AIIMS expansion : आरोग्य सेवेपासून कुणी वंचित राहू नये असे शासनाचे धोरण असून त्यानुसार सक्षमपणे कार्य सुरू आहे. देशात आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. आयुष्मान भारतसारख्या योजनांद्वारे गरिबांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. ३०) केले.
हिंगणा रोडवरील माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे भुमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, स्वामी अवधेशानंद गिरी, स्वामी गोविंद देव गिरी, माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे सरचिटणीस डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री या वेळी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना आरोग्य क्षेत्रातील सुधारणांमध्ये देशाला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प जाहीर केला. गेल्या दशकात ग्रामीण भागात लाखो आयुष्मान भारत केंद्रे उभारण्यात आली. कोट्यवधी लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या.
टेलिमेडिसिनद्वारे उपचार व आरोग्य सेवा सशक्त करण्यात आल्या. ‘एम्स’सारख्या संस्थांची संख्या तिपटीने वाढविण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच देशात वैद्यकीय शिक्षण मातृभाषेत उपलब्ध करून दिले. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. योग आणि आयुर्वेदालाही जगात मानाचे स्थान मिळाले आहे. आरोग्य क्षेत्रातील सुधारणांचा हाच वसा माधव नेत्रालय पुढे घेऊन जात आहे.’’
नि:स्वार्थ भावनेतून लोककल्याणाच्या प्रेरणेने माधव नेत्रालय अव्याहतपणे कार्यरत असून दृष्टीबाधितांना जीवनदृष्टी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत या वेळी म्हणाले.
संतांच्या शिकवणीमुळे देश एकसंध
विदर्भातील थोर संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज हे जन्मतः अंध होते. मात्र अंधत्वावर मात करीत त्यांनी ज्ञानाची दृष्टी विकसित केली. दृष्टी बोधातून येते व विवेकातून प्रकट होते याचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ अशा देशातील संतांनी भारताला एकसंध ठेवत उत्तम शिकवण दिली, अशा भावनाही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या.
दीक्षाभूमीला अभिवादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यात दीक्षाभूमीलाही भेट दिली. या वेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन केले. तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करून बुद्धवंदना दिली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, स्मारक समितीचे सचिव राजेंद्र गवई उपस्थित होते.
अभिप्राय नोंदवहीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांपैकी एक असलेल्या नागपूरस्थित दीक्षाभूमीला भेट देण्याचे सौभाग्य लाभल्याने मी भारावून गेलो आहे. मला पूर्ण विश्वास आहे की या अमृत काळात आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणी आणि मूल्यांचा मार्ग अनुसरून देशाला प्रगतीच्या नवीन शिखरावर नेऊ. एक विकसित आणि सर्वसमावेशक भारत घडवणे हीच बाबासाहेबांना आपली खरी श्रद्धांजली ठरेल’, असा संदेश या वेळी पंतप्रधान श्री. मोदी यांनी नोंदविला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.