह असते. शरीरातील स्निग्ध पदार्थांचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळते.
ऊर्जा देणारे तृणधान्य असल्याने थंडीच्या दिवसांत आहारात समावेश करावा. यामध्ये सल्फरयुक्त अमिनो ॲसिड असल्यामुळे लहान मुले, गर्भवती मातासाठी बाजरी उपयुक्त आहे.
लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. ॲनिमिया आजारावर मात करण्यासाठी उपयुक्त आहे.
हिवाळ्यामध्ये सर्दी- खोकला, विविध संक्रमण विषाणूजन्य समस्यांपासून बचाव करण्यासाठी बाजरीचा आहारात समावेश करावा.
भगर/वरई :
वरईमध्ये ग्लुटेन नसते. प्रथिने व तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याने पचायला हलकी असते.
स्निग्ध पदार्थ, लोह जास्त प्रमाणात आढळते. हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
जीवनसत्त्व बी-३, क,अ जास्त प्रमाणात असतात. पोटॅशिअम, लोह, जस्त, कॅल्शिअम ही खनिजे उपलब्ध असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
स्निग्ध पदार्थ, तंतूमय पदार्थ, खनिज व लोह हे घटक चांगल्या प्रमाणात आहेत.
भात, भाकरी, बिस्कीट, लाडू, शेवया, चकली, शेव निर्मितीमध्ये वापर करता येतो.
रक्तातील कोलेस्टेरॉल, शर्करा प्रमाण, पचनाचे विकार कमी करण्यास मदत होते.
तंतुमय घटक जास्त प्रमाणात असल्याने पचनाच्या तक्रारी कमी होतात. पचायला हलकी असते.
वजन कमी करायचे असेल तर भगर हा एक चांगला पर्याय आहे.
राळा :
भरपूर प्रथिने असतात, मेदांश कमी आहेत. भरपूर ऊर्जा असते, पचायला हलके असते.
लोहाचे प्रमाण जास्त असल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवते. अँटिऑक्सिडंट हा गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
मोड आलेला राळा खाल्ल्यास हाडे बळकट होतात. अर्ध शिशी, निद्रानाश, कॉलरा, ताप यांच्या उपचार पद्धतीमध्ये राळ्याचा वापर करतात.
नाचणी
नैसर्गिक कॅल्शिअम उत्कृष्ट स्रोत असून वाढती मुले आणि वयस्कर व्यक्तींसाठी उपयुक्त धान्य आहे. यातील अमिनो आम्ल अँटिऑक्सिडेंटचे काम करतात.
वाढत्या वयाच्या मुला, मुलींना लोह, कॅल्शिअमची गरज असते. याचा आहारात समावेश केला, तर रक्तासंबंधीच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.
नाचणीमध्ये ०.३३ टक्का कॅल्शिअम, ४६ टक्के लोह असते. नाचणीपासून भाकरी, अंबिल, लाडू, चकली तयार करता येते. त्याचा आहारात वापर वाढवावा.
आरती जैन, ८६००८१०२५७, (सहायक प्राध्यापक, शरद कृषी महाविद्यालय, जैनापूर, जि. कोल्हापूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.