Human Psychology Agrowon
ॲग्रो विशेष

Human Psychology : आग्रही नेतृत्व

Team Agrowon

डॉ. आनंद नाडकर्णी

Human Psychological Health : जेव्हा समोरची समस्या जीवावरचं संकट, जैविक संकट (जीवन मरणाच्या प्रश्‍नाइतकं गंभीर) वाटते, तेव्हा आपण क्षणाचाही विलंब न करता त्याला प्रत्युत्तर देतो, स्वत:ला वाचायला मदत करेल अशी कृती करतो. विचारांचं विश्‍लेषण करून प्रतिसाद देणं तेव्हा आपल्याला जमतच नाही. जीवघेण्या संकटाशी मुकाबला करताना तत्काळ प्रतिक्रिया आणि कृती हे आपल्या ऑटोमॅटिक हार्डवेअरचा भाग आहेत. पण असे जीवघेणे प्रसंग तसे विरळच. बाकी आपल्याला ज्या समस्या भेडसावतात, जसं की नात्यातले तणाव, आपलं किंवा आपल्या मुलांचं अभ्यासातलं अपयश, आर्थिक चणचण, या समस्या काही जीवघेण्या नव्हेत. वास्तववादी पद्धतीने आपण यातली प्रत्येक गोष्ट तपासून पाहिली तर लक्षात येईल की बहुतेक वेळी ती समस्या मनोसामाजिक म्हणजे आपल्या मनाला न आवडणारी आणि सामाजिक संदर्भात न बसणारी म्हणून कठीण समस्या वाटत असते.

मागच्या दोन लेखांत आपण स्वप्रतिमेचे चार पॅटर्न आणि आपला मूळ स्वभाव कसा ओळखायचा हे विस्तारानं पाहिलं. आग्रही / निर्धारी पॅटर्नवर असणं फायद्याचं, हे आपल्याला पक्कं कळलं आहे. पण बऱ्याच वेळा कळलं तरी वळतं नाही. निर्धारी पॅटर्नवर राहायचं ही खुणगाठ मनाशी बांधली तरी बऱ्याचदा ते जमत नाही.

समोरचं संकट म्हणजे अगदी जिवावर बेतलेला प्रसंग आहे, असा विचार आपल्याही कळत-नकळत मन करतं आणि अशा वेळी आपण प्रतिसाद देण्याऐवजी प्रतिक्रिया देतो. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला अनुभवायचं असेल तर मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करायचा अनुभव तुम्ही घ्यायला हवा. ट्रेनमध्ये चढताना उतरताना प्रवाशांचा आविर्भाव एखाद्या जीवघेण्या संकटाशी जिवाच्या कराराने सामना करावा तसा असतो.

नक्की काय विचार करत असतील हे प्रवासी? मी असा आक्रमक झालो नाही, मुसंडी मारून घुसायचा प्रयत्न केला नाही तर मला हव्या त्या ट्रेनमध्ये या गर्दीत चढताच येणार नाही किंवा माझं स्टेशन आलं तरी मला उतरताच येणार नाही. म्हणजे खरं तर समस्या आहे गर्दीतून गाडी पकडणे, त्यातून इच्छित स्टेशनला उतरणे. पण या समस्येशी मुकाबला करताना, जैविक संकटाशी सामना करत असल्यासारखे लोक आक्रमक होतात. साहजिकच प्रतिसाद न देता प्रतिक्रया द्यायला आणि तसं वागायला सुरुवात होते.

जेव्हा समोरची समस्या जिवावरचं संकट, जैविक संकट (जीवन मरणाच्या प्रश्‍नाइतकं गंभीर) वाटते, तेव्हा आपण क्षणाचाही विलंब न करता त्याला प्रत्युत्तर देतो, स्वत:ला वाचायला मदत करेल अशी कृती करतो. म्हणजे रस्त्यात भरधाव वेगाने समोरून गाडी आली, कोणी सुरा -कोयता घेऊन अंगावर धावून आलं... असं काही झालं तर आपण चटकन प्रतिक्रिया देतो. विचारांचं विश्‍लेषण करून प्रतिसाद देणं तेव्हा आपल्याला जमतच नाही. जीवघेण्या संकटाशी मुकाबला करताना तत्काळ प्रतिक्रिया आणि कृती हे आपल्या ऑटोमॅटिक हार्डवेअरचा भाग आहेत. पण असे जीवघेणे प्रसंग तसे विरळच.

बाकी आपल्याला ज्या समस्या भेडसावतात, जसं की नात्यातले तणाव, आपलं किंवा आपल्या मुलांचं अभ्यासातलं अपयश, आर्थिक चणचण, या समस्या काही जीवघेण्या नव्हेत. वास्तववादी पद्धतीने आपण यातली प्रत्येक गोष्ट तपासून पाहिली तर लक्षात येईल की बहुतेक वेळी ती समस्या मनोसामाजिक म्हणजे आपल्या मनाला न आवडणारी आणि सामाजिक संदर्भात न बसणारी म्हणून कठीण समस्या वाटत असते. अतिविचारामुळे आपण ती मोठ्ठी (जीवन मरणा इतकी भयंकर) बनवलेली असते.

आग्रही भूमिकेवर ठाम राहायचं असेल तर आपल्या समोरची समस्या जैविक की मनोसामाजिक हे नेमकेपणानं ओळखणं गरजेचं आहे. माझं आता नक्की उद्दिष्ट काय आहे? त्यासाठी मला मदत करणारे विचार आणि वर्तन कुठले? अशा पद्धतीने समस्या हाताळणं म्हणजे प्रतिसाद देणं. आग्रही किंवा निर्धारी पॅटर्नवर राहून असा प्रतिसाद देता येतो. मात्र तो आपल्या हार्डवेअरचा भाग नसून, प्रयत्नपूर्वक इंस्टॉल करायच्या आणि वापरण्याच्या सॉफ्टवेअरचा भाग आहे

त्यामुळे पॅटर्न ३ वर राहणे (निर्धारी राहणे) यासाठी प्रयत्नांची, सजगतेची, प्रशिक्षणाची व सरावाची गरज आहे. कुटुंबात, कामाच्या जागी, सार्वजनिक ठिकाणी सगळीकडे असे लोक भेटतात, अनुभव येतात जे आपल्याला ३ वरून हलवू पाहतात, इतर पॅटर्नवर ढकलू पाहतात. अशा वेळी निर्धाराच्या पॅटर्नवर राहणं सोपं आहे का? नक्कीच नाही. पण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा सगळ्यात फायद्याचा पॅटर्न.

आपण आपल्या पॅटर्न ३ वर राहून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इतर पॅटर्नवर जाणे, पवित्रा म्हणून इतर पॅटर्न वापरणेही कधी कधी गरजेचे असते. काही वेळा समस्या सोडवायला तर कधी समोरच्या व्यक्तीत परिवर्तन घडवून आणायला हे पवित्रे वापरावे लागतात. एक उदाहरण बघूया.
दारूचे व्यसन असलेली व्यक्ती माझ्याकडे रुग्ण म्हणून आली आहे. माझ्या वैद्याकीय सल्ल्यानुसार, या व्यक्तीला ॲडमिट होण्याची गरज आहे. पण ती व्यक्ती मात्र ते मान्य करायला तयारच नाही. ती व्यक्ती आक्रमक पॅटर्नवर आहे.

अशा वेळी मी किंवा कुठलाही डॉक्टर सुरुवातीला ३ पॅटर्नवर राहून समजावण्याचा प्रयत्न करेल. तो निष्फळ ठरला आणि त्या व्यक्तीचा ४ नंबरचा पॅटर्न लक्षात आला तर मग?
- भिडस्त पॅटर्नवर राहून, बाबापुता करून त्याला समजावण्याचा प्रयत्न करता येईल.
- तो जुमानत नाही म्हटल्यावर तटस्थ भूमिकेत जाऊन त्याला होणाऱ्या गंभीर परिणामांच्या जबाबदारीची कल्पना देऊन, त्यातून आपण आता अंग काढून घेतो आहोत असे दाखवता येईल.
- आक्रमक पवित्रा घेऊन, त्याच्या ‘अरे’ला ‘का रे?’करून त्याला जबरदस्ती ॲडमिट करता येईल.

मात्र पवित्रा म्हणून असे वेगवेगळे पॅटर्न वापरत असताना माझं उद्दिष्ट ‘विधायक आहे का?’ हे लक्षात घेणं महत्त्वाचं. विधायक उद्दिष्ट म्हणजे माझा आणि त्यासोबतच इतरांचा लाभ, विकास होणार आहे असे उद्दिष्ट. माझं उद्दिष्ट किंवा ध्येय हे फक्त स्वार्थ साधणारे आणि इतरांना हानिकारक असेल तर मात्र तो पवित्रा न ठरता लबाडी ठरेल.

समूहाचे नेतृत्व करायचे, दिशा द्यायची तर अशा नेतृत्वासाठी त्या व्यक्तीकडे काय गुणविशेष आवश्यक आहेत?
- सातत्याने पॅटर्न ३ वर स्थिर असणं.
- उद्दिष्टे व्यापक व विधायक असणं.
- योग्य वेळी योग्य उद्दिष्टांसाठी योग्य पावलं उचलता येणं.
- नजीकचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य वेळी पवित्रा घेता येणं आणि उद्दिष्ट साध्य झालं की झालं की पवित्रा मागे घेता येणं.
- लांब पल्ल्याच्या उद्दिष्टांचे भान व त्याला नजीक काळातील उद्दिष्ट जोडता येणं.

शिवाजी महाराज, उद्योगपती जे. आर. डी. टाटा, महात्मा गांधी यांची चरित्रं वाचली तर आपल्याला या साऱ्या गुणांची उदाहरणं त्यात ठायीठायी दिसतील.
खालील काही मुद्दे / विचार त्यासाठी मदत करतील –
- मला मिळालेली सत्ता हेच माझे साध्य आहे की मूळ ध्येय पूर्ण करण्यासाठी उपयोगी असे साधन?
- राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा कुठल्याही सत्तेत असणारी व्यक्ती जर सत्तेकडे साध्य म्हणून पाहात असेल, तर त्या व्यक्तीचे सत्ता मिळवणे आणि टिकवणे हेच उद्दिष्ट बनते. तेव्हा सत्ता टिकविण्यासाठी ती व्यक्ती काहीही करायला तयार असते. जास्तीत जास्त वैयक्तिक लाभ, फक्त स्वहित आणि स्वार्थाचा विचार असतो.

मात्र ज्या व्यक्तीला स्वहित आणि परहित जोडून घेणारे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे, ती व्यक्ती सत्ता हे सगळ्यांच्या विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे असे मानते. असे नेतृत्व कसोटीच्या प्रसंगात निर्धारी आणि आग्रही अशा पॅटर्न ३ वर राहू शकतं, ध्येयाची स्पष्टता ठेवून त्याच्या पूर्ततेसाठी इतर पॅटर्नचे वेगवेगळे पवित्रे घेऊ शकतं. असं नेतृत्व विचारांचा वारसा व वसा सर्वांकडे कसा नेता येईल असा विचार करतं. केवळ मी आणि माझी सत्ता यात गुंतून न पडता, हे नेतृत्व पुढील पिढीचे नेते म्हणजेच वारसदार तयार करण्यावर भर देतं. असा वारसा निर्माण करणारं नेतृत्व जगात वंदनीय मानलं जातं.

एक उद्यमशील, कर्ता शेतकरी बनायचे तर आपल्यामधील आग्रही / निर्धारी दृष्टिकोन बळकट करणे योग्य ठरेल.
----------------
संशोधन आणि शब्दांकन : डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी

kartashetkari@gmail.com
आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक –
https://www.youtube.com/watch?v=7vBng5PIP8c

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT