सतीश खाडे
सागरी मृदू काय प्राणी : सागरी प्राणी जगतांपैकी २३ टक्के सजीव हे मृदूकाय संघातील आहेत. यांच्या शरीराचा आकार, रचना, अधिवास स्थाने आणि वर्तन अशा बाबीत प्रचंड विविधता असते. त्यात कवचधारी आणि अकवचधारी अशा दोन्ही प्रकारांत आहेत. शंख शिंपले, आपल्या देवळात वाजवता येणारा मोठा शंख, मोती देणारा पर्ल ऑईस्टर, तिसऱ्या (clams), नळे, माकुले (squid), शंखाच्या गोगलगायी या आणि अशा आपल्याला माहीत असलेल्या मृदूकायच्या प्रजाती आहेत. समुद्र तळाशी असणाऱ्या मृदूकायांना कवच नसल्याने त्यांना अकवचधारी (nudibranch) म्हणूनही ओळखतात.
सागरी संधिपाद प्राणी : ज्यांच्या पायांना सांधे असतात ते संधिपाद. पाण्यातले शेवंडे, खेकडे, झिंगे, सागरी विंचू या आणि अशा संधिपाद जलचरांच्या लाखो प्रजाती आहेत.
कंटकचर्मी प्राणी : सागरी पाण्यात दंडगोलाकार, तारकाकृती व चेंडूसारखे पण काटेरी त्वचेचे प्राणी आढळतात. त्यांना कंटकचर्मी असे म्हणतात. त्यांचे समुद्र तारे, समुद्र लिली, समुद्र काकडी, समुद्र साळींदर, सी आर्चिन, भंगूर तारे, ब्रिटल स्टार असे अनेक प्रकार पडतात. हे प्राणी जीवसृष्टीतील महत्त्वाचे आहेतच, पण मानवी खाद्य, औषधी उपयोग, शेती व अन्य कारणांसाठीही मौल्यवान आहेत. सागरी अन्नामध्ये सी आर्चिन व समुद्र काकडी हे चवदार अन्न म्हणून जपान व फ्रान्समध्ये प्रसिद्ध आहे.
आंतरगृही संघातील प्राणी : म्हणजेच जेली फिश, हायड्रा प्रवाळ, समुद्रफुल इ. प्राणी त्यांच्यातील दंशपेशीमुळे प्राणघात ठरू शकतात. हे प्राणी आपल्या दंशपेशीद्वारे आसपासच्या छोट्या भक्ष्यांना विष टोचून अचेतन करतात. त्याचप्रमाणे स्वसंरक्षणासाठी ही याचा वापर करतात. मानवाला देखील यामुळे विषबाधा होऊ शकते. बऱ्याच जेली फिश आणि कोम जेली या प्रजातींना काजव्यांप्रमाणे चमकण्याचे वरदान असते. सी पेन व सी फॅन यासारखे वनस्पतीप्रमाणे पसरणारे हे प्राणीही मोठ्या प्रमाणात समुद्रात असतात.
प्रवाळ : हे सिलेंटराटा वर्गातील जीव असून हायड्रा, जेलीफिश, समुद्री फुले ही त्यांची काही नावे. हे समुद्रात राहतात. त्यांच्या सोंडेने ते तरंगणारे सूक्ष्म प्राणी व अति छोटे मासे खातात. त्यांच्या शरीरातून ते कॅल्शिअम कार्बोनेटचा थर स्रवत असतात. त्याद्वारे स्वतःच्या शरीरावर एक संरक्षक आवरण तयार करतात.
प्रवाळ हे पाण्याचा दर्जा दर्शविणारे उत्तम संवेदक आहेत. प्रवाळ समुद्राचे आरोग्य सर्वार्थाने सांभाळण्याचे मोलाचे काम करतात. जागतिक तापमानामुळे प्रवाळांच्या परिसंस्थेला सर्वाधिक नुकसान पोचत आहे. या प्रवाळांच्या आश्रयाला विविध प्रकारचे सागरी जीव येत असतात.
प्रवाळांच्या काही जातींपासून रत्नेही बनवली जातात. तर काही प्रवाळांच्या भस्माचा आयुर्वेदिक औषधात मोठा वापर केला जातो. प्रवाळ हे जैवक्रियाशील संयुगाचे समृद्ध स्रोत असून, त्यांचे रसायनशास्त्र, औषध निर्माण शास्त्र आणि पर्यावरण शास्त्रामध्ये मोठे योगदान आहे. ही संयुगे ट्यूमर, क्षयरोग, ॲलर्जी आणि विषाणूजन्य आजारांविरुद्ध लढण्यास शरीराला मोठी मदत करतात. त्यावर सातत्याने संशोधन होत आहे.
वलय प्राणी संघ : गांडुळाप्रमाणेच वलये असलेले हे प्राणी समुद्रातही असतात. तेही तेथील चिखल व माती गिळून गोळे किंवा गट्ट्यांच्या स्वरूपात बाहेर टाकत असतात. त्यांच्या रहिवासानजिक असे मातीचे गोळे व गट्टे कायम आढळतात.
मासे
माशांचे तर असंख्य प्रकार समुद्रामध्ये आढळतात. त्यातील काही वेगळ्या आणि निवडक जातींचाच परिचय करून घेऊ.
समुद्री ड्रॅगन : ड्रॅगन हा खरेतर चिनी लोककथेतील काल्पनिक प्राणी. पण ड्रॅगनप्रमाणे दिसणारे मासे आहेत. समुद्राच्या वीस मीटर खोलीपर्यंत हे समुद्री शैवाल व समुद्री गवतात यांचा आधिवास असतो. अद्भुत, अकल्पित आकाराचे हे मासे पिवळसर, तपकिरी, शेवाळी रंगांचे मिश्रण असलेले असतात.
नळी मासे (पाइप फिश) : या माशांचे शरीर निमुळते नळीसारखे असते. डोकेही शरीराच्या रेषेतच असते. हे उभ्या दिशेने संथ गतीने पोहोतात.
हॅमर हेड फिश : हातोड्याप्रमाणे तोंड असलेल्या या माशांची प्रजाती आता दुर्मीळ होत चालली आहे. त्यांची लांबी एक ते सहा मीटरपर्यंत असते.
स्टोन फिश : अगदी दगडासारखी दिसणारी त्वचा असणारा व आकारही विचित्र असणाऱ्या या माशांचा डंख अतिशय विषारी आहे. हे समुद्रातल्या दगडांशेजारी राहून भक्ष्याला चकवा देतात.
सॅंड फिश : वाळूसारखी त्वचा असणारा मासा समुद्रातील वाळूत अलगद लपून भक्ष्य पकडतो.
स्टिंग रे : चौकोनी चपटा आकाराचा, १४ फूट लांबीपर्यंत वाढू शकणारा, लांब, सडपातळ मासा असून, त्याला लांब शेपटी असते. या शेपटीमध्ये विषारी डंख करण्याची क्षमता असते.
मरलीन मासा : सुईसारखी अणकुचीदार चोचीप्रमाणे तोंड असलेला मासा हा १६ फूट लांबीपर्यंत वाढतो.
ईगल रे मासा : हा गरुडाच्या पंखासारखे कल्ले असलेला मासा पाण्यात पोहताना गरुडाच्या आकाशात उडल्याचा भास होतो.
सेल फिश : हा गलेलठ्ठ मासा २५० ते १००० किलो इतक्या वजनाचा असू शकतो.
अंधाऱ्या समुद्रातील जीव
ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही, अशा खोलवर समुद्रामध्ये अंधार असतो. तिथे आढळणारे जीव हा निसर्गाचा अद्भुत आविष्कार आहे. प्रकाश नसल्याने निसर्गाने काहींना एक अँटिना व त्यावर काजव्यासारखी प्रकाश देणारी यंत्रणा दिली आहे, तर काहींना फक्त तीव्र संवेदनशील मिशी दिली आहे. त्याद्वारे ते भक्ष्य किंवा शत्रूचे अस्तित्व समजून घेतात. यातील काही जिवांचे जबडे मोठे असून, दाताची वैशिष्ट्यपूर्ण रचना असते. त्यांच्या जबड्यात अडकलेले भक्ष्य कधीच सुटू शकत नाही. या अंधाऱ्या वातावरणात काही वनस्पतीही वाढतात. मात्र प्रकाशाची उपलब्धता नसल्यामुळे प्रकाश संश्लेषणाऐवजी रासायनिक संश्लेषणाचा (केमोसिंथेसिस) वापर करतात. कातळ खेकड्यापासून ते ऑक्टोपससारखे दिसणारे प्राणी इथे आहेत. १३० फूट लांबीचा विशाल सायफोर्नोफोर खोल समुद्रात असतो.
प्रदूषणाचा धोका
समुद्राला आपण रत्नाकर म्हणत असलो तरी रत्नांपेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान असा निसर्गाचा खजिना आहे. माणसांनी केलेल्या प्रदूषणाचा फटका नद्या, नालेच नाही, तर या सागरी परिसंस्थेलाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. चंगळवादात बेभान झालेल्या माणसांना अशा सर्व निर्दोष अशा सजीवांच्या जिवावर उठण्याचा काही हक्क नाही. आपण कळत नकळत एकेक करत अनेक सजीव नष्ट करत चाललो आहोत. या सृष्टीच्या नाशासोबतच आपलीही पावले आपोआपच संपूर्ण मानवजातीच्या विनाशाकडेच चालली आहेत. हे सर्वांना समजून घेतले पाहिजे. लहानात लहान प्राण्यांपासून सर्वांत मोठ्या निळ्या व्हेलपर्यंत सर्वांचाच जीव धोक्यात आणला आहे. म्हणून मला स्वतःला एक मानव म्हणून प्रचंड लाज व अपराधी वाटते. सध्या तरी या सृष्टीचा अपराधी असलेल्या मानव जातीला लवकर चांगली बुद्धी येवो, इतकीच प्रार्थना व आशा करू शकतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.