Mumbai News : महाराष्ट्र सहकारी दूध महासंघ मर्यादितचे (महानंद) राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे (एनडीडीबी) हस्तांतर करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. महानंदकडे असलेल्या काही कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जाणार आहे. तर काही कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देऊन त्यांची देणी राज्य सरकारने द्यावीत,
अशी अट एनडीडीबीने घातल्याचे समजते. दरम्यान, महानंदच्या संचालक मंडळाची बैठक २८ डिसेंबर रोजी झाली असून, या बैठकीत महानंद हा ब्रँड कायम ठेवून संचालक मंडळाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रस्ताव सादर करण्यास मान्यता दिली आहे.
महानंद दुग्धशाळेची सध्या आर्थिक डबघाईला आला आहे. महानंदला सदस्य संघांकडून नाममात्र दूध पुरवठा केला जातो. मागील वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महानंदचे एनडीडीबीत विलीनीकरण केले जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र त्यानंतर काहीच हालचाली झाल्या नव्हत्या.
मात्र डिसेंबरअखेर झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाची (महानंद दुग्धशाळा) आर्थिक डबघाईची परिस्थिती विचारात घेता पुनरुज्जीवन, सुधारणा आणण्याची गरज आहे. त्यासाठी महानंदचे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे (एनडीडीबी) हस्तांतर करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा ठराव करण्यात आला.
५५० कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती
सध्या महानंदकडे ८५० कर्मचारी आहेत. मागील वर्षी ही संख्या ९४० होती. त्यापैकी ४५० कर्मचारी कायम ठेवू असे एनडीडीबीने म्हटले होते. आता मात्र ३०० कर्मचारी सामावून घेण्यास एनडीडीबीने सहमती दर्शविली आहे. उर्वरित ५५० कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय दिला आहे. या कर्मचाऱ्यांची देणी आणि अन्य बाबींचा भार राज्य सरकारने उचलावा, अशी अट घालण्यात आली आहे.
हस्तांतराची प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यासाठी एनडीडीबी आणि महानंदच्या संचालक मंडळाची एकत्रित बैठक आयोजित करण्यात यावी, अशी विनंती ‘पदुम’चे सचिव तुकाराम मुंडे यांच्याकडे केली आहे.
महानंदच्या संचालक मंडळाने केलेल्या ठरावात चार ठराव केले आहेत. महानंदच्या सदस्य संघांचे १०० टक्के दूध स्वीकारण्यात यावे. संचालक मंडळाचे अस्तित्व कायम ठेवावे. महानंद ब्रँड नावानेच कामकाज करण्यात यावे तसेच एनडीडीबीला हस्तांतर करण्यापूर्वी शासन, एनडीडीबी, दूध महासंघाच्या संचालक मंडळाची बैठक घेण्यात यावी, असे ठराव करण्यात आले.
सदस्य संघांमुळे महानंद डबघाईला
राज्यातील सर्व खासगी आणि सहकारी दूध संघ महानंदचे सदस्य आहेत. या संघांनी एकूण दूध संकलनापैकी पाच टक्के दूध महानंदला घालणे अपेक्षित असताना महानदला केवळ ४० हजार लिटरपेक्षाही कमी दूध घातले जाते. वास्तविक महानंदच्या यंत्रसामग्रीचा विचार केला तर ९ लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. मात्र, केवळ ३० टक्के दूध संकलन होत असल्याने उर्वरित यंत्रसामग्री वापराविना पडून आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.