Maharashtra Assembly Winter Session Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Winter Session : हत्या, हिंसाचाराचे सभागृहात पडसाद

Political Violence : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा झालेला निर्घृण खून आणि परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील संविधान प्रतिकृतीच्या झालेल्या विटंबनेचे पडसाद सोमवारी (ता. १६) विधानसभेत उमटले.

बाळासाहेब पाटील

Nagpur News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा झालेला निर्घृण खून आणि परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील संविधान प्रतिकृतीच्या झालेल्या विटंबनेचे पडसाद सोमवारी (ता. १६) विधानसभेत उमटले. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मराठवाड्यातील या दोन जिल्ह्यांत घटना घडल्याचे सांगत या प्रकरणी स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी केली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाचा अपमान खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देत अध्यक्ष जो दिवस नेमून देतील त्यादिवशी या घटनांवर चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितले.

परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्याच्या घटनेने शहरातील आंबेडकरी अनुयायी प्रक्षुब्ध झाले आहेत. या घटनेचा निषेध करताना आंदोलनाला काही ठिकाणी हिंसेचे गालबोट लागले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीहल्ला करून कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. तर बीड जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे मंत्री यांचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडवर देशमुख यांच्या हत्येचा संशय आहे. हत्येच्या घटनेनंतर बीडमध्ये ठिकठिकाणी बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. नाना पटोले यांनी आज विधानसभेत मराठवाड्यातील या घटनांकडे सरकारचे लक्ष वेधले.

संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि सरपंचाची हत्या या दोन्ही घटना भाजप सरकार आल्यानंतर घडल्या आहेत. परभणीत एका आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला आहे. या घटना अत्यंत गंभीर असून आंबेडकरी अनुयायी आणि राज्यातील जनतेत प्रचंड संताप आहे. सरकारने या मुद्द्यांवर उत्तर द्यायची तयारी दाखवावी, अशी मागणी पटोले यांनी केली. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे. पुरवणी मागण्या आणि शोक प्रस्ताव असल्याने त्यावर चर्चा घेता येणार नाही असे सांगत पटोले यांची मागणी फेटाळली.

त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. बीड आणि परभणी येथील घटनांवर गंभीर चिंता व्यक्त करत फडणवीस यांनी संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही, असे बजावले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार सभागृहात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. विधानसभा अध्यक्ष जो दिवस नेमून देतील त्यादिवशी चर्चा केली जाईल. यावेळी सरकारच्या वतीने काय कारवाई केली, याची माहिती दिली जाईल. राज्यातील वातावरण जर चांगले ठेवायचे असेल तर विरोधकांनीही सहकार्य करावे. चांगल्या सूचना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना होती. देशमुख यांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आल्यानंतर पोलिस सक्रिय झाले. राज्यात भाजप सरकार आल्यानंतर दलित आणि बहुजन समाजावर अत्याचार केले जात आहेत का? ईव्हीएम सरकारने राज्यात राजकीय हत्यासत्र सुरू केले आहे का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT