Team Agrowon
मोहरी बियांमध्ये ३२ ते ४० तेलाचे प्रमाण असून हे मानवी शरीरास गुणकारी आहे.
मोहरीच्या हिरव्या कोवळ्या पानाची भाजी आरोग्याला उत्तम असते. मोहरीमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम, जीवनसत्त्व अ आणि जीवनसत्त्व क मोठ्या प्रमाणात आहे.
मोहरीच्या ढेपेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असून दुधाळ जनावरांसाठी उपयुक्त आहेत. या पिकाला कमी ओलित (२ ते ३ पाण्याच्या पाळ्या) लागते.
गावठी तसेच रानटी जनावरे या पिकाला सहसा खात नाहीत. तसेच रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असतो.
पूर्व विदर्भात भात पिकानंतर कमी कालावधीत तसेच कमी उत्पादन खर्चात येणारे मोहरी हे एक उपयुक्त पीक आहे.
भात पीक निघाल्यानंतर पूर्व विदर्भातील शेतकरी रब्बी पिके पारंपरिक पद्धतीने घेतात. त्यामुळे शेतात रोपांची योग्य संख्या रहात नाही. कुठे दाट तर कुठे विरळ होते, त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.
मोहरीची पेरणी करताना शेतकरी अजूनही स्थानिक जातींचा वापर करतात. एकरी २ ते ३ किलो बियाणे वापरतात, अयोग्य व्यवस्थापनामुळे पीक उत्पादनात घट होते. हे लक्षात घेऊन सुधारित तंत्राने मोहरी लागवडीचे नियोजन करावे.