Bhandara News : भंडारा ः भातपट्ट्यात आर्थिक सक्षमता येण्यासाठी शेतकऱ्यांनी मोहरी सारख्या तेलबियावर्गीय पिकांच्या लागवडीवर भर दिला पाहिजे. या माध्यमातून कुटुंबाची खाद्यतेलाची गरज भागत बाजारातून मागणी असल्याने परतावाही चांगला मिळण्यास मदत होते, असे मत नागपूर विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी व्यक्त केले.
बेलगाव येथे भागत माटे यांच्या शेतावर आयोजित मोहरी शेती दिन कार्यक्रमात घाटगे बोलत होते. या वेळी श्री. घाटगे यांच्या हस्ते मोहरी उत्पादक ब्रह्मा मोटघरे तसेच भागवत माटे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यपीठाअंतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वयित मोहरी संशोधन प्रकल्प नागपूरच्या माध्यमातून खमारी आणि बेलगाव या भागात २०२३-२४ या वर्षात २० मोहरी पिकांचे प्रात्यक्षिक देण्यात आले होते.
मोहरी लागवडीला प्रोत्साहन मिळावे याकरिता हा प्रयत्न करण्यात आला. कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रोत्साहनातून २०२४-२५ या वर्षात भंडारा तालुक्यातील खमारी बेलगाव, मांडवी आणि इतर गावांमध्ये मोहरीखालील क्षेत्र ८०० एकरावर पोहोचले आहे. ११३ प्रथम रेषीय प्रात्यक्षिकसुद्धा देण्यात आली आहेत.
पीक व्यवस्थापनाच्या विविध टप्प्यांवर मोहरी उत्पादक शेतकऱ्यांना डॉ. बीना नायर यांच्या मार्गदर्शनात डॉ. संदीप कामडी, डॉ. दीक्षा ताजने, शरद भुरे, भूषण बारुडकर यांच्याद्वारे मार्गदर्शन केले जाते. भागवत माटे आणि गिरीश रणदिवे या कृषी सहायकांनी देखील पीक व्यवस्थापनाच्या बाबतीत शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती दिली, असे या वेळी प्रास्ताविकातून सांगण्यात आले. जवस पैदासकार डॉ. बिना नायर यांनी मोहरी तेल आरोग्यास लाभदायक असल्याने त्याचा वापर आहारात वाढविण्याचा सल्ला दिला.
या वेळी डॉ. एस. के. जांभूळकर यांनी मोहरी लागवड क्षेत्रात होणारी वाढ सुखावणारी असल्याचे सांगितले. आत्मा प्रकल्प संचालक डॉ. उर्मिला चिखले यांनी या पिकात रानटी प्राण्यांचा उपद्रव कमी असल्यामुळे लागवड क्षेत्रात वाढीचे आवाहन केले. साकोली येथील धान पैदासकार डॉ. मिलींद मेश्राम यांनी धान पिकाच्या लवकर येणाऱ्या वाणांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने, विजय लेंडे, प्रभू फेंडर, सचिन बोरकर यांची उपस्थिती होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.