Crop Damage
Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : यवतमाळ जिल्ह्यात अवकाळीने हिरावला नऊ हजार शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

Team Agrowon

Yavatmal News : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात १७ ते १९ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) नऊ हजार शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे.

गारपीट वादळीवाऱ्याने चार हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. महसूल, कृषी व पंचायत विभागाने केलेल्या संयुक्त पाहणीचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.

गेल्या वर्षीच्या खरीप हंमागापासून शेतकऱ्यांच्या मागे पावसाचे शुक्लकाष्ठ लागले आहे. खरिपात संततधार पावसाने पिकांना फटका बसला. त्यानंतर मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाने पिके उद्ध्वस्त केली आहेत.

काढणीला आलेला गहू, हरभरा, संत्रा पिकांवर गारपिटीने नांगर फिरविला. अवकाळी पावसानंतर जिल्हा प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

महसूल, कृषी व पंचायत विभागाने संयुक्त पंचनामे केले आहेत. या पंचनामातून नुकसानीचे चित्र समोर आले आहे. अवकाळी पावसाने नऊ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

आठ तालुक्यांतील तीन हजार ९८७ हेक्टरवरील पिके पाऊस, गारपीट, वादळ वाऱ्यात सापडली आहेत. या शेतकऱ्यांना मदतीसाठी दहा कोटी ८६ लाख ८५ हजार रुपयांची गरज आहे. यंदा पाऊस चांगला असल्याने रब्बीचे पेरणी क्षेत्र वाढले होते. पीकही चांगल्यास्थितीत होते.

ऐनवेळी आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. अवकाळीने यवतमाळ, कळंब, दारव्हा, पुसद, दिग्रस, उमरखेड, महागाव या तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर, उडीद व मुंग पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

या संकटातील नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगाम ‘कॅश’ करण्याची तयारी शेतकऱ्यांची होती. मात्र, ऐनवेळी अवकाळी पावसाने घरी येणाऱ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेला आहे.

दहा कोटींचा मदतीचा प्रस्ताव

अवकाळी पावसानंतर सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. कर्मचाऱ्यांचा संप, तलाठी आंदोलनामुळे पंचनामे करण्यास उशीर झाला. मात्र, यानंतरही प्रशासनाने मागे लागून पंचनामे करून घेतले. त्यातून नुकसानीचे चित्र समोर आले आहे.

आठ तालुक्यांतील नऊ हजार शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला आहे. याच्या मदतीसाठी दहा कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT