Millets  Agrowon
ॲग्रो विशेष

Healthy Millets : बहुगुणी भरडधान्य

Team Agrowon

नीलिमा जोरवर

Nutrient-Rich Millets :

‘नको झाला हो हा पाऊस आता. हात तोंडाशी आलेली पिके काढून देईना.’

‘काढायला आलेली बाजरी भिजवली, ज्वारी तर भुईसपाट केली.’

‘कापणीला मूग आलेला पावसाने शेतातच मोड आले, त्यामानने उडीद बरा राहिला, कारण त्याच्या शेंगा तडकत नाहीत.’

‘आता भात निसवला आहे, म्हणजे फुलोऱ्यात असताना पाऊस कमी हवा, दणदण नको.’

मागच्या १५ दिवसांपासून शेतकऱ्यांच्या याच चर्चा सुरू आहेत. कारण पावसाने धुमाकूळ घातलाय. सर्वांत जास्त पाणी शोषून घेणारे पीक म्हणजे भात, तेही आता अतिपाण्याने खराब होण्याची शक्यता आहे. सध्या आपल्या शेतात साठून राहिलेले पाणी शेताबाहेर काढण्याचे काम शेतकऱ्यांना करावे लागत आहे. वर्षभराची धान्याची बेगमी करणारा खरीपाचा हंगाम असा पाऊसमय झाला आहे.

पितरपाटा सुरू आहे. पितरांची शाकभाजी बनवायला पुष्कळशा भाज्या या काळात लागतात. त्यांचेही भाव गगनाला भिडले आहेत. तशा त्या दरवर्षी महागच असतात या काळात. परंतु यंदा अतिपावसाने भाज्या नीट जमत नाहीत. निसर्गाने केलेल्या शेतीतून मिळणाऱ्या रानभाज्या देखील या वर्षी अनेक ठिकाणी खराब झाल्या. शेवटी काय वनस्पतींना सुद्धा ऊन, पाणी सर्वच एका मर्यादेत लागते. सजीवांची अन्नसाखळी अबाधित ठेवण्यासाठी वनस्पती अतिशय महत्त्वाच्या आहेत. वनस्पतींच्या निकोप वाढीसाठी महत्त्वाचा ठरतो तो प्रमाणात असणारा पाऊस. जगभरात एकंदरच वातावरण बदलाच्या (क्लायमेट चेंज) या समस्या मागील काही वर्षांत वाढलेल्या आहेत. अशा वेळी या बदलांशी सामना करणारी मुख्य पिके म्हणून भरडधान्य अर्थातच मिलेट्सकडे पाहिले जात आहे. आपल्याला अन्नसुरक्षेबरोबरच पोषणसुरक्षा देणारी ही पिके नेमकी काय आहेत, ते समजून घेऊया.

पितरपाटा संपला की आपण नवरात्रीचा उत्सव साजरा करणार. स्त्री-पुरुष नऊ दिवस देवीची उपासना करणार, नवधान्यांची पूजा करणार. शेतीसाठी असणारा एक खास प्रयोग म्हणजे या नवधान्यांची उगवण क्षमता तपासून रब्बी पिकांच्या लागवडीची तयारी पूर्ण केली जाणार, तेही अतिशय उत्साहात. नवरात्रीचे नवधान्य तसे भरडधान्यांचे प्रकार नऊ. गहू, तांदूळ आणि मका सोडून असणारा भरडधान्यांचा वर्ग तसा मोठा आहे. म्हणजे जगभरात जवळ जवळ ३५ हजारांपेक्षा जास्त असे वर्ग आहेत. पण आपल्या भारतात ज्याची शेती केली जाते व आपण ते मोठ्या प्रमाणात आहारात वापरतो असे हे नाऊ धन्य. ज्वारी, बाजरी, नाचणी, बर्टी, वरई, कोदो, हिरवी भगर, पिवळी भगर, राळा हे त्यांचे मुख्य प्रकार. आणि यातही पुन्हा त्यांचे उपप्रकार. म्हणजे राळ्यामध्ये असणारे पिवळा राळा, लाल, काळा, पांढरा, तपकिरी, राखाडी असे वेगवेगळे प्रकार. ज्वारीमध्ये तर आपल्याकडे ४० हजार जाती आहेत. असे हे खूप मोठे कुटुंब आहे भरडधान्यांचे.

माणसाने जेव्हा शेती करायला सुरुवात केली त्याआधीपासूनच भरडधान्य पृथ्वीवर अस्तित्वात होते. म्हणजे साधारणतः शेतीची सुरुवात १०-११ हजार वर्षांपूर्वी झाली असेल, तेव्हापासून ही धान्ये मानवाला अन्न पुरवत आले आहेत. त्यांचे अस्तित्व अजूनही टिकून आहेत. त्यामुळे त्यांना काटक म्हटले जाते. निसर्गात होणारे बदल, वेगवेगळ्या किडी, रोग या सर्वांशी सामना करून त्यांनी स्वतःला सक्षम बनवले आहे. आज जेव्हा पाऊस व वातावरण बदलते आहे तेव्हा हीच पिके आपल्याला उपयोगी ठरतील, अशी अशा आहे. याशिवाय जगभर मधुमेह व इतर आजार वाढलेले असताना योग्य पोषण देणारा आहार म्हणून त्यांचेच नाव प्राधान्याने समोर येत आहे.

आपल्या आहारातील गहू, तांदूळ या नियमित धान्यासाठी एक चविष्ट आणि पौष्टिक पर्याय म्हणून भरडधान्यांकडे बघितले जाते. भात आणि गहू आपल्याला अन्नसुरक्षा देतात; परंतु भरडधान्य पिके देशाला अन्नसुरक्षेबरोबरच (Food security) पोषणसुरक्षा (Nutrition Security), आरोग्य सुरक्षा (Health security), शेतकऱ्यांच्या उपजीविकेची सुरक्षा (Livelihood security), जनावरांच्या चाऱ्याची सुरक्षा (Fodder security), पर्यावरण संतुलन आणि संवर्धनाची सुरक्षा (Ecological security) पुरवतात.

अन्न सुरक्षा

अन्नसुरक्षेच्या दृष्टीने केवळ भात आणि गहू या दोनच धान्य पिकांवर अन्नासाठी अवलंबून राहण्यापेक्षा, बदलत्या तापमानात तग धरू शकणाऱ्या भरडधान्यांवर भर दिला पाहिजे. कमी व जास्त कालावधीचे, वर्षभरातील कोणत्याही हंगामात येणारे असे वाण यामध्ये उपलब्ध आहेत.

पोषण सुरक्षा

जागतिक ‘फूड रेटिंग सिस्टीम’मध्ये भरडधान्यांचे मूल्यांकन ‘उत्तम’ असे करण्यात आले आहे. शरीराला आवश्यक असणारी पोषकतत्त्वे व सूक्ष्म पोषण तत्त्वे यांचे सुयोग्य प्रमाण भरडधान्यांत असते. यामध्ये असणारे कॉपर, फॉस्फरस, मॅंगेनीज, मॅग्नेशिअम हे सूक्ष्म अन्नघटकही महत्त्वाचे आहेत. याशिवाय कर्बोदके आणि ऊर्जा यांचे प्रमाण जास्त आहे. आज आपल्याकडे रक्तक्षय असणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. त्यांच्यासाठी नाचणीसारखे भरडधान्य सर्वोत्तम आहार आहे.

आरोग्य सुरक्षा

भरडधान्य ग्लुटेन फ्री आहेत. तसेच या पिकांच्या वाढीसाठी विशेष रासायनिक खते द्यावी लागत नाहीत. तसेच कीड व रोग नसल्यामुळे कीटकनाशकेही फवारलेली नसतात. त्यामुळे हे एक आरोग्यासाठी उत्तम अन्न आहे. विशेषतः हृदयविकार, कोलेस्टेरॉल, मधुमेह असणाऱ्यांसाठी भरडधान्य अतिशय उपयुक्त आहेत.

जनावरांच्या चाऱ्याची सुरक्षा

या धान्यांच्या काडाचा / कडब्याचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी केला जातो. त्यात मोठ्या प्रमाणात सेल्युलोज व इतर पदार्थ असतात. हा चारा जनावरे आवडीने खातात. त्यामुळे काही भागात तर जनावरांच्या चाऱ्यासाठी ही पिके घेतली जातात.

उपजीविकेची सुरक्षा

कोरडवाहू, हलक्या जमिनीत भरडधान्य पिकांचे चांगले उत्पन्न मिळते. त्यांना पाणी कमी लागते, खते लागत नाहीत. ही पिके कोणत्याही हवामानात येते. या पिकासोबत शेतकरी कडधान्य, तेलबिया, भाजीपाला अशीही पिके घेतात. भरडधान्य पिके शेतकऱ्यांना उपजीविकेची शाश्‍वतता मिळवून देतात.

पर्यावरणीय सुरक्षा

भरडधान्यांची लागवड केलेल्या शेतांतील जमिनीत नत्राचे प्रमाण वाढून जमिनीचा कस वाढतो. इतर पिकविविधता जपली जाते. काही पक्ष्यांचे हे आवडते खाद्य आहे. तसेच ज्या शेतात भरडधान्य घेतले जाते तेथे अनेक रानभाज्या व इतर वनस्पतींची वाढ होते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो.

हरितक्रांती झाली तेव्हा प्रश्‍न होता तो सर्वांच्या पोटाला अन्न मिळण्याचा. त्या वेळी जास्तीत जास्त उत्पादन देणारे पिके आपण स्वीकारली. त्यासाठी रासायनिक निविष्ठांचा वापर देखील आपण मुक्त हस्ताने केला; जो आजदेखील सुरूच आहे. त्याचे जमिनीवर, निसर्गावर व मानवी शरीर-मनावर होणारे परिणाम देखील आपण आपल्या आजूबाजूला अनुभवत आहोत. आज गरज आहे ती सकस व पोषक अन्नाची. याशिवाय वातावरण बदलात तग धरू शकतील अशा काटक पिकांची निवड व रासायनिक निविष्ठांचा कमीत कमी वापर हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्या दृष्टीने पीकबदल करणे हे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असले तरी त्यांनी पिकविलेल्या शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, ग्राहकांनी त्याला प्रतिसाद देणे या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.

बदलती शेती, शहरीकरण आणि बदलती जीवनशैली यामुळे लोकांच्या खानपानाच्या सवयीही बऱ्याच प्रमाणात बदलल्या आहेत. वेळेअभावी बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्याकडे कल वाढतच चालला आहे. साहजिकच बाजारात जे उपलब्ध असेल ते खाण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय राहत नाही. कळसूबाई मिलेट या आमच्या भरडधान्य उत्पादक आदिवासी शेतकरी संस्थेच्या माध्यमातून गेले नऊ-दहा वर्षे आम्ही काम करत आहोत. त्यातून ‘मिलेट खाण्यासाठी व शेतात येण्यासाठी’ यशस्वी प्रयोग झाले आहेत. त्यातूनच हे समजले की आपल्या ताटात भरडधान्य आले तरच आपल्या शेतांतून भरडधान्य पिकवले जातील व भविष्यात वातावरण बदल होत राहिले तरी आपली अन्नसुरक्षा अबाधित राहील.

(लेखिका निसर्ग अभ्यासक आणि कार्यकर्त्या आहेत.)

ranvanvala@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : टेंभूच्या लाभक्षेत्रानजीक उंचीवरच्या १५०० हेक्टर शेतीला मिळणार पाणी

Watermelon Harvesting : कलिंगड आले काढणीवर, पावसाने पिकाचे नुकसान

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेच्या १२ जागांबाबत कोणतीही तडजोड नाही; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका

Rabi Season 2024 : खानदेशात रब्बीत सोयाबीनचे क्षेत्र वाढणार

Crop Damage Compensation : वादळाच्या नुकसानीची भरपाई मिळेना

SCROLL FOR NEXT