Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीक नुकसानीसाठी आता जादा ‘पीकविमा’ भरपाई

Crop Damage Compensation : शेतकऱ्यांना जादा नुकसानभरपाई मिळण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेच्या निकषात केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत.

मनोज कापडे

Pune News : शेतकऱ्यांना जादा नुकसानभरपाई मिळण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेच्या निकषात केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत. त्यामुळे खरीप २०२३ मधील पावणेदोन कोटी शेतकऱ्यांच्या विमा प्रस्तावांची छाननी नव्या निकषानुसार करण्याचे आदेश राज्यातील ९ विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत.

कृषी विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले, की गेल्या हंगामात १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. त्यामुळे योजनेत सहभागी झालेल्या ९ विमा कंपन्यांना आठ हजार कोटी रुपयांचा विमाहप्ता मिळणार आहे. या कंपन्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची तब्बल ५४ हजार कोटी रुपयांचे विमा संरक्षण दिलेले आहे. खरीप २०२३ मधील पीकविमाधारक शेतकऱ्यांना अद्याप विमा भरपाई मिळालेली नाही.

केंद्र शासनाने विमा योजनेचे निकष बदलताच आता विमा कंपन्या सक्रिय झाल्या आहेत. नवे सूत्र किचकट असले तरी शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. या सूत्रानुसारच शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश केंद्राने दिलेले आहेत. त्यानुसार, लवकरच विमा दावे अंतिम होतील व केंद्राच्या मंजुरीनंतर शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात भरपाईच्या रकमा जमा होतील.

नव्या निकषानुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रस्तावावर घेतल्या गेलेल्या निर्णयाची माहिती विमा कंपन्यांना केंद्राकडे पाठवावी लागेल. त्यामुळे शेतकऱ्याला https://pmfby.gov.in/ या संकेतस्थळावर घरबसल्या विमा प्रस्तावाची माहिती मिळेल.

मंजूर झालेली भरपाई आता आधार संलग्न बॅंक खात्यात वर्ग केली जात आहे. मागील तपशीलदेखील शेतकऱ्याला आता दिसणार असल्यामुळे खोटी माहिती देत कोणाच्या बॅंक खात्यात आपली रक्कम वळवली गेली का, याची माहिती तत्काळ शेतकऱ्याला मिळणार आहे.

केंद्राने विमा कंपन्यांना आणखी एक वेसण घातली आहे. पूर्वी शेतकरी व सरकारकडून विमाहप्ता घेतल्यानंतर विमा कंपन्या स्वतः हिशेब करीत आणि नुकसान भरपाईच्या रकमा परस्पर शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करीत होत्या.

नव्या निकषानुसार विमा कंपन्यांना भरपाईचा हिशेब केल्यानंतर भरपाई रक्कम केंद्राच्या अखत्यारित असलेल्या ‘पीएफएमएस’कडे (सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली) वर्ग करायची आहे. त्यानंतर केंद्राच्या नियंत्रणात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग होईल.

पीकविमा योजनेतील जुन्या निकषांमध्ये पीक कापणी प्रयोगाचे निष्कर्ष काही घटनांमध्ये शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत नव्हते. नव्या निकषात पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे हित लक्षात घेण्यात आले आहे. पीक कापणी प्रयोगानंतर उत्पादनात ५० टक्के घट आल्यास (उदाहरणार्थ सोयाबीनची हेक्टरी विमा संरक्षित रक्कम ५० हजार रुपये असल्यास) ५० टक्के म्हणजेच २५ हजार रुपये भरपाई शेतकऱ्याला मिळेल.

मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये अग्रिम नुकसान भरपाई ७५०० रुपये दिलेली असल्यास मिळणारी नुकसान भरपाई १७५०० रुपये (पीककापणी नुकसानमधून दिलेला अग्रिम समायोजित करून येणारी रक्कम) राहील. म्हणजेच २५ हजार रुपये वजा ७५०० रुपये करता १७५०० रुपये दिले जातील. मात्र, पीक कापणी प्रयोगात नुकसान शून्य आले, तरी शेतकऱ्याला दिलेला आधीचा अग्रिम वसूल केला जाणार नाही.

स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत १५ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली गेली असल्यास आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान ५० टक्के आल्यास मिळणारी नुकसान भरपाई १७५०० रुपये राहील. कारण १५ हजार रुपये आधीच दिलेले असल्यामुळे विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये गृहीत धरली जाईल व तिच्या ५० टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे.

समजा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये १५ हजार रुपये आणि काढणी पश्‍चात नुकसानीमध्ये २० हजार रुपये आधीच दिलेले असल्यास आणि पीक कापणी प्रयोगातील नुकसान ५० टक्के आल्यास नुकसान भरपाई ७५०० रुपये दिली जाणार आहे. कारण आधीच ३५ हजार रुपये वाटले गेले असल्यामुळे विमा संरक्षित रक्कम केवळ १५ हजार रुपये गृहीत धरून त्याच्या ५० टक्के म्हणजेच ७५०० रुपये शेतकऱ्याला दिले जातील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

प्रशिक्षणासाठी केंद्राला प्रस्ताव

“नवे निकष शेतकऱ्यांच्या फायद्याचे असले तरी त्यात गुंतागुंत आहे. काही तांत्रिक मुद्देदेखील उपस्थितीत होत आहेत. याबाबत आम्ही केंद्र शासनाशी पत्रव्यवहार केला आहे. नव्या निकषानुसार बिनचूक नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागाला आणि विमा कंपन्यांना देखील प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तसा प्रस्ताव केंद्राला देण्यात आला आहे,” असे कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

नव्या निकषानुसार अशी मिळणार भरपाई

(उदाहरणादाखल सोयाबीन पीक घेतले असून त्याची विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये गृहीत धरली आहे.)

भरपाईचा तपशील - पूर्वीची पद्धत - नवी पद्धत प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न करता येणे या घटकासाठी दिली जाणारी नुकसान भरपाई- १२५०० रुपये- १२५०० रुपये

मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये उत्पादनात ६० टक्के घट अपेक्षित धरुन दिला जाणारा २५ टक्के अग्रिम (म्हणजेच ५० हजार रुपयांच्या ६० टक्के व या ६० टक्क्यांच्या २५ टक्के अग्रिम)-७५०० रुपये- ७५०० रुपये ---

स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे ५० टक्के नुकसान झाल्यास दिली जाणारी भरपाई (५० हजार रुपयांच्या ५० टक्के म्हणजेच २५ हजार रुपये)- १७५०० रुपये (आधी दिलेली ७५०० रुपयांची रक्कम २५००० रुपयांतून वजा केल्यानंतर येणारी ही रक्कम आहे.) -२१२५० रुपये (आधी दिलेली ७५०० रुपयांची रक्कम आता ५० हजार रुपयांतून वजा होईल. वजा जाता येणाऱ्या ४२५०० रुपयांच्या ५० टक्के गृहीत धरुन ही रक्कम काढली आहे.)

काढणी पश्‍चात नुकसान भरपाई ५० टक्के आल्यास मिळणारी भरपाई (५० हजार रुपयांच्या ५० टक्के म्हणजेच २५ हजार रुपये)- शून्य भरपाई मिळत होती. (कारण, ७५०० अधिक १७५०० अशी २५ हजार रुपये आधीच दिलेले असायचे)- १०६२५ रुपये मिळतील. (कारण आधी दिलेली ७५०० रुपयांची रक्कम अधिक २१२५० रुपये असे २८७५० रुपये आधी शेतकऱ्याला दिलेले असतील. हेच २८७५० रुपये आता ५०००० रुपयांतून वजा केले जातील. वजा जाता येणाऱ्या २१२५० रुपयांच्या ५० टक्के गृहीत धरून ही रक्कम काढली आहे.)

पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई १० टक्के आल्यास मिळणारी भरपाई (५० हजार रुपयांच्या १० टक्के गृहीत धरून ५००० रुपये रक्कम काढली आहे.)- शून्य भरपाई मिळत होती. (कारण २५००० रुपये आधीच दिलेले असायचे)- शून्य भरपाई मिळत होती. (कारण मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये आधीच २५ टक्के म्हणजेच ७५०० रुपये दिलेले असतात.) एकूण मिळणारी प्रतिहेक्टर नुकसान भरपाई-२५००० रुपये-३९३७५ रुपये

महत्त्वाचे ः

# प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न करता येणे या घटकासाठी एकदा नुकसान भरपाई दिली की नंतरच्या आधी विमा पॉलिसी संपुष्टात येत असे. नव्या निकषातदेखील तेच होईल.

# सोयाबीनचे उदाहरण अभ्यासले असता नव्या निकषानुसार शेतकऱ्याला १४३७५ रुपये जास्त मिळतात. त्यामुळे नवे निकष शेतकऱ्यांना लाभदायक आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT