Sugarcane Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farming News : वीसहून आंतरपिकांनी केली ऊसशेती फायदेशीर

Maharashtra Agriculture News : रासायनिक अवशेषमुक्त उत्पादनावर भर

Raj Chougule

राजकुमार चौगुले

Sugarcane Intercropping : कोल्हापूर जिल्‍ह्यात प्रसिद्ध कण्हेरी मठापासून नजीक कोगील बुद्रुक येथील महादेव ताकमारे विविध हंगामांत ऊस घेतात. त्यात कल्पकतेने व हुशारीने हंगामनिहाय २० ते २४ आंतरपिके घेण्याचे तंत्र वापरून ऊसपिकातील खर्च त्यांनी कमी केलाच. शिवाय सर्व भाजीपाला आरोग्यदायी म्हणजेच रासायनिक अवशेषमुक्त पिकवण्यासह बेवडाचा फायदा घेत जमिनीची सुपीकता वाढवली आहे.

कोल्हापूर जिल्‍ह्यात प्रसिद्ध कण्हेरी मठापासून काही किलोमीटरवर कात्यायनी परिसरात
कोगील बुद्रुक गाव आहे. परिसरातील शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष कै. विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रयत्नांतून गावात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली. त्यातून ऊसशेती मोठ्या प्रमाणात वाढली. गावातील महादेव मारुती ताकमारे यांनी ऊस व त्यातील आंतरपिके पद्धतीत चांगले नाव कमावले आहे. कृषी पदविकाधारक असलेले महादेव शाहू सहकारी साखर कारखान्यात कृषी सहायक आहेत. त्यांची पाच एकर शेती असून, तीन एकर लागवडीखाली असते.

नोकरी सांभाळून ते घरची शेतीही उत्कृष्टपणे सांभाळतात. त्यांचे प्रत्येकी २० गुंठ्यांचे ऊस प्लॉट आहेत. त्यातील एका प्लॉटमध्ये उसात आंतरपिके घेत शेतीत त्यांनी वौविध्यता आणली आहे. जमीन पूर्ण माळरानाची आहे.

त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाल्‍यास त्याचा विपरीत परिणाम उसावर होतो. यामुळे उसाला आधार असावा म्हणून त्यांनी आंतरपिकांना प्राधान्य दिले आहे. आज हीच तंत्रपद्धती त्यांचे उसाचे अर्थकारण सक्षम करण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे.

उसातील आंतरपिकांचे व्यवस्थापन

-आडसाली, पूर्वहंगामी व सुरू अशा विविध हंगामांत उसाची लागवड. त्या त्या हंगामातील लागवडीत ते विविध प्रकारची आंतरपिके घेतात. उदाहरणार्थ, सुरू हंगामात चाकवत, गरगटे, पूर्वहंगामी पिकात कांदा, लसूण, तर आडसालीत भुईमूग असतो. खोडव्यातही काही पिके घेण्याकडे कल.


-ऊस लागवडीपासून सुमारे एक ते दीड महिना ते सहा महिने कालावधीत संपणाऱ्या पिकांचा समावेश.
- यात २० ते २४ पिकांची समावेश. काही नावे प्रातिनिधिक- भुईमूग, मिरची, दोडका, भेंडी, मका, चवळी, उडीद, वांगी, टोमॅटो, गवार, कोबी, बीटरूट, कोथिंबीर, शेपू, झेंडू, काकडी, दोडका, भोपळा आदी.

-ऊस तुटून गेल्यानंतर पूर्वमशागत. त्यानंतर एकरी पाच ट्रॉली शेणखताचा वापर. हे घरचेच खत असल्याने रासायनिक खतांवरील अतिरिक्‍त खर्च वाचतो.
-एक वर्ष लेंडीखत व एक वर्ष शेणखत असा क्रम ठेवत जमिनीची सुपीकता कायम ठेवली जाते.
-उसाचे वाण को ८६०३२. उसाच्या शेतात एका बोदावर भुईमूग, दुसऱ्या बोदावर मिरची,
दोन रोपांतील मोकळ्‍या जागेत अन्य पिके.
-कोथिंबीर, शेपूसारख्या पालेभाज्‍यांचे उत्पादन पहिल्याच महिन्यात, तर फळभाज्यांचे उत्पादन थोड्या उशिरा सुरू होते. पालेभाज्यांची काढणी झाल्यानंतर त्यांची पुन्हा लागवड होते. ऊस मोठा होईपर्यंत हे चक्र सुरू राहते.
-अनेक शेतकरी उसाची भरणी होईपर्यंत आंतरपिकांचा पर्याय निवडतात. पण महादेव यांनी येथेही लागवड पद्धतीत बदल केला. कालावधी जास्‍त असलेला भाजीपाला ते सरी व बोदाच्या खाली घेतात. त्यामुळे उसाची भरणी झाली तरी भाजीपाल्याचे रोप भरणीत बुजणार नाही याची काळजी घेतली जाते.
-काही भाजीपाल्यांचे बियाणे देशी असून, पुढील वर्षासाठी त्याचा उपयोग केला जातो.

(market intelligence)

काढणी व विक्रीचे नियोजन

-भाजीपाला काढणी आठवड्यातून दोन ते तीनदा होते. काढणीसाठी कोणत्याही मजुरांची मदत घेतली जात नाही. तर पत्नी अलका व आई श्रीमंती यांची मोठी मदत त्यामध्ये होते. कण्हेरी मठ व गोकुळ शिरगाव एमआयडीसी या परिसरात भाजीपाल्याची थेट ग्राहकांना विक्री होते.

नियमितपणे भाजीपाला विक्रीसाठी जाणे हा घरातील महिला सदस्यांचा नित्यक्रम झाला आहे. रासायनिक कीडनाशकांचा वापर अजिबात होत नसल्‍याने महादेव यांच्याकडील भाजीपाल्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी असते.

उत्पादन प्रातिनिधिक (क्षेत्र २० गुंठे)

-भुईमूग- दोन क्विंटल, दर ५००० रु. प्रति क्विं.
-ओली मिरची- १५०० किलो, दर ३० रुपये प्रति किलो
-लाल मिरची- ३५ किलो, दर ५०० ते ६०० रुपये प्रति किलो
-मका- २ टन

-ऊस उत्पादन- एकरी- सुरू हंगाम- ५० टनांपर्यंत, आडसाली- ८० टन, तर पूर्वहंगामी- ६० टनांपर्यंत.
उसाला दर प्रति टन तीन हजार रुपये मिळतो.
-आंतरपीक पद्धतीतून सुमारे ३० हजार रुपयांच्या आसपास उत्पन्न मिळते.

आंतरपीक पद्धतीची वैशिष्ट्ये व फायदे

१) अलीकडील काळात उसाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात खर्च वाढला आहे. निविष्ठांच्या तसेच मजुरीखर्चात बेसुमार वाढ झाली आहे. इतका खर्च करूनही पाण्याअभावी उसाची वाढ चांगली न झाल्यास ऊस शेती तोट्यात येते. याचा फटका महादेव यांना बऱ्याचदा बसला. या मानसिकतेतूनच त्यांनी आंतरपिकांचा पर्याय निवडला.

ही पद्धती स्वीकारताना उसाच्या एकरी उत्पादनात काही प्रमाणात घट होणार हे गृहीत धरले. पण आंतरपिकांची निवड, त्यातून मिळणारे उत्पन्न, त्याचे अर्थकारण व्यवस्थित अभ्यासले. त्यातून उसाचा २० गुंठ्यांतील खर्च निघून जाण्यास मदत झली आहे. उसाचे उत्पन्न बोनस ठरत आहे.
(Latest Agriculture News)

२) आंतरपिकांची विविधता असल्याने एखाद्या भाजीला कमी दर असल्यास दुसऱ्या भाजीतून तो
भरून निघतो.
३) पूर्णपणे रासायनिक अवशेषमुक्त असल्याने कुटुंबालाही आरोग्यदायी, ताजा व विविध भाजीपाला दररोज मिळते.

४) काही आंतरपिके द्विदल असतात. काहींचा बेवड चांगला असतो. शिवाय प्रत्येक २० गुंठ्यांत फेरपालट असल्याने जमिनीचा पोत टिकून राहतो.
५) महादेव यांची पाच जनावरे आहेत. दूध उत्पादनासह ऊस उत्पादनातही त्यांनी विविध पुरस्‍कार
मिळवले आहेत. मुलगा प्रतीक बीएस्सी ॲग्रीचा, तर मुलगी प्रणाली सीएचा अभ्यासक्रम पूर्ण करते आहे.

महादेव ताकमारे, ९४२०३२४८२२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT