विवाह एक जीवन संस्कार

शेतकरी कुटुंबामध्ये लग्न ही आपापल्या दारात व शेतामध्ये करण्याची पद्धत होती. लग्न जमवताना भावकी मधले व पुढारपण करणारी काही मंडळी महत्त्वाच्या समारंभाला हजर असत. किंबहुना, प्रत्येक गावात कोणाचेही लग्न जमवायचे असले, तरी असे एक दोन मध्यस्थी असत. त्यांच्या परस्पर कोणाचे लग्न जर ठरले त्याच्याबद्दल खोट्या-नाट्या गोष्टी सांगून, ते लग्न कसे मोडेल, असे पाहणारेसुद्धा काही मध्यस्थ होते.
Indian Marriage
Indian MarriageAgrowon

शेखर गायकवाड

ग्रामीण महाराष्ट्रातील लग्न लावण्याची पद्धत गेल्या १०० वर्षांत कशी कशी बदलत गेली आहे, हे पाहणे सुद्धा अतिशय रंजक आहे. १८९० च्या आसपास तिथी, टिपण करून आणि त्यावर हळदी-कुंकू टाकून, मुलीच्या किंवा मुलाच्या पित्याला बसवून ते त्यांच्या हातात देऊन लग्न जमवण्याची पद्धत होती. आता कोणत्याही मंगल कार्यालयात लग्नाला हजर राहिल्यास नवरा-नवरी हे भटजी किंवा फोटोग्राफरच्या दिग्दर्शनाखाली काम करताना दिसतात. त्या दोघांच्या संपूर्ण हालचालींवर या दोघांचेच नियंत्रण असते. लग्नाच्या अगोदर प्री-वेडिंग शूटिंग व स्वतःचा एक चित्रपट तयार असतो. डिजिटल स्वरूपात या आठवणी साठवल्या जात आहेत.

शेतकरी कुटुंबामध्ये लग्न ही आपापल्या दारात व शेतामध्ये करण्याची पद्धत होती. लग्न जमवताना भावकी मधले व पुढारपण करणारी काही मंडळी महत्त्वाच्या समारंभाला हजर असत. किंबहुना, प्रत्येक गावात कोणाचेही लग्न जमवायचे असले, तरी असे एक दोन मध्यस्थी असत. त्यांच्या परस्पर कोणाचे लग्न जर ठरले त्याच्याबद्दल खोट्या-नाट्या गोष्टी सांगून, ते लग्न कसे मोडेल, असे पाहणारेसुद्धा काही मध्यस्थ होते. त्याला ग्रामीण भागातील लोक ‘काड्या घालणे’ असे म्हणतात. मात्र एखाद्याने विश्‍वासाने मानपान दिला की मग मुला-मुलींची बाजू कशी वरचढ व चांगली आहे ते परस्पर सांगत असत.

मुलाला भाऊ-बहीण नसेल तर अशा घरात मुलगी देताना लोक अनेक वेळा विचार करत असत. १०० वर्षांनंतर आता सासूरवाडीत किती लोकांचा स्वयंपाक करावा लागेल व कमीत कमी माणसे घरात असतील, तर आपल्या मुलीला कमी काम करावे लागेल व ती सुखात राहील असा धूर्त व बेरकी विचार त्या वेळी नव्हता. किंबहुना, मोठ्या खटल्याच्या घरात लग्न होऊन जात असेल, तर ते घर तालेवार समजले जाई व कोणतीही वाईट परिस्थिती आली तरी मुलीचा संसार कडेला जाईल असा सुरक्षित विचार केला जात असे. हल्ली तर नव्या पिढीच्या तोंडी नवऱ्या मुलाच्या घरी म्हातारे लोक घरात किती आहेत व त्यांना ‘डस्टबीन’ असे संबोधले जाईपर्यंत मजल गेल्याचे काही लोक सांगतात.

लग्न जमवतानाच देण्या-घेण्याची, लग्न कोठे करायचे,‍ वऱ्हाड कसे येईल, मुलाकडचे व मुलीचे पोषाख कोणी घ्यायचे, इथपासून हातातील मनगटी घड्याळ घेण्यापर्यंत चर्चा होत असे. कोल्हापूर, सांगली भागांत देण्या-घेण्याच्या वस्तूंची यादी केली जाते. ‘यादी पे शादी’ केली जाते. १९७० पर्यंत नवरदेव किंवा त्याच्या जवळचे नातेवाईक मिरवणुकीत चांगला घोडा आणला नाही किंवा घड्याळ घेतले नाही, रेडिओ घेतला नाही अशा मुद्यांवरून ऐनवेळी रुसून बसत. अशा वेळी लग्न जमवणारे मध्यस्थ लोक दोन्ही बाजूंची समजूत काढून कसे-बसे लग्न लावून देत. लग्नात लापशी करायची, का बुंदी करायची, की गुळवणीचे जेवण करायचे याची खात्री नवरीच्या मुलांकडून ग्यारंटी म्हणून घेणारे लोक सुद्धा होते.

आर्थिकदृष्ट्या मुलीचे आई-बाप लग्नात होणारा अवाढव्य खर्च करताना मेटाकुटीला यायचे. ते कधी कधी धान्य विकून, शेतीमाल विकून, कधी सावकाराकडून कर्ज काढून आणि जवळच्या मोठ्या नातेवाइकाकडून उसने पैसे घेऊन कसाबसा लग्नाचा खर्च व्हायचा. येणारे नातेवाईक सुद्धा आपापल्या पद्धतीने एक रुपया, दोन रुपये असा आहेर देऊन मुलीच्या वडिलांचा भार हलका करण्याचा थोडा प्रयत्न करत. मामा, काका, मेव्हणे, जावई आणि जवळच्या नातेवाइकांनी आणलेल्या टॉवेल टोपीची सुद्धा घोषणा मोठमोठ्याने माइकवर व्हायची. अकरा रुपये आहेर देणारा नातेवाईकसुद्धा सर्वांना फार भारी वाटायचा. अशा पाहुण्याला जेवायच्या वेळी पत्रावळी ऐवजी पितळी ताटामध्ये वाढले जायचे.

वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये लग्नाचा विधी वेगवेगळा असतो. पूर्वीच्या काळी असणारे निम्मे अधिक विधी आता होत नाहीत. पूर्वी गावांमध्ये उतरल्यावर ज्या भागातून लाउडस्पीकरवर ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ हे गाणे ऐकले की त्या दिशेला लग्नघर आहे हे समजायचे. आता लग्नाचे स्वरूप हे कुटुंब व त्यांचे नातेवाईक यापेक्षा अधिक सामाजिक झाले आहे व त्याला समारंभाचे स्वरूप आलेले आहे. एकेकाळी आठ-आठ दिवस आधी येणारे नातेवाईक आता अर्धा तास अगोदर लग्नात हजेरी लावतात.

नोंदणी विवाहाची संख्या प्रचंड वाढली असून, मुलगा किंवा मुलगी परदेशी असेल तर त्यांच्या विमानाच्या तारखा पाहून लग्न किंवा स्वागत समारंभ आयोजित केला जात आहे. ग्रामीण भागात सुद्धा आता १०-२० कि.मी. अंतरावर मोठमोठी मंगल कार्यालये उभी राहिली आहेत. स्वयंपाकापासून सर्व कामासाठी मदतीला येणारे भावकीतील लोक कमी झाले आहेत. त्याची जागा कंत्राटी मांडववाला, फोटोग्राफर, केटरर यांनी घेतलेली आहे. श्रीमंत कुटुंबांमध्ये स्टार हॉटेलमध्ये लग्न करण्याची पद्धत पडलेली आहे.

विवाह हा जीवनातील एक संस्कार आहे ही धार्मिक भावना थोडी कमी होत असून, लग्नसुद्धा मार्केटिंगच्या जाळ्यात आले आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, हरियानासारख्या राज्यात सर्रासपणे लग्नामध्ये दारू पिणे, हवेत गोळीबार करणे अशा गोष्टींनी शिरकाव केला आहे. लग्नानंतर पाचव्या दिवशी घटस्फोट सुद्धा होत आहेत. संस्कार ते करार अशी ही वाटचाल नसावी हीच साधी अपेक्षा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com