शिवाजी काकडे
Medium of Education: ही गोष्ट पुण्यातली आहे. पुणे येथे एक माणूस आला होता. तो अनेक भाषा सफाईदारपणे बोलत असे. त्यामुळे तो नेमका कोणत्या प्रांतातला आहे आणि त्याची मातृभाषा कोणती आहे हे कोणालाच ओळखता येईना. त्यानेही माझी मातृभाषा कोणती आहे हे ओळखून दाखवा असे आव्हान दिले. पण ते कुणालाही शक्य होईना. नाना फडणीस हे पुण्यातले अत्यंत हुशार गृहस्थ होते. लोकांनी त्याला त्यांच्याकडे पाठवले. नानांनी त्याच्याशी गप्पा मारून त्याला आपल्या घरी ठेवून घेतलं.
एकेदिवशी दुपारी थोडेसे जड जेवण करून तो झोपला. त्याला गाढ झोप लागल्यावर नानांनी सेवकाला त्याच्या तोंडावर पाणी मारायला सांगितले. पाणी मारताच तो चिडून उठला आणि सू छे, सू छे असा ओरडला. संध्याकाळी नानांनी त्याला सांगितले तुमची मातृभाषा गुजराती. या गोष्टीवरून आपल्या जीवनातील मातृभाषेचे स्थान लक्षात येते. मुलांच्या शिक्षणाचे माध्यम कोणते असावे, बोर्ड कोणते असावे ही चिंता पालकांना शाळा प्रवेशावेळी सतावत असते.
आपण मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले नाही तर आपण जगाच्या स्पर्धेत मागे पडू अशी अनाठायी भीती पालकांना वाटते. अनेक पालक केवळ सामाजिक प्रतिष्ठा म्हणून मुलांचा प्रवेश इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घेतात. मात्र ज्याच्यासाठी हे सगळे केले जाते त्या मुलांची शिकण्याची प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे. संशोधनाअंती शिक्षण मातृभाषेतूनच प्रभावीपणे होते हे सिद्ध झाले आहे.
आनंददायी शिक्षणासाठी
थोर विचारवंत जे कृष्णमूर्ती यांचं एक धक्कादायक पण अंतर्मुख करायला लावणार विधान आहे. ते शाळेविषयी म्हणतात, ‘शाळा आणि तुरुंग या जगातील दोनच जागा अशा आहेत की जिथे कोणीच स्वतःहून जात नाही. तिथे दाखल करावे लागते.’ शिक्षण ही खरंतर आनंददायी प्रक्रिया आहे. प्रत्येक मूल स्वतःहून. शिकण्यासाठी धडपड करत असते. कारण शिक्षण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.
मात्र मुलांना शाळेत जायला आवडत नाही हे वास्तव आहे. कधी पालकांचा धाक तर कधी प्रलोभन दाखवून मुलांना शाळेत पाठवले जाते. जगभरात मुलांना आनंददायी शिक्षण कसे द्यावे यावर संशोधन आणि प्रयोग झाले. मुलांना खेळ, कृती, अनुभव आधारित शिक्षण दिल्यास मुलांना ते आवडते. तसेच काही शैक्षणिक सिद्धांतही पुढे आले. मुलांना मूर्ताकडून -अमूर्ताकडे, सोप्याकडून - अवघडाकडे अशा पद्धतीने शिकवावे लागते. शिक्षण आनंददायी होण्यासाठी शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुलांचा भाषा संपादनाचा प्रवास हा गर्भातून सुरु झालेला असतो. शाळेत जाण्यापूर्वीच मुलांनी मौखिक भाषा आत्मसात केलेली असते. याच काळात मुलांच्या भावविश्वाचा विस्तार होत जातो. आपल्या आजूबाजूच्या परिसराचा, घटनेचा विचार करायला मुले शिकतात. आजपर्यंत मातृभाषेतून व्यक्त होणाऱ्या मुलांचा प्रवेश इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होतो तेव्हा त्याच्या पूर्वानुभवातील भावविश्वाचा आणि शाळेतील विश्वाचा सांधा जुळत नाही.
घरात मराठी किंवा मुलांची स्वतःची दुसरी कोणती मातृभाषा बोलणारा विद्यार्थी ज्या वेळी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतो त्या वेळी इंग्रजी भाषा शिकणे हेच त्याच्यासमोर आव्हान असते. शिक्षकांनाही मुलांना पूर्ण विषय इंग्रजीत शिकवणे हे आव्हान असते. बऱ्याचदा केवळ लेखनक्रिया किंवा पाठांतर यावर भर दिला जातो. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात संवाद कमी प्रमाणात होतो. यामुळे शिक्षक - विद्यार्थी भावनिक नाते निर्माण होत नाही.
मुलांची घरातील भाषा आणि शाळेत शिकण्याची भाषा एकच असेल तर शिक्षक -विद्यार्थी संवाद होऊन मुलांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण होते. लहान बालकांना सहानुभूती, त्यांचे पालनपोषण आणि प्रेम आवश्यक असते. बालकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली की ते विश्वास ठेवू शकतात. अशा वातावरणात मुले जिज्ञासू, विचारशील, आनंददायी, दृढनिश्चयी, प्रेमळ, साहसी आणि निर्भय होऊन चांगल्या प्रकारे अध्ययन करू शकतात. मातृभाषेतील शिक्षण हे ज्ञानार्जन प्रक्रियेत गोडी निर्माण करणारे आणि अधिक आनंददायी असते.
जिज्ञासेला प्रोत्साहन देण्यासाठी
प्रत्येक मुलात जन्मतःच जिज्ञासू वृत्ती असते. वय वर्षे ४ ते १४ हा काळ कमाल जिज्ञासा उत्पन्न होण्याचा कालखंड असतो. कुतूहलातून, जिज्ञासेतून मुले पालकांना विविध प्रश्न विचारून भंडावून सोडतात. हे खऱ्या अर्थाने सहज शिक्षण असते. मुलांच्या मनात जिज्ञासा जागृत झाल्यानंतर जे शिक्षण होते ते मुलांना आनंद देणारे असते. मात्र मुलांची ही सहज शिक्षणाची प्रक्रिया मुले शाळेत गेल्यानंतर संपुष्टात येते. म्हणून मुलांना शाळा तुरुंग वाटायला लागून शिकणे शिक्षा दिल्यासारखे वाटते.
मुलांच्या जिज्ञासूवृत्तीला चालना देण्यासाठी मुलांच्या भावविश्वाचा स्वीकार करून त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक असते. बऱ्याचदा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी भाषेत बोलण्याची सक्ती केली जाते. किंवा मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण झाल्यास मुले स्वतःहून प्रश्न विचारत नाही. संवादाअभावी मुलांची जिज्ञासूवृत्ती संपुष्टात येते. मुलांना अधिकाधिक प्रश्न विचारण्याची संधी मिळावी यासाठी शिक्षणाच्या प्रारंभिक अवस्थेत मुलांना येणारी भाषा आणि शाळेतील भाषा एकच असावी.
चिकित्सक, सर्जनशीलतेसाठी
मुलांच्या संज्ञानात्मक विकासात भाषेचा विकास खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२० चे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ घोकंपट्टी व परीक्षेसाठी अभ्यास यावर भर न देता संकल्पनात्मक आकलन, चिकित्सक व तार्किक विचार, समस्या निराकरण क्षमता, आणि सर्जनशीलता या क्षमतेचा विकास करणे हे शिक्षणाचे ध्येय आहे. मातृभाषेतील शिक्षणामुळे विचार, कल्पना व भावना नैसर्गिकपणे मांडल्याने सहज शिक्षण होते.
मुलांची आकलनशक्ती विकसित व मजबूत होते. विचार करणे, संश्लेषण, विश्लेषण, समस्या निराकरण या क्षमता विकसित होतात. याउलट इंग्रजीतील कठीण शब्द, संकल्पना यांचा मुलांवर ताण येतो. मुलांची विचारप्रक्रिया खुंटून मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. मातृभाषेतील शिक्षणामुळे मुले स्वयं - अध्ययन करण्यास सक्षम होऊन मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.
‘मातृ’ माहात्म्य : एखाद्या रडणाऱ्या बाळाला विश्वसुंदरीने जरी जवळ घेतले तरी ते मुलं रडायचे थांबत नाही. आईने हृदयाशी घेताच ते मुलं शांत होते. आईएवढेच आपले मातृभाषेशी जिव्हाळ्याचे नाते असते. मुलांच्या शाळेचे माध्यम कोणते असावे, बोर्ड कोणते हे महत्त्वाचे नसून मुलांच्या मनाची, हृदयाची भाषा हेच त्यांच्या शिकण्याचे उत्तम माध्यम आहे. मुलांचे शिक्षण मातृभाषा मराठीतूनच व्हावे. इंग्रजी भाषेतून शिकण्यापेक्षा ती केवळ भाषा म्हणून जरूर शिकावी.
७८८७५४५५५७
(लेखक सहायक शिक्षक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.