Marriage Problems
Marriage Problems Agrowon
ॲग्रो विशेष

Social Issues : विवाह न जमणे : एक सामाजिक समस्या

सचिन होळकर

लग्न अथवा विवाह हे एक सामाजिक बंधन आहे. समाजव्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी विवाहाचे (Marriage) महत्त्व आहे. अनेक धर्मात हा एक विधी, संस्कार, करार या स्वरूपात पाहिला जातो.

कुटुंब व्यवस्था (Family Arrangement) टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी विवाह ही एक कायदेशीर पद्धती आहे. विवाहात फक्त एका स्त्री (Women) आणि पुरुषाच्या (Male) संबंध जोडला जात नसून त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबाची आणि नातलगांचे देखील संबंध जोडले जात असल्याने विवाहाला एक सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.

असं जरी असलं तरी विवाह जमणे आणि तो टिकवणे एक तारेवरची कसरत आहे. विवाह जमवताना अनंत अडचणी येतात.

अनेक प्रकारच्या गोंधळातून आणि त्रासातून जाणारी ही क्रिया झाली आहे. विवाहास विलंब होणे, विवाह न जमणे ही एक सामाजिक समस्या (Social Problems) म्हणून पुढे येत आहे.

पूर्वीच्या काळी एखाद्या मुला-मुलीचा विवाह घरातील वडीलधारी मंडळी, कर्तें व्यक्ती परस्पर ठरवायचे. अनेकदा मुले-मुली एकमेकांना थेट लग्नातच पाहायचे. दोन कुटुंबांचे पूर्वापर चालत असलेले संबंध असल्याने अल्पवयातच विवाहाची तोंडी बोलणी व्हायची.

मात्र, दिवसेंदिवस काळ बदलत आहे. समाजात चौकसपणा वाढला, माणसं हुशार झाली, मुला-मुलींचे उच्च शिक्षण झाले, संगणक आणि मोबाईलच्या युगात आणि करिअरचा विचार करून उत्पन्नाचा, शिक्षणाचा विचार करून विवाह ठरायला लागले.

या सर्व झटापटीत अनेक मुला-मुलींचे वय वाढत चालले आहे. अनेक मुला-मुलीचे रूपांतर प्रौढात झाले असून त्यांचे विवाहाचे वय आणि शारीरिक अवस्था देखील निघून जात आहे. अनेकांनी या जन्मात आपला विवाह होईल, ही आशा देखील सोडून दिलेली आहे.

समाजातील या गंभीर समस्येस नेमकं जबाबदार कोण? हा खरा प्रश्न आहे. अनेक विवाह संस्था, वधू-वर सूचक केंद्र, विवाह जमवणारे रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. मात्र, तरीही ही समस्या सुटताना दिसत नाही.

वैद्यकीय दृष्टीने पाहता मुला-मुलींच्या वयाला संतती प्राप्तीसाठी ठरावीक मर्यादा आहे. वय जसं वाढत जाईल तसतसं संतती प्रक्रिया गुंतागुंतीची होत जाते, असं तज्ञ सांगतात.

असे असताना या समस्येकडे फारसे कोणी गांभीर्याने बघत नाही. या विषयावर चर्चा होते, परंतु संवाद होताना दिसत नाही, मुला-मुलींचे परीक्षण केले जाते मात्र आत्मपरीक्षण करण्यास कोणी तयार होत नाही.

समाजात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मुलींना खूप मागणी आहे असा एक गोड गैरसमज अनेक मुलींच्या बापामध्ये दिसतो.

लिंग गुणोत्तर कसेही असू द्या मात्र निर्व्यसनी, होतकरू, हुशार मुलांची समाजात प्रचंड कमतरता आहे, हे सत्यही सर्वांनी स्वीकारणे आवश्यक आहे.

विवाह न जमण्याच्या कामात बऱ्याचदा मुलीच्या आई-वडिलांचा प्रचंड अहंकार कारणीभूत ठरतो. मुलाचा पगार, त्याच शिक्षण, त्याची संपत्ती, दिसणं याबाबत प्रचंड तुलना समाजात होताना दिसते.

शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि वर्ष-दोन वर्षांपूर्वी नोकरीला लागलेल्या मुलांकडे गाडी, बंगला, बँक बॅलन्स कुठून येणार? याचाही विचार झाला पाहिजेत. आपल्या वडिलांनी कसे दिवस काढलेत त्यांचे घर, गाडीचे स्वप्न कधी पूर्ण झाले याचा अभ्यास मुलींनी देखील करायला पाहिजे.

शेतकऱ्यांच्या मुलांना मुलींचे वडील सपशेल नाकारतात. मात्र, नोकरीवाल्या मुलाला घरी शेती आहे का? असा प्रश्नही विचारतात आणि कळस म्हणजे यांची मुलगी शेती काम करणार नाही हे अगोदरच सांगितलेलं असतं.

मुलीच्या वडिलांच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे याचा ठाव लागत नाही. अनेक लग्न संबंध जमवताना मुली-मुलांबरोबरच दिसण्याची तुलना करतात, अनेकदा पगाराची तुलना करतात, शिक्षणाची तुलना करतात आणि चांगल्या मुलांना नकार देतात.

वास्तविक विवाह झाल्यानंतर त्यांचा एक परिवार तयार होणार आहे, एकमेकांना समजून घेणारा, मान आणि मन राखणारा, सुख-दुख यामध्ये सोबत राहणारा साथीदार म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे.

अनेकांचे पगार लग्नानंतर वाढतात. घर, गाडी, बंगला या बाबी होण्यास वेळ लागतो, त्याला वेळच द्यावा लागतो. मुलगा निर्व्यसनी, शुद्ध चरित्राचा सुस्वभावी आहे का? याबाबत अधिक चर्चा आणि चौकशी करणे अपेक्षित आहे.

चांगल्या पगाराची नोकरीवाल्याचा शोध घेण्यापेक्षा एखादा व्यावसायिक चांगले पैसे कमवत असेल तर त्याचा देखील विचार झाला पाहिजे.

मुलींप्रमाणे मुलांच्या देखील अनंत अटी आहेत. मुलगी उच्चशिक्षित असली पाहिजे मात्र घरी राहणारी असावी, तिने नोकरी करू नये, अशी काहींची अट असते जे अनेकदा शक्य होत नाही.

विवाह झाल्यावर देखील त्यानंतरचे फारकतीचे प्रमाण याच कारणामुळे वाढत असते. लग्नाअगोदरच मुला-मुलींनी शिक्षण किती असावे, नोकरी व्यवसाय करावा की नाही, या बाबी ठरवून घेणे आवश्यक आहे.

उच्चशिक्षित मुली या करिअर आणि नोकरीस प्राधान्य देणाऱ्या असतात. त्यामुळे त्याचा विचार अगोदरच झाला पाहिजे. दिवसेंदिवस देशात बेरोजगारी वाढत आहे.

सरकारी नोकरी खूपच दूर राहिली मात्र खाजगी नोकरी कायमस्वरूपी चांगल्या पगाराची मिळणे दुरापास्त झाले आहे. अल्पशा पगारावर नोकरी करण्यापेक्षा चांगला व्यवसाय केल्यास आर्थिक स्तर उंचावू शकतो याकडे लक्ष दिले पाहिजे.

विवाह जमवताना मुला-मुलीच्या आई-वडिलांव्यतिरिक्त नातलगांमधील अनेकांचा विचार घेतला जातो. खूप चौकशी, पाहणी करण्यात वेळ वाया घालवला जातो.

अनेक मुला-मुलींचे वडील स्थळ सुचवल्यानंतर उशिरा प्रतिसाद देत असतात. अत्यंत किरकोळ गोष्टींवरून विवाह जमवण्यास नकार दिला जातो. त्यामुळे अटी-शर्तींच्या कैचीतून विवाह जमवणे अशक्य होऊन बसते.

काही ठरावीक अटी असणे आणि त्या सांगणे आवश्यक आहे. मात्र, क्षुल्लक बाबींवरून स्थळ मोडणे योग्य ठरत नाही. ज्योतिष मानायचे की नाही हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे.

मात्र, पत्रिकेतील गुण जास्त असल्यांपेक्षा आपल्या मुला-मुलीतील सद्गुण कसे वाढीस लागतील याचा विचार करायला पाहिजे. विवाह जमवण्यापूर्वी त्या दोन मुला-मुलींसोबत त्यांच्या कुटुंबाची चर्चा होणे आवश्यक आहे.

पूर्वी हुंडा प्रथा मोठ्या प्रमाणात समाजात होती. प्रबोधनाने ती आजकाल बऱ्यापैकी कमी होत आहे. ही चांगली बाब असली तरी दुसरीकडे विवाहाचा वाढता खर्च चिंताजनक विषय बनला आहे.

अनेक विवाह हे विवाह सोहळ्याच्या मागणीवरून मोडतात हे योग्य नाही. विवाह जमवताना मुला-मुलींचा सल्ला घ्यावा त्यांना समजून घेणे आणि ते चुकत असल्यास त्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे.

नात्यागोत्यातील आणि विवाह जमवणाऱ्या लोकांवर विसंबून राहण्यापेक्षा घरात चर्चा करून योग्य निर्णय घेणे कधीही फायदेशीर असते. विवाह जमवणे आणि विवाह यशस्वी होणे हा खूप मोठा विषय आहे.

एखाद्या लेखात तो पूर्ण होऊ शकत नाही. येणाऱ्या काळात सामंजस्याने विचार करून मुला-मुलींचे योग्य वयात विवाह केले पाहिजे हा संदेश समाजात पसरवणे आवश्यक आहे.

(लेखक शेती, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT