Pune news : महानंद डेअरी गुजरातच्या एनडीडीबीला चालवण्यासाठी देण्याचा निर्णय झाल्याने राज्यात एकच खळबळ उडालेली आहे. याबाबत महानंद डेअरी दूध संघाच्या संचालक मंडळाने ठराव केला होता. त्यावरून राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अजित पवार यांच्यावर बुधवारी (ता.३ रोजी) जोरदार टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे केंद्राच्या ताटाखालची मांजरे झाली आहेत, असा हल्लाबोल केला आहे.
महानंद डेअरी गुजरातच्या एनडीडीबीला चालवण्यासाठी देण्यावरून टीकेची झोड उठली आहे. यावरूनच राऊत यांनी राज्य सरकारसह मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी राऊत यांनी, महाराष्ट्रात हे धृतराष्ट्रांचे सरकार स्थापन झाले असून ते महाराष्ट्राचा अपमान आणि लूट उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत असं म्हटलं आहे.
पुढे राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये दुध आणि दुध डेअरी याचे फार मोठे जाळे आहे. त्यासाठी फक्त अमूलच पाहिजे असं नाही. येथे महाराष्ट्रातील दुधाचा ब्रँड महानंदा आहे. वारणा, गोकूळ, चितळे सारखी अनेक उद्योग आहेत. पण आता या सरकारकडून आणि भाजपकडून राज्याचा ब्रँड गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला जातोय. महाराष्ट्राची ओळख पुसून टाकली जात आहे. यामागे कोण आहेत असा सवाल रोऊत यांनी केला आहे.
तसेच महानंदचा हा घोटाळा आणि भ्रष्टाचार दिसत नाही का असा सवाल राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. आता महानंदा आणि याच्या आधी अनेक असे एक एक उद्योग ओरबडून गुजरातला नेले जात आहेत. पण मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तोंडाला कुलूप लावले आहे. हे कसले मुख्यमंत्री? असेही राऊत यांनी टोला लगावला आहे.
तर सहकार चळवळीवर आणि त्यातील उद्योगावर राज्यातला शेतकरी, कष्टकऱ्याचा रोजगार आहे. पण आता ती सहकार चळवळच मोडीत काढली जात आहे. महानंदा गुजरातला नेला जातोय. पण असा प्रयत्न झालाच तर शिवसेना शांत बसणार नाही असा इशारा देखील राऊत यांनी दिला आहे.
काँग्रेसवर अधिक भार नको
इंडिया आघाडीच्या बैठकीवरून प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, इंडिया आघाडीची कोणतीही ऑनलाईन बैठक होणार नाही. उद्धव ठाकरे आणि नितिश कुमार यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे. काँग्रेस व्यतिरीक्त इतर विरोधी पक्षांशी आमचे बोलणे सुरू आहे. सध्या काँग्रेस इतर प्रश्नांत गुंतलेली आहे, त्यांची न्या यात्री निघणार आहे. त्यामुळे काँग्रेसवर अधिक भार न टाकता प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला हवी, अशी आमची भूमिका आहे. यावरूनच उद्धव ठाकरे आणि नितिश कुमार यांच्यात चर्चा झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.