
Mumbai News : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे पुन्हा एकदा सरकार आले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला असून विशेष अधिवेशनात आमदारांचा देखील शपविधी पार पडला आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार अशी चर्चा रंगली असतानाच राहुल नार्वेकर यांच्या नावावर रविवारी शिक्कामोर्तब झाला आहे. त्यांच्याविरोधात कोणताच अर्ज न आल्याने विधानसभा अध्यक्षपदी नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. याआधी देखील विधानसभा अध्यक्षपद नार्वेकर यांच्याकडेच होते.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षपदी नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्याचा प्रस्ताव दिला. त्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, अशिष शेलार यांनी अनुमोदन दिले. तर हंगामी अध्यक्ष भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
दरम्यान रविवारी (ता.८) विधानसभा अध्यक्षपदावरून सागर बंगल्यावर भेटीगाठींना वेग आला होता. राहुल नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखली उपस्थित होते.
सागर बंगल्यावरील भेटीगाठी आणि बैठकीनंतर नार्वेकर यांच्या नावावर भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी नाव निश्चित झाले होते. तर यानंतर नार्वेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.
यानंतर नार्वेकर पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी आपले नावाचा विचार पक्षाने केल्याने पक्षश्रेष्ठींचे आभार मानत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तर भाजप हा तरूणांना संधी देणारा पक्ष असून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, फडणवीस यांच्यासह पक्षाचे आभार मानतो. मला आज कुठल्याही प्रकरचे राजकिय वक्तव्य करायचे नसून जनतेला कुणावर विश्वास आहे हे मतांमधून दाखवून दिल्याची प्रतिक्रियाही नार्वेकर यांनी होती.
फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन, या घोषणेप्रमाणे नार्वेकर देखील पुन्हा आले आहेत. ते आता दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष असतील. तर याआधी त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय दिला होता. ज्यामुळे त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढले होते. तर शिवसेना व राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी टीका केली होती.
विधानसभेच्या अध्यक्षपदी लागोपाठ दुसऱ्यांदा निवड होणारे राहुल नार्वेकर दे दुसरे अध्यक्ष ठरले आहेत. याआधी १७ मार्च १९६२ ते १३ मार्च १९६७ आणि १५ मार्च १९६७ ते १५ मार्च १९७२ या कालावधीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे विधानसभेच्या अध्यक्षपदी होते. त्यांनी अध्यक्ष म्हणून दोन वेळा विधानसभेचे कामकाज पाहिले. नार्वेकर यांनी पहिल्यांदा अडीच वर्षे अध्यक्षपद भूषविले असून आता ते पाच वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.